by : Priyanka Punvatkar
महाऔष्णिक विद्युत केंद्रात प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी नोकरभरती प्रकरण
चंद्रपूर, दि.21 : चंद्रपूर, महाऔष्णिक विद्युत केंद्रात प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी नोकरभरतीत गैरव्यवहार प्रकरणी आक्षेप/ तक्रार असलेल्या 128 प्रकरणात विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांच्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे 128 व्यक्तींना प्रकल्पग्रस्त प्रपत्र वितरीत झाले. त्याअनुषंगाने, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी पथक नेमण्यात आले होते. त्यानुसार उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) व त्यांच्या चौकशी पथकाने चंद्रपूर, महाऔष्णिक विद्युत केंद्रात भरती आक्षेप असलेल्या 128 प्रकल्पग्रस्तांची चौकशी करण्यात आली. सदर पथकाने उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, चिमूर व गोंडपिपरी येथील मूळ भूसंपादनाचे रेकॉर्ड व अर्जदारांनी संलग्न केलेल्या दस्तऐवजाची तपासणी केली. त्यामध्ये 32 प्रकल्पग्रस्तांनी खोट्या दस्तऐवजानुसार चंद्रपूर उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), कार्यालयातून प्रपत्र प्राप्त करून घेतलेले आढळून आले.
त्यांच्या चौकशी अहवालाची प्रत शासनास व चंद्रपूर, महाऔष्णिक विद्युत केंद्रास सादर करण्यात आली असून 32 प्रकल्पग्रस्त नामनिर्देशित व्यक्ती विरोधात बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची व चंद्रपूर, महाऔष्णिक विद्युत केंद्राची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत एकूण 128 प्रकल्पग्रस्तांतर्फे नामनिर्देशित व्यक्तीपैकी पात्र 56 व अपात्र 72 व्यक्ती निष्पन्न झाले आहे. सदर अपात्र 72 प्रमाणपत्र रद्द करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
- 72 अपात्र व्यक्तींपैकी 32 नामनिर्देशित व्यक्तींनी बनावट कागदपत्रे सादर करून प्रपत्र प्राप्त केल्यामुळे त्यांच्या विरोधात रामनगर पोलीस स्टेशन,चंद्रपूर येथे तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अतुल जताळे यांनी कळविले आहेआहे.