ओबीसींच्या शेतीचे भवितव्य काय ?

डॉ.  विद्याधर बनसोड

आज ज्या वर्गाला आपण ओबीसी म्हणतो तो बहुजन समाजातील मोठ्या संख्येने असलेला शेतीनिष्ठ भारतीय समाज आहे.त्यानंतर शेतकरी म्हणून आदिवासी समाजाचा क्रम लागतो.इ.स.२०५६ पर्यंत ओबीसींच्या शेतीची स्थितीगती काय असेल याविषयी जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला ते चित्र भयावह दिसून येते.भविष्यात ते वर्तमानातील दलितांच्या आर्थिक स्थितीसारखे असेल की काय असे मला वाटते.(ते चूक ठरो).या वर्गाच्या शैक्षणिक व आर्थिक स्थितीकडे बघूया.खेड्यात या वर्गाची संख्या जास्त आहे.त्यांचे खेड्यातील शिक्षणाचे प्रमाण फार समाधानकारक किंवा आनंददायी आहे असे नाही. सध्या ग्रामीण भागात ओबीसींमध्ये मजूरी करणाऱ्यांचे प्रमाण १७ टक्के आहे.११ टक्के लोक भूमीहीन किंवा अल्पभूधारक आहेत.ओबीसींकडे शेतीचे प्रमाण ३६.६ टक्के आहे.अनुसूचित जातींकडे ६.१० टक्के तर अनुसूचित जमातींकडे ११ टक्के. इतरांकडे ४६.४ टक्के आहे.आज आपणास असे दिसते की भाऊ हिश्श्यांमुळे,नोकरीसाठी विकल्यामुळे, रस्ते,प्लॉट विक्री किंवा अन्य कारणांसाठी जमीन गेल्यामुळे शेती विकल्या जात आहे.मात्र दुसरीकडे शेती न करणारे उद्योजक किंवा राजकारणी मोठ्या प्रमाणात शेती विकत घेत आहेत.चांगला भाव मिळतो म्हणून किंवा प्रलोभनांनी शेती विकल्या जात आहे.मोटर गाड्या विकत घेण्यासाठी शेती विकली जात आहे.कुठे कुठे लग्नासाठी शेती विकल्या जात आहे.हा सर्व पैसा उद्योजकांच्या/व्यापारी लोकांच्या घरात जात आहे.

ओबीसी बहुसंख्येने शेती करतो.तो शेतीनिष्ठ आहे.तो काबाडकष्ट करून शेतमाल पिकवतो.परंतु त्यानेच पिकवलेल्या मालाची किंमत ठरवणे त्याच्या हातात नाही. शेती करताना मजूरांची मजूरी,बी-बीयाणे,किटकनाशके, खत खरेदी,पाणी,वीज यासाठी खूप पैसा जातो.परंतु ओबीसी हा उद्योजक किंवा व्यापारी समूह नसल्याने बी- बीयाणे,खते व किटकनाशके यांचा पैसा व्यापाऱ्यांच्याच घरात जातो.ओबीसींनी बी बीयाणे,खते व किटकनाशके यांचे उद्योग उभारायला पाहिजेत.आपल्या व्यापारी माणसाला जगवलं पाहिजे.हा त्यावर एक उपाय आहे.

ओबीसी समूह विविध कारणांमुळे शेती विकत आहे.शेतीत राबायला घरचे लोक पूर्वी असायचे तसे आता नाहीत. मुलांच्या शिक्षणासाठी खर्च खूप लागतो परंतु मुलं शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या पायावर उभे होत नाही.ही सध्याची स्थिती आहे. शेती परवडत नाही म्हणून शेती ठेवून काय फायदा ? शिकून नोकरी मिळत नाही म्हणून शिकून काय फायदा ? असा सर्व दिशांनी नकारात्मक विचार सुरू झालेला आहे व तसा सुरू राहिला तर पुढे धोक्याची घंटा आहे.

चित्रपटसृष्टी,इलेक्ट्रॉनिक मिडिया, एमआयडीसी मधील उद्योग, ऑनलाइन उद्योगात ओबीसी समाज शिरला पाहिजे. ओबीसींच्या खाजगी बँका,कॉन्व्हेंट वाढले पाहिजेत.कारण कॉन्व्हेंटचे शिक्षण हा आता उद्योग झालेला आहे.(दुर्दैव म्हणजे शिक्षकांना फारच कमी पगार असतो.फक्त जगण्यापुरता.) त्यांच्या कॉन्वेंट उभ्या झाल्या तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.ओबीसींची ही शेती अनेक मागास जातसमूहांना,शेतमजुरांना, अल्पभूधारकांना रोजगार पुरवते.

एस्सी, एसटी तसेच एनटी यांच्यामध्येही शिकून का होते ? असा नकारात्मक विचार अलीकडे वाढायला लागलेला आहे.परंतु शेतीनिष्ठ नसलेला हा वर्ग वेगवेगळे मार्ग धुंडाळेल.त्यांची संघर्ष प्रवणता वाढेल.शेती नसल्यामुळे किंवा अल्पभूधारक असल्यामुळे हे सामाजिक, आर्थिक मागासवर्गीय लोक छोट्या उद्योगांकडे वळतील.नाही वळले तर संपतील.

ओबीसींचा मुख्य पाया शेती आहे.शिक्षण हेच सर्व रोगांवरचे औषध आहे हे त्यांनी विसरू नये व ते विसरणार नाहीत. पोटासाठी कोणताही उद्योग करेन परंतु शिक्षण सोडणार नाही हा दृष्टिकोन त्यांना ठेवावाच लागेल.मी ओबीसींना सांगणारा कोण ? असा प्रश्न कोणाच्या मनात आला तर खुशाल येवो.मला जे चित्र दिसत आहे ते असे की ओबीसी आपली शेती विकू शकेल परंतु पुन्हा ती विकत घेऊ शकणार नाही. व्यापारी वर्ग शेतीचा मालक होईल व ओबीसी आपल्याच शेतीवर राबणारा शेतमजूर होईल.कधीही शेती न करणारा वर्ग देशातील जास्तीत जास्त शेतीचा मालक होईल.एसटी वर्गासाठी आदिवासींची जमीन आदिवासीच घेऊ शकेल या संविधानाने दिलेल्या संरक्षणामुळे त्यांची शेती कायम व सुरक्षित राहिली.तशी ओबीसींची राहणार नाही. त्यांची शेतीवरील मालकी हळूहळू कमी होईल.त्याचा परिणाम खेड्यातील इतर जात समूहांवरही होईल.ओबींसींनी आपल्या जमिनी विकल्या तर पुढे त्यांना उभं राहायलाही जागा मिळणार नाही. म्हणून ओबीसींनी वाटेल तो ताण सहन करावा,वाटेल त्या समस्यांना तोंड द्यावे परंतु आपली शेती विकू नये.त्यांना शेती विकता तर येईल परंतु पुन्हा घेता येणार नाही.ज्या वेगाने ओबीसींकडून शेती विकली जात आहे ते पाहिलं तर २०५६ पर्यंत ती १६ टक्केही शिल्लक राहील असे मला वाटत नाही. ती व्यापारी वर्गाची होईल.परंतु तिथे शेतीत राबणारा दुर्दैवाने ओबीसीच असेल.म्हणून ओबींसींनी आपली शेती विकू नये असं मला मनापासून वाटतं.(शेवटी खरेदी करणं आणि विकत घेणं हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे. असो.)

(हा लेख मी २०१६ साली लिहिला होता.आकडेवारी तेव्हाचीच आहे.२०५६ पर्यंत ओबीसींच्या शेतीची स्थिती काय असेल असा विचार मनात आला होता. म्हणून हा लेख तेव्हा लिहिला होता.)

डॉ. विद्याधर बन्सोड
प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख
सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर
१३/११/२०२२

  • सौजन्य : फेसबुक पोस्ट
लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *