Home
Home पुणे आकुबा’चा राज्यभर गाजला आवाज; विलास खरात यांना प्रतिष्ठेचा गावगाडा साहित्य पुरस्कार

आकुबा’चा राज्यभर गाजला आवाज; विलास खरात यांना प्रतिष्ठेचा गावगाडा साहित्य पुरस्कार

लोकदर्शन आटपाडी | 👉राहुल खरात

ग्रामीण जीवनातील उपेक्षितांचे वास्तव, त्यांच्या भावना आणि संस्कृतीचे प्रभावी चित्रण करणाऱ्या लेखक विलास खरात यांच्या ‘आकुबा आणि इतर कथा’ या कथासंग्रहाला प्रतिष्ठेचा १६ वा राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. वडशिवणे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विश्वकर्मा तरुण मंडळ यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान केला जातो.

विशेष म्हणजे, राज्यभरातील ७५ हून अधिक साहित्यकृतींमधून निवड होत विलास खरात यांनी पहिल्याच प्रयत्नात हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ मधुकर टकले यांनी २०२५-२६ वर्षातील पुरस्कारांची घोषणा केली. ग्रामीण लोकजीवन, संस्कृती आणि समाजमनाचे वास्तव मांडणाऱ्या साहित्यकृतींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा खरात यांच्या कथासंग्रहासोबत डॉ. देवानंद सोनटक्के यांच्या समीक्षा ग्रंथालाही सन्मान जाहीर झाला आहे.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भावना व्यक्त करताना विलास खरात म्हणाले, “ग्रामीण भागातील उपेक्षितांच्या संवेदनांना ‘आकुबा’च्या माध्यमातून शब्द देण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. पहिल्याच प्रयत्नात राज्यस्तरीय पुरस्कार मिळणे म्हणजे माझ्या लेखणीचा आणि माझ्या मातीतल्या संस्कारांचा सन्मान आहे.”

इतर पुरस्कार मानकरी

मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कार

मिथुन चंद्र चौधरी — आतली कवाडं

संध्या लगड — पुसट सावल्या गडद काळ

मातोश्री रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृती पुरस्कार

दिवाकर कृष्ण आचार्य — पीळ

मुकूंदराज कुलकर्णी — नाथ मंदिरांतील दिवस

विलास सिदंगीकर — सणोत्सव

आशा नेगी — लव्ह इज लव्ह

मातोश्री चांगुणाबाई सिद्राम इंगळे स्मृती पुरस्कार

प्रा. भास्कर भंगाळे — आस्वाद साहित्याचा

संपादन ग्रंथ विभाग

वंदना कुलकर्णी — सोलापूरची काव्यप्रभा

रमाकांत नारायणे — ढोर समाज आणि समाजाचे शिल्पकार

पुरस्कार वितरण सोहळा रविवार, २४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता अक्षरवेल सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. शाल, स्मृतिचिन्ह, ग्रंथ आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

विलास खरात यांच्या या यशाबद्दल योगीराज वाघमारे, सुहास घुमरे, डॉ. जनार्दन भोसले आणि दत्तात्रय पिसाळ यांच्यासह आटपाडीतील साहित्य व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here