स्टिंग ऑपरेशनने 36 तासात पकडली बाळ विक्री करणारी टोळी

* यवतमाळ व अकोला महिला बाल कल्याण विभागाची संयुक्त कारवाई

यवतमाळ : ‘बाळ दत्तकसाठी उपलब्ध आहे’ असा मेसेज यवतमाळ जिल्ह्यात व्हायरल झाल्यापासून 36 तासात स्टिंग ऑपरेशन करून यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील 21 दिवसाच्या मुलीची विक्री करणाऱ्या टोळीस अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बाल कल्याण समिती अध्यक्ष यांनी स्वतः डमी पालक बनून ही घटना पुढे आणली आहे. तसेच अकोला आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांच्या बाल संरक्षण यंत्रणांनी योग्य समन्वय साधत आज संध्याकाळी बाळालाही ताब्यात घेतले आहे.
याबाबतच्या सविस्तर माहितीनुसार “बाळ दत्तकसाठी उपलब्ध आहे, निसंतान लोकांनी संपर्क साधावा” असा संदेश राज्यात व्हायरल होत होता. सदर मेसेज अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी वाचल्यावर त्यांनी व्हायरल मेसेजची खात्री करण्यासाठी डमी पालक म्हणून मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवर फोन केला असता आर्थिक लाभाच्या लालसेने वणी येथील रहिवासी महिला बाळ देण्यास तयार झाली. त्यानंतर यवतमाळ व अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी आणि महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांनी स्टिंग ऑपरेशनची कार्यवाही करण्याचे नियोजन केले.
अकोला बाल कल्याण समिती अध्यक्ष व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी स्वतः डमी पालक बनून बाळ ताब्यात घेवून व्यवहार केल्याचा यावेळी बनाव केला व इशारा मिळताच पोलीस पथकाने धाड टाकून २१ दिवसाच्या नवजात मुलीची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीस ताब्यात घेवून कारवाई केली. यामध्ये अकोला आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांच्या बाल संरक्षण यंत्रणांनी योग्य समन्वय साधत मोठा अनर्थ टाळला. या प्रकरणातील मध्यस्थी महिला ही वणी येथे बेटी फाऊडेशन नावाने संस्था चालवीत असून तिने त्याच परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबात चौथी मुलगी झाली व कुटुंबाची अत्यंत हालाखीची परिस्थिती असल्याने त्याचा फायदा घेत. पालकाना बाळ देण्याकरिता प्रवृत्त केले.
पोलीस पथकाने वेळीच प्रसंगावधान राखून सर्व टोळीस जेरबंद केले व सहा आरोपीस अटक केली. संबधितावर भा.द. सं. ३७० व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ८१ व ८७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. बाल कल्याण समिती यांच्या आदेशाने बाळाला ताब्यात घेवून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
या कार्यवाहीत जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांचे महत्वपुर्ण मार्गदर्शन लाभले व दोन्ही जिल्ह्यातील बाल संरक्षण यंत्रणा व पोलीस विभाग यांच्या समन्वयाने हे स्टिंग ऑपरेशन यशस्वी झाले व बेकायदेशीर रीत्या बालकाची विक्री करणा-या टोळीस अटकाव करून मोठा अनर्थ टाळल्या गेला.
“अवैधरीत्या, कोणत्याही कारणाने बालकाची खरेदी व विक्री हा गंभीर गुन्हा आहे त्यामुळे कोणत्याही आमिषास नागरिकाने बळी पडू नये, अश्या प्रकारे कोणत्याही कारणाने बालकाची खरेदी विक्री होत असल्यास अथवा बेकायदेशीर दत्तक प्रक्रिया होत असल्यास महिला व बाल विकास विभाग, दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे अथवा १०९८ चाईल्ड हेल्प लाईन वर माहिती द्यावी.” असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी केले आहे.
सदर कारवाईत यवतमाळचे बाल कल्याण समिती अध्यक्ष अॅड. सुनील घोडेस्वार, अकोलाच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, अकोलाचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, यवतमाळ चे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, जिल्हा परिविक्षा अधिकारी गजानन जुमळे, महिला व बाल विकास कर्मचारी रविंद्र गजभिये, सामाजिक कार्यकर्त्या वनिता शिरफुलें, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष चे पोलीस निरीक्षक बबन कराळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक विवेक देशमुख, बाल अत्याचार प्रतिबंधक कक्षच्या सहा. पोलीस निरीक्षक शुभांगी आगाशे तसेच पोलीस कर्मचारी अरविंद बोबडे, अशोक आंबीलकर, अर्चना मेश्राम, प्रमिला ढेरे, उल्हास कुरकुटे, किशोर झेंडेकर, सलमान शेख, देवेंद्र गोडे याचे कारवाईसाठी सहकार्य लाभले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *