तू ’राम’ म्हण, ’अल्ला’ म्हण..!

ज्ञानेश वाकुडकर


तू ‘राम’ म्हण, ‘अल्ला’ म्हण
‘येशू’ म्हण, ‘साई’ म्हण
‘देव’ म्हण, ‘दूत’ म्हण
‘अवतार’ म्हण, ‘काही’ म्हण
मी हरकत घेण्याचंही
कारण नाही काही..
पण माणूस म्हणून एक गोष्ट
खरंच पटत नाही !

तू हवी त्याची पूजा कर
हवी त्याची आरती गा
मॅगी, पिझ्झा, चिकन, मटन
प्रसाद म्हणून काही खा !
चोविस तास देव देव कर
वाटल्यास विसर घर
पण माझ्यासाठी दोस्ता फक्त
एवढा विचार कर !

देव म्हणजे सुपर पाॅवर
ब्रम्हांडावर ताबा
मग त्याचं ऑफिस गल्लीबोळात
कशाला रे बाबा ?
ऐकलं होतं.. देव असतो
उभा सत्त्यापाठी !
तरी त्याच्या अवती भवती
दलालांची दाटी ?

चोर, डाकू, बलात्कारी
सारेच त्याचे भक्त
देव काय नुसते चेहरे
बघत बसतो फक्त ?
असा कसा चिडत नाही
त्याला नाही भान ?
वरून तुझ्यासारखे मूर्ख
तिथंच देतात दान !

देवळा भवती भिकारी
लुळे पांगळे जीव
ज्याला असेल काळीज त्याला
पाहून येते कीव !
प्रश्न त्यांचे सुटत नाहीत
दुःख सरत नाही
तरी तुझा सुपर देव
काहीच करत नाही !

म्हणून म्हणतो डोकं वापर
गहाण नको ठेऊ
भुकेल्याला, तहानल्याला
घाल कधी जेवू !
अनाथ, कोवळ्या हातामधे
पाटी-पुस्तक ठेव
आई शप्पथ तुला सांगतो
तूच होशील देव !
——-
ज्ञानेश वाकुडकर
नागपूर २८/०५/२०१६

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *