लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा, दि. 31 मे : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या वतीने शिवाजी महाविद्यालय, राजुरा येथे पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 301 वा जयंती समारोह उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच विद्यापीठ गीत व राज्यगीताने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक उराडे होते. प्रमुख वक्ते म्हणून इतिहास अभ्यासक चौंडी अरणगाव येथील औदुंबर शिंदे पाटील उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय गोरे, अधिसभा सदस्य तथा शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी वरकड, अध्यासन केंद्राचे समन्वयक गुरुदास कामडी तसेच उपप्राचार्य डॉ. आर. एम. खैरानी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. सामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या अद्वितीय कर्तृत्वाच्या बळावर त्या लोकमाता बनल्या. सामाजिक समरसता, महिला सक्षमीकरण, शेतकरी हित, जलसंवर्धन आणि सांस्कृतिक वारसा जतनासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्रमुख वक्ते औदुंबर शिंदे पाटील यांनी केले. महेश्वरी साडी उद्योगाला चालना देऊन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग त्यांनी खुला केला, असेही त्यांनी सांगितले.
काशी विश्वनाथासह अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करून भारतीय संस्कृतीचे जतन करण्यात अहिल्यादेवींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या तीस वर्षांच्या राज्यकारभाराला इतिहासात सुवर्णकाळ म्हणून गौरविण्यात येते, असे वक्त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी आयोजित ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठातील 55 महाविद्यालये, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसह रा.तु.म. नागपूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि अन्य संस्थांमधील एकूण 608 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. विजेत्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील विजेते :
प्रथम क्रमांक :
मानसी श्रीनिवास गाडगे (शरदराव पवार महाविद्यालय, गडचांदूर)
नागकृष्ण मुरली जक्करवार (शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा)
रवींद्र विनोद पाटील (लोकमान्य महाविद्यालय, वरोरा)
द्वितीय क्रमांक :
अविनाश भास्कर राऊत (सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय, चंद्रपूर)
माधुरी रामदास शेडमाके (श्री शिवाजी महाविद्यालय, राजुरा)
तुषार अनिल हजारे (एमबीए व पीजीडीटी विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली)
स्वरुपा बलिराम धांडे (आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वडसा)
मनीष सुरेश गुरनुले (सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर)
तृतीय क्रमांक :
सचिन पंढरी खेडेकर (महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी)
आकाश पुंडलिक निकुरे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, ब्रह्मपुरी)
नागेश भगवान खांडेकर (शरदराव पवार महाविद्यालय, गडचांदूर)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुदास कामडी यांनी केले. त्यांनी अध्यासन केंद्राच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची तसेच ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेची माहिती दिली. प्राचार्य डॉ. संभाजी वरकड यांनी अतिथींचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. गुरुदास बल्की यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. आर. एम. खैरानी यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


