भटाळी गाववासियांकडून पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना शुभेच्‍छा पत्रे

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


*🔸भटाळी गावाचा सर्वांगिण विकास करण्‍यासाठी सदैव कटीबध्‍द – आ. सुधीर मुनगंटीवार*

भटाळी गावाच्‍या सर्वांगिण विकासासाठी मी सदैव कटिबध्‍द आहे. भटाळी गावाच्‍या पुनर्वसनाचा प्रश्‍न अतिशय योग्‍य पध्‍दतीने सर्वानुमते सोडविला जाईल. यासाठी येत्‍या दिड-दोन महिन्‍यात केंद्रीय कोळसा राज्‍यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांना चंद्रपूरात येण्‍याचे आमंत्रण दिले असून, त्‍यांनी होकार दिला आहे. भटाळी गावात रस्‍ते, वाचनालय व इतर समस्‍या तात्‍काळ सोडविण्‍यात येईल. मला आपण मतदानाच्‍या रूपात जो आशिर्वाद दिला आहे तो मी सार्थ ठरवीन, असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक ७ ऑक्‍टोंबर २०२१ रोजी चंद्रपुर तालुक्यातील भटाळी गावात भारतीय जनता पार्टी तर्फे आयोजित सेवा समर्पण अभियान कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, ज्‍येष्‍ठ नेते रामपाल सिंह, तालुका भाजपाध्‍यक्ष हनुमान काकडे, जि.प.सदस्‍या सौ. रोशनी खान, पं.स. सभापती सौ. केमा रायपुरे, पं.स. चे माजी सभापती सुहास गौरकार, राकेश गौरकार, किसन उपरे, सौ. अनिता भोयर, मोहन डोंगरे, अनिल डोंगरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले ,पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्‍या लोकसेवेला २० वर्ष पूर्ण झाले. यासाठी भारतीय जनता पार्टीच्‍या वतीने मा. मोदीजींच्‍या २० वर्षाच्‍या सेवेच्‍या कार्याचा गौरव करण्‍यासाठी सेवा समर्पण अभियान कार्यक्रम भटाळी येथे आयोजित करण्‍यात आला होता. यावेळी गावक-यांकडून पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना सार्वजनिक जीवनाची २० वर्षे पूर्ण झाल्‍यानिमीत्‍त शुभेच्‍छा पोस्‍टकार्डच्‍या माध्‍यमातुन देण्‍यात आल्‍या.

यावेळी भटाळी व पायली गावातील वाचनालयाला स्‍पर्धा परिक्षेची व इतर पुस्‍तके माझ्या स्‍थानिक विकास निधीतुन तात्‍काळ उपलब्‍ध करण्‍यात येईल असे आ. मुनगंटीवार यांनी जाहिर केले. तसेच राज्‍य शासनाने २ कोटी रू. थकित केल्‍यामुळे पुलाचे बांधकाम अर्धवट राहीले आहे. हा ही प्रश्‍न तात्‍काळ सोडविण्‍यात येईल. पायली ते चिचोली रस्‍ता व इरई धरण ते भटाळी गावापर्यंतचा रस्‍ता लवकरच पूर्ण करण्‍यात येईल, असेही आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले.

महात्‍मा ज्‍योतीबा फुले शेतकरी कर्ज वाटप योजना २०१९ अंतर्गत चंद्रपूर जिल्‍हयातील १९२१ तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्‍मान २०१७ योजनेचा लाभ ३६७८९ शेतक-यांना दिवाळीच्‍या आधी कर्जमुक्‍तीचा लाभ देण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍वरीत कार्यवाही करण्‍यात येईल असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी देशगौरव नरेंद्रभाई मोदी यांनी देशाला जगाचे नेतृत्‍व करण्‍यासाठी सक्षम बनविण्‍याचे स्‍वप्‍न बाळगले आहे. ते आपण पूर्ण करणार आहोत. यासाठी विविध योजनांच्‍या माध्‍यमातुन कार्य सुरू आहे. यामध्‍ये देशातील १० कोटी गरीब कुटूंबांना ५ लक्ष रू. चे आरोग्‍य सुरक्षा कवच आयुष्‍यान भारत योजनेतून दिले. देशातील ९९ टक्‍के गावांमध्‍ये शौचालय, स्‍वच्‍छतागृहाची व्‍यवस्‍था केली आहे. ८ कोटी गरीब कुटूंबांना उज्‍वला गॅस योजनेचा लाभ मिळवून दिला. देशातील १३८ कोटी लोकसंख्‍येला १ रू. महिन्‍यात, वर्षाला २ लाख रूपयांचा विमा अपघात योजना लागू केली आहे. मातृवंदन योजनेमधून ५ हजार रू. गर्भवती महिलेला लागू केली.

जागतिक महामारी कोविड ने जगाचे कंबरडे मोडले असताना व भारतातही अनेक मुख्‍यमंत्र्यांनी हात टेकले असता पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे खंबीरपणे या लढाईच्‍या सामन्‍यासाठी उभे राहून २ लक्ष ८६ हजार कोटी रूपयांची गरीब कल्‍याण योजना सुरू केली. त्‍या मधुन नागरिकांना मोफत धान्‍य देण्‍यात आले. २० कोटी महिलांच्‍या खात्‍यामध्‍ये ५०० रू. महिना देवून गोरगरीब स्‍त्रीयांना मदतीचा हात देण्‍यात आला. कोणत्‍याही संकटाला न धाबरता प्रत्‍येक गरीबाला सन्‍मानाने उभे राहण्‍याचे धैर्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी नागरिकांना दिले आहे. प्रत्‍येक शेतक-याच्‍या खात्‍यामध्‍ये वर्षाला ६ हजार रूपये १२ कोटी शेतक-यांच्‍या थेट खात्‍यात देण्‍यासाठी ७२ हजार कोटी रूपये निधी उपलब्‍ध करून दिले. शेतक-यांच्‍या खात्‍यात एवढे पैसे उपलब्‍ध करून देणारा पहिला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आहे. गावोगावी विज पुरवठा करून गरीबांच्‍या झोपडीत प्रकाश पुरविण्‍याचे कार्य पंतप्रधानांनी केले आहे. म्‍हणूनच सेवा समर्पण अभियान देशभर राबविणे व पंतप्रधानांच्‍या पाठीशी उभे राहणे आपले नागरिक म्‍हणून कर्तव्‍यच आहे, असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले.
आ. मुनगंटीवार यांनी भटाळी गावाच्या विकासासाठी 2 कोटी रु निधी उपलब्ध केला असून त्यातून गावात सीमेंट रस्ते , बंदिस्त नाल्या अशी विविध विकासकामे करण्यात आली असल्याचे सांगत माज़ी पंचायत सदस्य सुभाष गौरकर म्हणाले की आ. मुनगंटीवार यांच्या सारखा द्रष्टा नेता आम्हाला लाभला हे आमचे भाग्य आहे. त्यांच्या पुढाकाराने आमच्या गावाचा चेहरामोहरा बदलला असल्याचे सुभाष गौरकर म्हणाले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी राबविलेल्‍या योजनांच्‍या लाभार्थ्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. यात प्रामुख्‍याने किसान सन्‍मान निधी संदर्भात अनिल नथ्‍थु लिपटे, लसीकरणासंदर्भात तुकाराम पिंपळकर, उज्‍वला गॅस योजनेसंदर्भात शकुंतला आकनुलवार, शौचालयासंदर्भात भाऊराव तुराणकर, पंतप्रधान मातृत्‍व वंदन योजनेसंदर्भात सरिता मरस्‍कोल्‍हे, मोफत धान्‍यासंदर्भात शितल रायपुरे, पंतप्रधान घरकुल आवास योजनेसंदर्भात सारिका संतोष निवलकर, यांचा सत्‍कार करण्‍यात आला. त्‍याचप्रमाणे गोंडवाना विद्यापीठात एम.ए. इकोनॉमिक्‍समध्‍ये विशेष प्राविण्‍य प्राप्‍त केल्‍याबद्दल प्रविण उपरे यांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक देवराव भोंगळे यांनी केले. आभार प्रदर्शन सुभाष गौरकार यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *