जनवादी महिला संघटनेतर्फे संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा जळजळीत निषेध.

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 5 नोव्हेंबर2022
संभाजी भिडे वेळोवेळी अत्यंत बेताल, स्त्री-विरोधी आणि प्रतिगामी वक्तव्ये करीत असतात. त्यांना महत्व देण्याची खरं तर काहीच गरज नाही. पण काळ सोकावतो, म्हणून त्या वक्तव्यांचा समाचार घेणे आवश्यक आहे.असे मत उरण मधील महिला सामाजिक कार्यकर्त्या तथा जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील यांनी व्यक्त केले आहे.

एका महिला पत्रकाराला “तू टिकली लाव, मग तुझ्याशी बोलतो. कारण मी तुला भारतमाता समजतो आणि भारतमाता विधवा नव्हती” असे अत्यंत उद्दाम, अस्थानी आणि महिलांच्या सन्मानाला ठेच पोहोचवणारे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केल्याबद्दल जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कमिटीने त्यांचा अत्यंत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.त्याचबरोबर राज्य महिला आयोगाने त्याची तातडीने दखल घेतल्याबद्दल आयोगाचे जनवादी महिला संघटनेने आयोगाचे आभार मानले आहेत.

मुळात भारतमातेची भिड्यांची संकल्पना हीच अत्यंत बुरसटलेली आहे. भारतमाता ही काही शालू आणि सौभाग्य लेणे परिधान केलेली पारंपरिक महिला नाही, तर ती या देशातील जनता आहे.

टिकली हे एक सौंदर्य प्रसाधन आहे आणि ती लावायची की नाही हा प्रत्येक महिलेचा वैयक्तिक प्रश्न आहे. विधवेने टिकली लावू नये, हे सांगणारे हे कोण टिकोजी? ज्या परंपरांचा आणि संस्कृतीचा भिडे आणि संघाची तत्सम मंडळी अभिमान बाळगतात त्या संस्कृतीतील अगदी झाशीच्या राणीपासून ते जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, ताराराणी या महिलांनी वैधव्यकाळात दाखवलेले कर्तृत्व आपण नाकारतो का, हे या भिडे महाशयांनी स्पष्ट करावे, अशी मागणी जनवादी महिला संघटनेने केली आहे. ज्या भाजप-संघाच्या सत्तेचे पाठबळ असल्यामुळे असली बेताल भाषा भिडे वापरतात, त्या सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या वर्तुळातील महिलांना असले काही ऐकवण्याची हिंमत भिड्यांची आहे का ?

भिड्यांच्या या वक्तव्याला अनेक महिला पत्रकार, सुजाण नागरिक आणि संघटनांनी केलेला तीव्र विरोध हा महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि महिलांच्या स्वातंत्र्याचा आदर करणारा आहे, हे सिद्ध करतो.

पण दुसरीकडे, एरव्ही वाचाळ असणारा गोदी मीडिया आणि भाजपच्या महिला नेत्या या मुद्द्यावर मूग गिळून बसले आहेत.

केवळ विधवा महिलांचाच नव्हे तर समस्त महिला वर्गाचा अपमान करणाऱ्या, त्यांचे स्थान त्यांच्या वैवाहिक स्थितीवरून ठरवणाऱ्या तसेच भारतातील ‘टिकली न लावणाऱ्या’ सर्वधर्मीय कर्तृत्ववान महिलांचे समाजातील योगदान नाकारणाऱ्या या स्वघोषित गुरुजींनी देशाची माफी मागावी अशी मागणी जनवादी महिला संघटनेच्या वतीने नसीमा शेख अध्यक्ष, हेमलता पाटील राज्य उपाध्यक्ष,प्राची हातिवलेकर सरचिटणीस यांच्यासह जनवादी महिला संघटना, महाराष्ट्र राज्य कमिटीच्या महिला पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *