Home
Home शैक्षणिक “वाचन संस्कृतीचं पुनरुज्जीवन हे काळाची गरज” — प्रा. राजा जगताप ♦️तेरणा...

“वाचन संस्कृतीचं पुनरुज्जीवन हे काळाची गरज” — प्रा. राजा जगताप ♦️तेरणा महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा समारोप

लोकदर्शन धाराशिव👉राहुल खरात

धाराशिव (दि. ९) — तेरणा महाविद्यालय, धाराशिव येथे अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित समारोप सोहळ्यात प्रमुख वक्ते प्रा. राजा जगताप (मराठी विभाग प्रमुख, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव) यांनी “मराठी भाषा: प्राचीनत्व व वर्तमान परिस्थिती” या विषयावर सखोल विचार मांडले.
या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या जतन-संवर्धनासाठी “वाचन संस्कृती वाढवा” असं आवाहन केलं.

प्रा. जगताप म्हणाले, “पुस्तके मस्तकं घडवतात. वाचनातूनच व्यक्तिमत्व, विचार आणि अनुभव समृद्ध होतात. मराठी भाषेचा इतिहास अफाट आहे आणि तिचं वैभव संवादाच्या पलीकडचं आहे — ती आपल्या संस्कृतीची आणि अस्मितेची वाहक आहे.”
सध्याच्या काळात इंग्रजी भाषेचं अतिक्रमण आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे मराठी भाषेचं अवमूल्यन होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच विद्यार्थ्यांनी डिजिटल माध्यमांतूनही मराठीत संवाद साधावा, असं आवाहन केलं.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी. बी. मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मातृभाषेच्या अभिमानासाठी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, आणि अशा उपक्रमांमुळे मराठी संवर्धनाला बळ मिळते, असं मत व्यक्त केलं.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अविनाश ताटे यांनी करताना “अभिजात भाषा” दर्जा मिळण्यासाठी आवश्यक निकष आणि मराठीच्या वैचारिक परंपरेविषयी माहिती दिली.

या वेळी प्रमुख उपस्थितीत डॉ. चंद्रजीत जाधव (क्रीडा विभाग प्रमुख), डॉ. अनघा तोडकरी (सांस्कृतिक विभाग प्रमुख) आणि डॉ. तुळशीराम उकिरडे (मराठी विभाग प्रमुख) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी मनीषा जांगीड हिने केले, तर आभार कुमारी गायत्री जांगीड हिने मानले.

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त महाविद्यालयात निबंध स्पर्धा, काव्यवाचन, काव्यलेखन आदी विविध उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here