Home
Home मुंबई आर्यारवी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचा परेलमध्ये दिमाखदार सोहळा; पांचाळे, पुळेकर यांना जीवनगौरव

आर्यारवी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचा परेलमध्ये दिमाखदार सोहळा; पांचाळे, पुळेकर यांना जीवनगौरव

लोकदर्शन मुंबई 👉 : गुरुनाथ तिरपणकर

मुंबई : नवोदित कलाकार आणि तंत्रज्ञांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’ आयोजित चौथ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा ३० एप्रिल रोजी परेल येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये उत्साहात पार पडला. चित्रपट, नाट्य आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष दिमाख लाभला.

या महोत्सवात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भीमराव पांचाळे (गझल नवाज), सतीश पुळेकर (ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक), के. राघवकुमार (ज्येष्ठ नाट्यकर्मी) आणि प्रभाकर तोडणकर (समाजसेवक) यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचा शुभारंभ सुनील शिर्के यांच्या हस्ते नारळ वाढवून व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. कवी शब्दश्री विलास देवळेकर यांनी सादर केलेल्या ‘गाऱ्हाण्या’ने वातावरण भारावून गेले. आयोजक महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी प्रास्ताविकातून महोत्सवाचा उद्देश स्पष्ट केला, तर विशेष दृकश्राव्य (AV) सादरीकरणातून गेल्या तीन वर्षांचा प्रवास उलगडण्यात आला.

यावेळी बोलताना भीमराव पांचाळे यांनी तेटांबे यांच्या कार्याचे कौतुक करत, नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या या उपक्रमाचे विशेष महत्त्व अधोरेखित केले. ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांनीही पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित केली.

कार्यक्रमात विनोदवीर आशिष सातपुते, एम. नटराज, संदीप भाकरे, समीर काळबे तसेच नृत्यांगना ग्रीष्मा वहाळकर यांच्या सादरीकरणांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. अभिनेते व मुलाखतकार मयूर धुरी यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले.

यावेळी कांचन पगारे, सिद्धी कामथ, गुरुनाथ तिरपणकर, खलील शिरगावकर, अनंत सुतार आणि लक्ष्मी गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अजीत साकरे, सुरेश गुरव, देवेंद्र पेडणेकर, अविनाश राऊत, राहुल शिंदे आणि पत्रकार केतन भोज यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक महेश्वर तेटांबे यांनी सर्वांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here