पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची वैचारिक उंची एव्‍हरेस्‍ट पेक्षा ही मोठी – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


*🔸निवडणुक जिंकण्‍यापेक्षा समाजाची मने जिंकणा-यांची संख्‍या वाढविण्‍याची आवश्‍यकता*

*पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी गौरव विशेष प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्‍न*

 

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी अमितभाई शाहा यांच्‍या सोबतीने पक्ष संघटनेच्‍या वाढीसाठी केलेल्‍या अथक परिश्रमातुन भाजपाचे १० कोटी सदस्‍य झालेत. भाजपा जगातील प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला. या दहा कोटी सदस्‍यांच्‍या आयुष्‍यातला एक मिनीट नरेंद्रभाईंच्‍या खात्‍यात जमा झाला तर नरेंद्रभाई मोदी यांचे आयुष्‍य वाढेल व देश सेवेसाठी त्‍यांना अधिक वेळ मिळेल. नरेंद्रभाई मोदी यांची वैचारिक उंची एव्‍हरेस्‍टपेक्षा मोठी असुन चोवीस तास देशाच्‍या कल्‍याणाचा, प्रगतीचा विचार करणारा पंतप्रधान आम्हाला लाभला हे आमचे भाग्‍य आहे. असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दि. ०३ ऑक्‍टोंबर रोजी भाजपा चंद्रपूर महानगर पर्यावरण समिति द्वारा आयोजित पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी जन्‍मदिन गौरव विशेष प्रदर्शनीच्‍या कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते.

यावेळी माजी केंद्रीय गृहराज्‍य मंत्री हंसराज अहीर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, भाजपा महानगर कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, भाजयुमो प्रदेश महामंत्री विवेक बोडे, पर्यावरण समितीच्‍या अध्‍यक्षा सौ. प्रिती भुषणवार, महामंत्री अमित कासनगोट्टूवार, प्रतिक तिवारी, अविनाश उत्‍तरवार, निलेश चकनलवार, सुमित तिवारी, परिक्षित तिवारी आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी जय-जवान जय किसानचा नारा दिला. भारतरत्‍न अटल बिहारी वाजपेयी यांनी जय-जवान जय किसान जय विज्ञान ची जोड त्‍याला दिली. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान असा नारा देत वेगळा आयाम दिला. गुरुत्‍वाकर्षणाचा शोध लावणारे शास्‍त्रज्ञ न्‍युटन यांच्‍या नावात आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्‍या नावात साम्य असुन सतत नाविन्‍याचा ध्‍यास घेणारे नरेंद्रभाई मोदी यांनी गोरगरिबांच्या उत्‍थानासाठी, शेतक-यांच्‍या कल्‍याणासाठी, महिला, युवक आदी सर्व घटकांसाठी विविध योजना व उपक्रम राबविले. माजी राष्‍ट्रपती ए.पी.जे. अब्‍दुल कलाम म्‍हणाले होते कोणीही एक व्‍यक्‍ती देश घडवू शकत नाही. परंतु देश घडविण्‍याचा ध्‍यास घेतलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या पाठीशी देश उभा राहीला तर देश निश्चितपणे घडेल. नरेंद्रभाई मोदी यांनी राबविलेल्‍या उपक्रम व योजनांची प्रदर्शनी आयोजित करण्‍याचा हा उपक्रम खरोखरच उपक्रम अभिनंदनीय आहे. ज्‍या शिक्षण संस्‍थांनी आपले विद्यार्थी या आयोजनात पाठविले त्‍या संस्‍थांचे मी अभिनंदन करतो. विद्यार्थ्‍यांच्‍या मनात अनेक नविन गोष्‍टी करण्‍याची इच्‍छा असते. त्‍यांना चालना देण्‍याची आवश्‍यकता आहे. या आयोजनाच्‍या माध्‍यमातुन विद्यार्थ्‍यांमधील सुप्‍त गुणांना चालना मिळणार आहे. १६ ऑगस्‍ट १९४२ रोजी चिमुर येथे क्रांती झाली. तर वर्धा जिल्‍हयातील आष्‍टी येथे स्‍वातंत्र्याची मोठी क्रांती झाली. स्‍वातंत्र्याची पहिली पहाट चंद्रपूर आणि वर्धा जिल्‍हयातील नागरिकांनी बघीतली. या दोन्‍ही जिल्‍याचा पालकमंत्री होण्‍याचा मला भाग्‍य मला लाभले. अर्थमंत्री म्‍हणून सेवाग्राम विकास आराखडयासाठी मी निधी उपलब्‍ध करु शकलो याचा मला अभिमान आहे. आता पर्यावरणाच्‍या क्षेत्रात क्रांतीची आवश्‍यकता आहे. निवडणुका जिंकणे हे आमचे अंतिम लक्ष्‍य नसुन समाजाची सेवा करणे ही आमची प्राथमिकता आहे. निवडणूक जिंकण्‍यापेक्षा समाजाची मने जिंकणा-यांची संख्‍या वाढविण्‍याची आवश्‍यकता असल्याचे ते यावेळी बाेलतांना म्‍हणाले. उत्‍कृष्‍ठ आयोजनाबद्दल पर्यावरण समितीच्‍या अध्‍यक्षा सौ. प्रिती भुषणवार व त्‍यांच्‍या सहका-यांचे अभिनंदन त्‍यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सौ. प्रिती भुषणवार यांनी केले. संचालन मंजुषा हलकरे यांनी केले. यावेळी महापौर सौ. राखी कंचर्लावार, डॉ. मंगेश गुलवाडे यांचीही भाषणेही झाली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *