कंत्राटी वीज कामगारांवर होणाऱ्या अन्याया विरोधात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे बेमुदत उपोषणाचा इशारा.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 25 नोव्हेंबर 2022वीज वितरणाच्या सर्कल वाशी अंतर्गत एकूण 512 कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात 40,000 हुन अधिक कंत्राटी वीज कर्मचारी कार्यरत आहेत.वाशी सर्कल मधील कर्मचाऱ्यांकडून विजेचे काम करून घेण्याचे कंत्राट ऑल सर्व्हिसेस ग्लोबल प्रा. लि., कुसुम मसाला जवळ, गोरेगाव (पूर्व )या एजेन्सीला (कंपनीला )देण्यात आले. ही कंपनी कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे पगार करत असते.या एजन्सी (कंपनी)च्या मार्गदर्शनाखाली कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. पण गेली अनेक वर्षापासून सदर एजन्सी(कंपनी )कंत्राटी कामगारावर वेगवेगळे अन्याय करत असून यामुळे कंत्राटी कामगारांवर मोठा अन्याय होत आहे त्यामुळे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे न्याय व हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे सोमवार दि 28 /11/2022 पासून कामगार उपायुक्त रायगड, खांदा कॉलनी, नवी मुंबई यांच्या कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहीती उरण मध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेले महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे रायगड जिल्हा सचिव कमाल खान यांनी दिली.

सविस्तर वृत्त असे की ऑल सर्व्हिसेस ग्लोबल प्रा लि. या एजेन्सी मार्फत कंत्राटी कामगांराना वेळोवेळी पैशाची मागणी केली जाते. व पैसे न देणाऱ्या कामगारांना कामावरून काढून टाकण्याच्या धमकी देण्यात येते तसेच मुद्दामून कामगारांना वेळेत पगार दिला जात नाही. कामगारांचा पगार मुदामून अडवून ठेवून पैशाची मागणी केली जाते. जोपर्यंत पैसे देत नाहीत तोपर्यंत पगार देणार नाही असा भ्रष्ट व्यवहार सदर एजेन्सी कडून होत आहे. याबाबत कामगारांनी या अन्याया विरोधात आवाज उठविला असता त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सदर एजेन्सी कडून होत आहे.कामावरून काढून टाकण्याच्या धमकीने कंत्राटी (बाह्य स्रोत) कर्मचा-यांमध्ये असंतोष व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम महावितरणा च्या शाखा व उपविभागीय कार्यालयामधील दैनंदिन कामकाजावर होत आहे.

सदर अन्याया बाबत कंत्राटी कामगारांनी लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र सर्व समस्या आहे तशाच आहेत. कंत्राटी कामगारांच्या समस्यांची कोणीही दखल घेत नसल्याने कंत्राटी कामगारांनी शेवटी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात सर्व कंत्राटी कामगारांनी सहभागी असे आवाहन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष – उमेश आणेराव, संघटन मंत्री राहूल बोडके,कोषाध्यक्ष – सागर पवार यांनी केले आहे.

कोट (चौकट ):-

कामगारांनी काम करूनही वेतन दरवेळी 15 ते 20 तारखेनंतरच मिळते. वेतन देण्यासाठी कंत्राटदाराच्या व्यक्तीकडून पैशाची मागणी केली जाते. पैसे न देणाऱ्या कामगारांना धमकी देणे, कामावर न घेणे अशा प्रकारे कंत्राटी कामगारांना त्रास दिले जाते. कंत्राटी कामगारांची कोणतेही चूक नसताना त्यांना या सर्व गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मा.औद्योगिक न्यायालय बांद्रा मुंबईच्या आदेशाद्वारे सरंक्षित कामगारांनाही कामावरून कमी करण्याबाबतच्या ऑर्डर दिलेल्या आहेत. सदरील बाब न्यायालयच्या आदेशाचा अवमान असून रेफरन्स आदेशाचा भंग आहे. कामगारांना विनाकारण त्रास देणाऱ्या ठेकेदार कंपनीवर, एजेन्सी वर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच ठेवणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी एकाच दिवशी दिनांक 28/11/2022 रोजी कंत्राटी कामगारांतर्फे बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
– राहुल बोडके, उपमहामंत्री,महाराष्ट्र प्रदेश,महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *