लोकदर्शन पिंपरी चिंचवड 👉राहुल खरात
पिंपरी-चिंचवड:
कवीवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले १८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी येथील ‘कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य नगरी’ (महात्मा फुले महाविद्यालय) येथे रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले. साहित्याचा जागर, मान्यवरांची उपस्थिती आणि राज्यस्तरीय काव्यस्पर्धेमुळे संमेलनाला विशेष रंगत प्राप्त झाली.
संमेलनाचे उद्घाटन गोव्याचे ज्येष्ठ साहित्यिक मा. दशरथ परब यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी नारायण सुर्वे यांच्या साहित्यातील कामगार जाणीवांचा वेध घेतला. संमेलनाध्यक्ष मा. उमेश शंकर गाड यांनी मराठी साहित्य चळवळीचा आढावा घेत नव्या लेखकांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर (कवी गोलघुमट) यांनी संमेलनाची भूमिका स्पष्ट करत साहित्यिक चळवळीच्या दिशेबाबत मार्गदर्शन केले.
या वेळी सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जीवनगौरव साहित्य भूषण पुरस्कार मा. उत्तम कांबळे (नाशिक), समाजभूषण पुरस्कार ॲड. राम कांडगे (चाकण), विद्याभूषण पुरस्कार डॉ. पांडुरंग भोसले (पिंपरी) तसेच साहित्य भूषण पुरस्कार सौ. अर्चना यांना प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले उद्योगभूषण पुरस्कार मा. फिरोज जान मोहंमद शेख यांना देण्यात आला. नितीन मोरे, ज्योती अमिने, हेमलता पाटील, प्रितम गाडगीळ, शाम दाभाडे आणि प्रा. आबा पाटकरी यांचाही सन्मान करण्यात आला.
४४ व्या राज्यस्तरीय काव्य संमेलनांतर्गत झालेल्या काव्यस्पर्धेत महाराष्ट्रभरातील कवींनी सहभाग नोंदवला. प्रा. अंताराम जिभकाटे (पुणे) यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर मंदाकिनी भावे (सांगली) द्वितीय आणि अश्विनी काळे तृतीय ठरल्या. योगिता संजय कोठेकर आणि संदीप सूर्यवंशी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
संमेलनात पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. सौ. अर्चना मोरे यांच्या ‘अनुभूती’ या कथासंग्रहासह विविध पुस्तकांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘दलित साहित्य उपेक्षित का?’ या विषयावर डॉ. निता बोडके यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद पार पडला. यात डॉ. प्रवीण उपलेंचवर (नागपूर) आणि बापूसाहेब ठाकरे पाटील (जळगाव) यांनी सखोल विवेचन केले.
दुपारच्या सत्रातील काव्य संमेलनाला ज्येष्ठ कवयित्री जयश्री श्रीखंडे अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या, तर बुलडाणा येथील ज्येष्ठ कवी डी. आर. बांगर प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमाचे दिलखुलास सूत्रसंचालन निवेदिका अनघा जाधव यांनी केले. मुख्य आयोजक डॉ. सुहास निंबाळकर आणि समन्वय समितीने संमेलनाचे चोख नियोजन केले. रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, साहित्यिक तसेच पिंपरी-चिंचवडमधील रसिक श्रोत्यांची मोठी उपस्थिती यावेळी लाभली. नाशिकच्या ज्येष्ठ कवयित्री ललिता गवादे, कराडचे ज्येष्ठ कवी सुरेश लोहार, डॉ. विनायकराव जाधव, राम कांडगे, अरविंद तुपे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
बातमी लेखन: राहुल खरात, आटपाडी/पुणे.





