लोकदर्शन 👉मोहन भारती
घुग्गुस : आजच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत प्रत्येक जण आपल्या कामकाजात गुंतलेला आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाने एकत्र येऊन नात्यांमधील आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा जपणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची आणि नातेसंबंधांची ओळख व्हावी यासाठी आयोजित करण्यात येणारे स्नेहमिलन सोहळे समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. अशा कार्यक्रमांमुळे कौटुंबिक नातेसंबंध अधिक दृढ होतात, असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
घुग्गुस येथील प्रयास सभागृहात आमदार देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला भोंगळे परिवाराचा कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडला. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते.
आमदार भोंगळे पुढे म्हणाले की, “नाती टिकली तरच समाज टिकेल आणि समाज टिकला तरच संस्कृती अधिक समृद्ध होईल. स्नेहमिलन सोहळ्याच्या माध्यमातून एकमेकांबद्दलचा आदर, प्रेम, आत्मीयता आणि जिव्हाळा वृद्धिंगत होतो. नात्यांची वीण अधिक घट्ट करण्यासाठी अशा कौटुंबिक मेळाव्यांची आज समाजाला नितांत गरज आहे.”
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सौ. अर्चना देवराव भोंगळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “भोंगळे परिवार स्नेहमिलन सोहळ्याच्या निमित्ताने आजचा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. देवरावजींनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक मोठे कार्यक्रम घेतले, परंतु आपल्या रक्ताच्या नात्यांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आमच्यासाठी अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की, “घुग्गुस ही देवरावजींची जन्मभूमी असून या मातीतच त्यांचे बालपण घडले. आज चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण भोंगळे परिवार या भूमीत एकत्र आल्याने विशेष समाधान वाटत आहे. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, संकटसमयी खंबीरपणे उभे राहणे आणि परस्परांतील ऋणानुबंध अधिक दृढ करणे हाच या स्नेहमिलन सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे.”
या स्नेहमिलन सोहळ्यात परिवारातील सदस्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत “आपली माणसे हीच खरी संपत्ती” असल्याचा मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमाला चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातील भोंगळे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.





