सांगोला पुस्तक आणि लेखन माणसाला ओळख निर्माण करून देते- डॉ. रणधीर शिंदे

 

लोकदर्शन सांगोला ; 👉राहुल खरात

कै. दिनकर कुटे यांच्या लोटांगण या कथासंग्रहाचे राजुरी येथे प्रकाशन
राजुरी ता. सांगोला येथील कै. दिनकर कुटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त साहित्यिक मित्र परिवाराने मिळून त्यांच्या निधनानंतर उरलेले लेखन पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित करण्यात आले. लोटांगण या कथासंग्रहाचे प्रकाशन मराठीतील आघाडीचे समीक्षक, लेखक, डॉ. रणधीर शिंदे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या उपस्थितीत आणि सांगोल्याचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये राजुरीच्या सरपंच प्रतिभा व्हळगळ, महादेव बाड, श्रीधर करांडे, तानाजी साळे, मनीषा दिनकर कुटे, वसंत कुटे, नवनाथ गोरे, रामहरी कुटे आदी मान्यवर मंडळी होती. सुरुवातीला स्मृतिदिनाच्या औचित्याने दिनकर कुटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
अतिशय मितभाषी, गुणी आणि तितकालच सालस असा राजुरी गावचा एक प्राध्यापक आपल्या अंतरंगी असलेल्या गुणांनी प्रगती करतो, पुढे जातो. साहित्यामध्ये दिनकर कुटे यांनी केलेले लेखन खूप महत्त्वाचे आहे. कुणीच दखल घेत नाही त्यावेळी पुस्तक आणि लेखन माणसाला ओळख निर्माण करून देतात. कष्टकर्‍यांच्या प्रदेशात आंतरिक जाणीवेतून विवंचनेचे जग कुटे यांच्या कथेतून येते. लेखकाचे लेखन हे त्याचे चरित्रही असते. परिस्थितीच्या पिचलेपणातून मार्ग काढत धडपडणारी जिद्द दिनकर कुटे यांच्या जीवन जाणीवेचे सामर्थ्य होते. हेच त्यांचे लेखन तुम्हा सर्वांना बळ देणारे आहे असे प्रमुख उपस्थितीत असलेले डॉ. रणधीर शिंदे यांनी आपल्या मनोगतातून मांडले. प्रा. नवनाथ गोरे यांनी कुटे यांच्या मित्रत्वाने दिलेल्या स्मृतिपर घटनांनी उजाळा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी रामहरी कुटे यांनीही मनोगतातून दिनकर कुटे यांचा जीवनप्रवास उलगडला.
डॉ. कृष्णा इंगोले आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त होताना म्हणाले, आपल्या गावाला गावातील गुणवान माणूस वेळीच समजला पाहिजे. तो समजत आणि आपण त्याची दखल घेत नाही. राजुरी गावातील एक तरुण आपल्या प्रतिभेने उत्तुंग झेप घेतो. राज्यशासनाचा पन्नास हजार रुपयांचा पुरस्कार मिळवतो. पण त्याच्या भोवतालाला त्याचे कौतुक नसते. आपल्याला अशा माणसांचे कौतुक वाटायला हवे. गुणवंत माणूस ज्या परिसरात राहतो, वाढतो त्या परिसराने त्याचा गौरव केला पाहिजे. आजचा प्रकाशनाचा कार्यक्रम हा राजुरी गावातील इतिहासात नोंदवावा असा कार्यक्रम आहे. दिनकर कुटे या लेखकाच्या स्मृती कायमस्वरूपी या गावात राहतील यासाठी एखादे छोटेसे स्मारक व्हावे असेही विचार इंगोले यांनी या प्रसंगी मांडले.
हा कार्यक्रम कुटे यांच्या स्मृतिदिनी राजुरी गावातील जि. प. शाळेत भारावलेल्या अवस्थेत पार पडला. जि. प. शाळेच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्यातील मित्रपरिवार आणि ग्रामस्थ, कुटे परिवारातील सदस्य, जि. प. शाळा यांच्या संयुक्त परिश्रमाने हा कार्यक्रम पार पडला. यासाठी साहित्यिक ज्योतीराम फडतरे, संतोष जगताप, इंद्रजित घुले, सुनील जवंजाळ आदी साहित्यिक मित्रांनी सुयोग्य नियोजन केले. लेखक महादेव माने, फारूख काझी, संदीप दळवी, अंकुश मुढे ही मंडळी आवर्जून उपस्थित होती. एखादा लेखक जिवंत नसताना त्याच्या गावामध्ये असा पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होणे आणि त्यास सर्वांची भरभरून साथ लाभणे ही गोष्ट साहित्य जगतामध्ये अधोरेखित करावी अशीच बाब आहे. कुटे परिवारातील रामहरी कुटे, तानाजी साळे, रावसाहेब कुटे, दादासाहेब व्हळगळ, महेश काटे, सुभाष करांडे, विलास कुटे, पांडुरंग दबडे, सचिन काटे, आदित्य कुटे यांनी मोठ्या मेहनतीने या कार्यक्रमात योगदान दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कथाकार ज्योतीराम फडतरे यांनी केले तर सूत्रसंचालन कवी इंद्रजित घुले यांनी केले. कादंबरीकार संतोष जगताप यांनी आभार व्यक्त केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *