

लोकदर्शन 👉
त्यादिवशी वर्गात शिकवताना ॲटनबरोच्या ‘गांधी ‘ चित्रपटाच्या सुरुवातीचा प्रसंग विद्यार्थ्यांना मी दाखविला. चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच गांधीहत्येचे दृश्य कित्ती हुबेहूब चितारले आहे ! सत्याचा मुडदा पाडणार्या तीन गोळ्यांचा तो थरार ! आणि त्यानंतर क्षणभर शहारुन जागीच थबकलेली ती शांतता. गांधींना मारणार्या माथेफिरूचे दहशतवादी थंड व्यक्तिमत्त्व साकारणार्या हर्ष नय्यर या अभिनेत्याचे मला खरोखर कौतुक करावेसे वाटले ; कारण त्याच्या आभिनयाच्या विरोधलयीच्या पार्श्वभूमीवर गांधीजींची तेजस्वी प्रतिमा अधिकच प्रखरपणे पुन्हा एकदा झळाळून उठली.
सर्व शक्तीनिशी गांधी उभा करणारा अभिनेता बेन किंग्जले आणि खलनायकाच्या त्या दमदार अभिनय कौशल्यामुळे जगाच्या इतिहासातील महानायकाच्या खुनाचा तो अतिमहत्त्वाचा प्रसंग चित्रित झाला ;आणि कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनामनांतील महात्मा अमर झाला !
‘ व्हाय आय किल्ड गांधी ? ‘ या चित्रटाचा प्रोमोत काल मी डॉ.अमोल कोल्हे यांना नत्थुरामच्या मुख्य भूमिकेत काम करताना पाहिले. पुढे चित्रपटात कदाचित त्यांच्या वाक्यावाक्याला टाळ्या पडतीलही ; पण ती दाद त्यांच्या समर्थ अभिनयासाठी निश्चितच नसेल. ती दाद असेल त्यातील खटकेबाज संवादांसाठी ! पण मुळात ते संवादच बनावटी आहेत. मी नत्थुराम गोडसे बोलतोय ! हे प्रदीप दळवी लिखित नाटक पूर्वी पाहिले आहे. सभागृहात तेव्हाही तेच लोक टाळ्या पिटत होते. जे पुन्हा यावेळीही पिटतील.
तेव्हाही या नाटकावरुन वादळ उठले होते. ‘कलावंताचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य ‘ या मुद्द्यावर वादविवाद झाले. या नाटकाचा आणि या चित्रपटाचाही मुख्य विषय गांधीजींच्या खुनाचा आहे. खरे तर नाटकातील तत्थ्यामुळे नाही तर खणखणीत संवादामुळे प्रेक्षकांची नाटकाला दाद मिळते. या नाटकात लेखकाने नथुरामचे सहानुभूतीपूर्वक चित्रण करण्याचा प्रयत्न केला ; पण अशा अमानूष माणसाविषयी नेमकी का सहानुभूती बाळगायची ? हा प्रश्नच आहे. म्हणतात की , गोडसेची भूमिका नाकारताना श्रीराम लागू स्पष्टपणे म्हणाले होते : गोडसेचे पडद्यावर व पडद्याबाहेरही समर्थन होऊच शकत नाही.
या नाटकाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वादळाच्या पृष्ठभूमीवर य. दि. फडके यांनी ‘नत्थुरामायण ‘ नावाचे पुस्तक लिहिले आहे. ‘यदिं’सारख्या इतिहास संशोधकाने तटस्थपणे लेखन करून गांधीजींच्या खुनामागच्या ऐतिहासिक सत्याचा वेध घेतला. गोडसेंनी गांधीजींना ठार मारले एवढेच लोकांना माहीत आहे ; पण का मारले हे शोधण्याचा आपण प्रयत्न या नाटकात केला आहे, अशी नाट्यलेखकाची भूमिका आहे ; परंतु लेखकाच्या या दाव्याला हास्यास्पद ठरवत प्रस्तुत नाटकातील सत्याचा अपलाप करणाऱ्या अनेक गोष्टींवर य.दि. फडके यांनी प्रकाश टाकला आहे. हे नाटक संपूर्णपणे इतिहासातील तत्थ्यांवर आधारित आहे, हा लेखकाचा दावाही त्यांनी फोल ठरवला. या नाटकात खुनी माणसाचे उदात्तीकरण आणि इतिहासाचे विकृतीकरण कसे केले आहे , हेही ‘यदीं ‘नी सिद्ध केले आहे.
समाजहिताला आणि देशहिताला बाधा आणणारा असूनही हा चित्रपट आभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे सारेच जण कदाचित पाहतील. त्यात डॉ. कोल्हे अभिनयाचा कस लावून गांधीहत्येमागील तर्कशास्त्र वेगवेगळ्या प्रकारे सांगत सत्याचा गळा आवळत राहतील! संवादाच्या खटकेबाज गोळ्या पुनःपुन्हा झाडत राहतील ; आणि ही हत्या नाही हा ‘वध’ आहे म्हणतील. नत्थुरामला गांधींजींपेक्षा मोठा करण्यासाठी वापरलेला ‘वध’हा शब्द मात्र पुन्हा मनाला खूऽऽप वेदना देऊन जाईल.
असगर वजाहत यांचे एक नाटक आहे , गोडसे @ गांधी. कॉम नावाचे. त्यात कल्पना केली आहे , की समजा गोडसे- गांधींची प्रत्यक्षात भेट झाली असती , तर काय झाले असते ? संवाद हा माणसाचा मूलभूत अधिकार मानणार्या गांधीजींची प्रखर बुद्धिमत्ता , त्यांचे ज्ञान, अनुभव, तर्क आणि विचारांपुढे गोडसे निश्चितच टिकू शकला नसता ; त्यामुळे गांधीजींच्या अनुपस्थितीत त्यांच्या पाठीमागे या चित्रपटातील गांधीजींच्या खूनाचे सारे युक्तिवाद एकतर्फी म्हणूनच फोल ठरतात.
– डॉ. तीर्थराज कापगते
३३ / बी-३,पत्रकार सहनिवास
महात्मा गांधी मार्ग , नागपूर-१