Home
Home चंद्रपूर चंद्रपूरकरांचा कृतज्ञतेचा सोहळा : जी.सी. विनय गौडा व वसूमना पंत यांचा 19...

चंद्रपूरकरांचा कृतज्ञतेचा सोहळा : जी.सी. विनय गौडा व वसूमना पंत यांचा 19 एप्रिलला भव्य नागरी सत्कार

लोकदर्शन चंद्रपूर 👉मोहन भारती

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवे आयाम देत प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचे उल्लेखनीय कार्य करणारे माजी जिल्हाधिकारी जी.सी. विनय गौडा यांचे योगदान चंद्रपूरकरांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून गेले आहे. त्यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध विकासात्मक उपक्रमांमुळे जिल्ह्याच्या प्रगतीला नवी गती मिळाली. विशेषतः आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हाती घेतलेल्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना त्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रशासकीय सहकार्यामुळे विकास प्रक्रियेला बळकटी मिळाली, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

या कर्तृत्वाला मानाचा मुजरा देण्यासाठी चंद्रपूरकर नागरिकांच्या वतीने जी.सी. विनय गौडा यांच्या सन्मानार्थ भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे उत्साहात पार पडणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार राहणार असून, आमदार कीर्तिकुमार भांगडिया, देवराव भोंगळे आणि करण देवतळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विविध सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांच्या सहभागातून हा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून, जी.सी. विनय गौडा यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.

याचवेळी चंद्रपूर जिल्ह्याची धुरा नुकतीच स्वीकारलेल्या जिल्हाधिकारी श्रीमती वसूमना पंत यांचाही शुभेच्छापर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. नव्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुढील कार्यासाठी नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येणार असून, त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दोन्ही कार्यक्षम आणि लोकाभिमुख सनदी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित हा नागरी सत्कार सोहळा चंद्रपूरच्या सामाजिक ऐक्याचे आणि कृतज्ञतेच्या भावनेचे प्रतीक ठरणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी चंद्रपूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here