सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांच्या एकत्रित माहितीसाठी पोर्टल तयार करणार वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी या पोर्टलमुळे मदत होणार

मुंबई, दि. ४ – राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दररोज विविध रुग्ण उपचारांसाठी दाखल होत असतात. या रुग्णांची एकत्रितपणे माहिती मिळावी व त्याद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संशोधनाकरिता मदत व्हावी या दृष्टीने एक पोर्टल तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत ‘पेशंट मॉनिटरींग अँड क्लिनिकल प्लॅटफॉर्म’चे आहीलवेल या कंपनीने आज मंत्रालयात सादरीकरण केले. यावेळी वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, उपसचिव प्रकाश सुरवसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले की, आयहीलवेल या कंपनीने पुणे महानगरपालिकेसोबत काम करुन जवळपास दररोज ७० ते ८० रुग्णांचे मॉनिटरिंग केले असून या रुग्णांची प्राथमिक माहिती तयार केली आहे. याच धर्तीवर राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी एक पोर्टल तयार करुन या पोर्टलवर शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती, कोविड व नॉन कोविड रुग्णांचा तपशिल, त्यांना देण्यात आलेले उपचार व औषधे याबाबतची माहिती एकत्रितपणे उपलब्ध होतील व त्याचा फायदा वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संशोधनाकरिता शक्य होईल असे सांगून मंत्री श्री. अमित देशमुख यांनी या पोर्टलमुळे उपचारपध्दतीची एसओपी तयार करणे शक्य होईल आणि याचा फायदा राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या जनतेस सुध्दा होणार असल्याचे सांगितले. वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन श्री. देशमुख यांनी यावेळी केले.

यावेळी यावेळी आयहीलवेल या कंपनीने सादरीकरण करताना पोर्टलद्वारे सर्व माहिती एक‍त्रितरित्या कश्या पध्दतीने प्राप्त होणार आहे, संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना या माहितीचा उपयोग कसा होणार आहे, संशोधन आणि अभ्यास यासाठी हे कसे पूरक ठरणार आहे याविषयीची माहिती दिली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *