उथळपेठ येथील वाचनालय व ग्रामपंचायत भवनाची इमारत ग्रामविकासाचा केंद्रबिंदु ठरेल – आ. सुधीर मुनगंटीवार


लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर

उथळपेठ या गावात बांधण्‍यात येणा-या वाचनालय व ग्रामपंचायत भवन इमारतीचे भूमीपूजन ०८ ऑक्‍टोंबर रोजी करण्‍यात आले, या इमारतीचे बांधकाम पुढील वर्षीच्‍या ऑक्‍टोंबर पुर्वी पुर्ण होईल व ही इमारत ग्रामविकासाचा केंद्रबिंदु ठरेल अशी अपेक्षा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली. उथळपेठ या गावाच्‍या विकासासाठी आपण सदैव कटीबध्‍द असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले.

दि. ०८ ऑक्‍टोंबर रोजी मुल तालुक्‍यातील उथळपेठ येथे वाचनालय व ग्रामपंचायत भवन इमारतीच्‍या भूमीपूजन कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या उपस्थितीत २.५० कोटी रु. निधी खर्चुन बांधण्‍यात येणा-या या इमारतीचे भूमीपूजन करण्‍यात आले. यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, पंचायत समिती सदस्‍या वर्षा लोनबले, उथळपेठचे सरपंच पलिंद्र सातपुते, उपसरपंच भारती पिंपळे, मुल नगरपरिषदेचे उपाध्‍यक्ष नंदु रणदिवे, भाजपा भद्रावती तालुका महामंत्री नरेंद्र जिवतोडे, पंचायत समिती भद्रावतीचे सभापती प्रविण ठेंगणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, उथळपेठ या गावाने विधानसभा निवडणुकीत ९६ टक्‍के मतदान केले. या गावासाठी मी २ कोटी रु. निधी रस्‍त्‍यासाठी उपलब्‍ध केला. आरो मशिन, बंदिस्‍त नाल्‍या, कृषी वाचनालय आदी विकासकामे या गावात पुर्णत्‍वास आणली. जेव्‍हा जेव्‍हा नागरिकांनी विकासासंदर्भात मागणी केली ती पुर्ण करण्‍यासाठी प्रयत्‍नांची पराकाष्‍ठा केली. चिचाळा व लगतच्‍या सहा गावांमध्‍ये बंद नलिका वितरण प्रणाली द्वार सिंचनाची सुविधा उपलब्‍ध केली, टाटा ट्रस्‍टच्‍या सहाय्याने ९० गावांमध्‍ये शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढविले, जे.के. ट्रस्‍टच्‍या माध्‍यमातुन दुग्‍ध उत्‍पादनाचा प्रकल्‍प राबविला. जिल्‍हयातील ८२४ ग्रामपंचायतींमध्‍ये शेतक-यांना शेतीविषयक मार्गदर्शनाच्‍या दृष्‍टीने वाचनालय हा उपक्रम राबविला. आज वाचनालय व ग्रामपंचायत भवन इमारतीच्‍या बांधकामाबाबत दिलेला शब्‍द पुर्ण होत आहे. याचा मनापासून आनंद होत आहे असेही ते म्‍हणाले.

या इमारतीचे संकल्‍प चित्र ज्‍या पध्‍दतीने तयार करण्‍यात आले आहे त्‍याच पध्‍दतीने देखण्‍या स्‍वरुपाची इमारत उभी रहावी अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली. गावक-यांनी रोजगाराच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न करण्‍याची मागणी केली, या संदर्भात रोजगारासंदर्भात हे गाव आदर्शवत ठरेल यासाठी आपण पुर्ण प्रयत्‍न करु. उथळपेठ हे गाव सोलार गाव करण्‍याची मागणी सरपंचांनी केली. आज राज्‍यात आमचे सरकार नाही. तरीही प्रयत्‍नपूर्वक हे गाव महाराष्‍ट्रातील पहिले सोलार गाव ठरेल यासाठी प्रयत्‍नांची पराकाष्‍ठा करणार असल्‍याचे ते म्‍हणाले.

या परिसरातील गायमुख देवस्‍थानचा पर्यटन विकास करण्‍यासाठी मी प्रयत्‍न केले व या परिसराचा विकास करण्‍यात आला. या संदर्भात अतिरिक्‍त निधी उपलब्‍ध व्‍हावा म्‍हणून वनविभागाच्‍या सचिवांसह बैठक घेवुन आपण निधी उपलब्‍ध होण्‍यासाठी आपण प्रयत्‍न करणार असल्‍याचेही ते म्‍हणाले. पिपरीदिक्षीत येथील शाळा उत्‍तम करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या संदर्भात त्‍वरित अंदाजपत्रक तयार करावे असेही ते म्‍हणाले. पंतप्रधान आवास योजनेच्‍या माध्‍यमातुन या गावात घरकुल मंजुर करण्‍यासाठी देखील आपण प्रयत्‍न करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना मॉडेल गाव करण्‍याच्‍या दृष्‍टीने निधी उपलब्‍ध व्‍हावा यासाठी देखील प्रयत्‍न करेन असे सांगताना लहरो से डरकर नौका पार नही होती कोशिश करने वालो की हार नही होती हे त्‍यांनी ठासुन सांगीतले.

चिरोली-खालवसपेठ-उथळपेठ-नलेश्‍वर हा ५.५० मीटरचा रस्‍ता डांबरी रस्‍ता असून हा रस्‍ता सिमेंटचा करण्‍यात येणार असुन पेव्हिंग ब्‍लॉक, सिसी ड्रेन यासह हा रस्‍ता तयार करण्‍यात येईल असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले.

राज्‍यातील महाविकास आघाडी सरकार निष्‍क्रीय असुन १५ वर्षे सत्‍तेत असताना कॉंग्रेसने ओबीसी बांधवांसाठी काहीही केले नाही. आज भाजपा ओबीसी बांधवांसाठी प्रयत्‍न करत असताना कॉंग्रेसने अपप्रचार चालविला आहे. आम्‍ही सत्‍तेत असताना निराधारांचे अनुदान वाढविले. मात्र हे सरकार पाच-पाच महिने निराधारांचे अनुदान देत नाही, शेतक-यांचे पैसे देत नाही, विहीरींचे पैसे देत नाही. आमचे सरकार पुन्‍हा आल्‍यास निराधारांचे अनुदान १५०० रुपयांपर्यंत वाढवू असेही ते म्‍हणाले. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी गोरगरीबांसाठी अनेक योजना राबविल्‍या. या योजना राबवत गोरगरीबांचे कल्‍याण केल्‍याबद्दल मोदीजींना आशिर्वाद व शुभेच्‍छा देण्‍यासाठी पोस्‍टकार्ड पाठविण्‍याचे आवाहन त्‍यांनी नागरिकांना केले.

यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, देवराव भोंगळे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सरपंच पलिंद्र सातपुते यांनी केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्‍य व नागरिकांची मोठय संख्‍येने उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *