अ.भा.मराठी ‘तेच ते’ साहित्य संमेलन ?     

लोकदर्शन 👉 अविनाश पोईंकर

 

“यंदाचे अ.भा.वगैरे निमंत्रित साहित्यिक किमान पुढची ५ वर्षे आपली जागा सोडून नव्या साहित्यिकांना संधी देतील ?? नव्हे, महामंडळाने असा नियमच करायला हवा.”

समज आली तेव्हापासून अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने होणारे वाद, उलट सुलट चर्चा ऐकतो-वाचतो आहे. यंदा ९४ व्या नाशिक येथील संमेलनात कवी कट्ट्याच्या निमित्ताने कवींची केली जाणारी थट्टा देखील अनुभवतो आहे. महात्मा फुलेंचा साहित्य संमेलनाबाबतचा विचार आणि भुमीका अजूनही बहूजन वर्गांना कळू नये, याचेच आश्चर्य वाटते. मुळात अ.भा.मराठी साहित्य संमेलन कुणाचे ? हा मुद्दा दरवर्षीप्रमाणे यंदाही वेशीवरच टांगला गेलाय. दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या घामाचे करोडो रुपये खर्च करुन जातीय राजकारणाच्या चिखलात गडप होत जाणारे हे संमेलन साहित्याला समृद्ध करणारे आहेत कि काही मोजक्या महाभागांना आयते व्यासपीठ मिळवून देत विशिष्ट कंपूंना मोठे करणारे आहे, हा विचार आपण का करत नाहीय ?

मागील ५ वर्षाच्या साहित्य संमेलनाच्या पत्रिकेवर नजर घालली तर काही अपवाद वगळता तेच कवी आणि त्याच कविता दिसतील. बाकी मंडळीही आळीपाळीने तेच सांगतील. मग या संमेलनात वेगळे काय ? तळागाळातील साहित्याला आणि साहित्यिकांना हे संमेलन का सामावून घेत नसावे, हा यक्षप्रश्न आहे. एकट्या कवीकट्यात यंदा ९०० कवी केवळ एक कविता घेवून हजारो कि.मी.चा प्रवास करत, स्वत:चेच पैसे खर्च करत सहभागी होत आहेत. एवढेच नव्हे तर कवीकट्यात निवड झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून येत आहेत, सादरीकरणानंतच्याही येतील. तर दुसरीकडे जे अनेकदा निमंत्रितांच्या कविसंमेलनात सहभागी झालेले आहेत, पुन्हा तेच कवी त्याच मंचावर मानधन, प्रवास, भोजन, निवासाच्या सर्व सुविधांसह तीच कविता घेवून सहभागी होतात. ही गोष्ट नव्या दमाच्या साहित्यिकांवर निश्चितच अन्यायकारक आहे. एका प्रस्थापित कवीने तर आतापर्यंत तब्बल १८ वेळा अ.भा.मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित सहभागी झाल्याचा फेसबुकवर पुरावाच दिलेला आहे. हे बघून चक्रावल्यासारखं झालं. यातून १७ नव्या साहित्यिकांना संधी उपलब्ध होवू शकली असती. असे पुन्हा बरेच सापडतील. खरे तर एकदा साहित्य संमेलनात निमंत्रित म्हणून सहभागी झालेल्या साहित्यिक, कवींना किमान ५ वर्षे निमंत्रितांच्या पंक्तीत स्थान देवू नये, त्याऐवजी नव्या लेखकांना संधी द्यावी. असा महामंडळाने हल्ली कठोर निर्णय घेण्याची नितांत गरज वाटते. साहित्यिक हे विचारवंत वगैरे असतात (भलेही कृती शून्य असो) तर त्यांनीच असा पायंडा स्वत:हून घालण्याची गरज आहे. पण दुस-यांना संधी देण्याची भुमीका विचारवंत वगैरे असलेले साहित्यिक घेतील ?

महामंडळाच्या ज्या प्रमुख शाखा आहेत, त्यांनीच जिल्हानिहाय तळागाळातील साहित्यिकांचा शोध घेवून संधी देणे महत्त्वाचे आहे. नाहीतर प्रत्येकालाच साहित्य संमेलनात यंदा आपल्या परिसरातून कोण निमंत्रित असणार, याचा अंदाज आधीच माहिती असतो. अर्थात ठरलेली सेटींगबाज कंपूशाही तशी जिल्हानिहाय सक्रियच आहे.

हल्ली साहित्य संमेलने लग्नासारखी, पिकनिकसारखी झालीय. या संमेलनाच्या निमित्ताने एकमेकांच्या लेखक-रसिक भेटी होतात हे विशेष. ग्रंथदालनामुळे हवी ती पुस्तके उपलब्ध होतात, करोडोंची मराठी पुस्तकांची उलाढाल होते, हा आनंद काही औरच. यापलीकडे फार तर संमेलनातून हाती येतं, असं जाणवत नाही. उलट छोट्या स्वरुपाची प्रादेशिक साहित्य संमेलने साहित्याचे बिजारोपन, संवर्धन करण्यात यशस्वी होत असल्याचे जाणवते. संत तुकाराम ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रंथातून जे कृतीयुक्त विचार मांडले, यापेक्षा फार काही वेगळे मांडले जाताहेत, असंही नाही. ज्ञानपीठ विजेते साहित्यिक साहित्य संमेलनाला उगीचच जाणे का टाळतात, याचा बारकाईने विचार करण्याची गरज आहे.

साहित्य संमेलनापेक्षाही उच्चतम साहित्य निर्मीती करणे फार महत्त्वाचे आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि दलीत चळवळीतील कार्यकर्त्या साहित्यिकांचा आदर्श घेणे जरुरी आहे. यांचीही उपेक्षाच झाली आणि आताही परिस्थिती वेगळी नाही. तळागाळातील लेखकांसाठी हे केवळ कवीकट्टा आणि यंदापासून सुरू झालेले गझल कट्टाच ठेवतील. आपणच जागृत होवून संमेलनाचा मोह सोडून आपल्या सृजनशिलतेकडे लक्ष देणे महत्त्वाचे वाटते. साहित्य महामंडळाच्या विभागिय शाखेवर नव्या लेखकांनी येणे फार गरजेचे आहे. व्यवस्था परिवर्तनासाठी मुळात हात घालण्याची ताकद आपण कधी दाखवणार आहोत ? आवाज दाबणारे असतीलही पण बोलणारचेच संपत चाललेय म्हणून कदाचित संमेलनाला पुरोगीमीत्वाचा उघड ढोंगीपणा येत आहेत. संमेलनाध्यक्षाचं तर सोडाच, यासाठी किती सोंगे घेवून ढोंगी व्हावं लागतं, हे न बोललेलेच बरे. बरं ते जावू द्या, किमान यंदाच्या तरी अखिल भारतीय वगैरे झालेल्या साहित्यिकांनी किमान पुढची पाच वर्षे संमेलनात स्वत:च्या नावाचा डंका पिटण्यापेक्षा इतर साहित्यिकांना सामावून घेण्यासाठी इमाने-इतबारे प्रामाणिकता दाखवली तरीही साहित्याची सेवा तुम्ही करत आहात, असे समजायला हरकत नाही. तसंही साहित्यिक हे विचारवंत, भुमीका घेणारे वगैरे असतात, असा गोड समज करुन घ्यायला हरकत नाही.

 

– अविनाश पोईनकर, चंद्रपूर
संपर्क – ७३८५८६६०५९
avinash.poinkar@gmail.com

•••••••••••••••••••••••••••

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *