प्रियांका बर्वे लाईव्ह कॉन्सर्ट” – रसिक डोंबिवलीकरांना दंग करणारी सुरेल मैफिल

लोकदर्शन डोंबिवली : गुरुनाथ तिरपणकर

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित “अमृतोत्सव” या सहा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या शृंखलेतील पाचव्या पुष्पा मध्ये नुकतंच “प्रियांका बर्वे लाईव्ह कॉन्सर्ट” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रियांका बर्वे यांनी आपल्या अनोख्या अंदाजात सादर केलेल्या विविध प्रकारच्या गाण्यांनी रसिकांना दंग करून टाकणारी ही मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली. या कार्यक्रमास LIC of India चे विशेष प्रायोजकत्व लाभले होते. आजच्या तरुणाईच्या पसंतीस उतरणाऱ्या unplugged अंदाजात प्रियांका बर्वे यांनी सुगमसंगीत, भावसंगीत, भक्तीसंगीत, नाट्यसंगीत, गझल, ठुमरी आणि लावणीही सादर केली. रोज कानावर पडणारी ही गाणी वेगळ्या स्वरूपात रसिकांनी अनुभवली. रसिकांच्या  विविध फर्माईशी आणि मैफिलिच्या माहोलाला अनुसरून विविध गाणी प्रियांका वर्वे यांनी सादर केली. अवचिता परिमळू, पाय नका वाजवू, त्या तिथे पलीकडे, लपविलास तू हिरवा चाफा ह्या सारखी जुन्या काळातील गाणी तर केव्हा तरी पहाटे, मी मज हरखून, आज जाने की जिद ना करो, रंजिशी सही ही गाणी गझलच्या ढंगात सादर करण्यात आली. नाही मी बोलत नाथा, घेई छंद मकरंद, ही नाट्यपदे तर मी वसंतराव या चित्रपटातील प्रियांका यांनीच गायलेले बिंदिया ले गयी हमारी ही गाणी सादर करण्यात आली. पानी पानी रे, लग जा गले के फिर, इन् आखोंकी मस्ती, नैना मिलयके, दमादम मस्त कलंदर, ये दिल तुम बिन कही लगता नहीं,रंग सारे गुलाबी चुनरिया रे यासारखी हिंदीतील आणि कानडा राजा पंढरीचा, या कातरवेळी पाहिजेस तू जवळी, रेशमाच्या रेघांनी कर्नाटकी कशिदा, बुगडी माझी सांडली ग,मी तर स्वामिनी तुझी प्रिय रे, वाटा वाटा वाटा ग यासरख्या मराठी अजरामर गीतांनी ही अविस्मरणीय मैफिल सजली. आजी ज्येष्ठ गायिका मालती पांडे यांच्याकडून गायनाचा मिळालेला वारसा आणि आजवर घेतलेली मेहनत ही प्रियांका बर्वे यांच्या सुमधुर सादरीकरणातून रसिकांना भावली. प्रियांका बर्वे यांच्या साथसंगतीला असणाऱ्या वादकांच्या उत्कृष्ठ सादरीकरणामुळे मैफिल आणखीनच रंगत गेली. ढोलकी व परकशन वर रोहन वनगे, कीबोर्ड वर अनय गाडगीळ, तबल्यावर प्रसाद पाध्ये, बासरीवर निनाद मुळवकर आणि गिटारवर अमोघ दांडेकर यांच्या वादनाने आणि जुगलबंदीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सहा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या निधिसंकलनातून हम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या दोन विज्ञान प्रयोग शाळांपैकी पहिल्या भारतीय शिक्षा समिती जम्मू काश्मीर द्वारा संचालित “दशमेश भारतीय विद्या मंदिर, दशमेश नगर” येथील प्रयोगशाळचे दिनांक १८ मार्च २०२४ रोजी उद्घाटन करण्यात आले आहे. मंडळाने दिलेल्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या दुसऱ्या प्रयोगशाळेचे काम देखील प्रगती पथावर असून जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात त्याचे उद्घाटन होईल, हम ट्रस्टच्या मनोज नशिराबादकर यांच्या मेहनतीतून पुढील शैक्षणिक वर्षासाठी दोन्ही प्रयोगशाळा जम्मू काश्मीर खोऱ्यातील विद्यार्थ्यांसाठी सज्ज असतील याचा मंडळाला आनंद आहे असे मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे म्हणाले. अमृतोत्सवातील सहाव्या आणि अखेरच्या पुष्पात दि. ४ मे २०२४ रोजी “समर्पण” या कार्यक्रमातून भारतरत्न पंडित भीमसेनजी जोशी आणि पद्मभूषण श्रीनिवासजी खळे यांना सांगितिक मानवंदना वाहण्यात येणार आहे. ज्येष्ठ संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात भिमसेनजींचे शिष्य ज्येष्ठ गायक पंडित जयतीर्थ मेवूंडी, खळेकाकांचे शिष्य सुप्रसिध्द संगीतकार-गायक अजित परब आणि गायिका गौरी बोधनकर गाणी पेश करणार आहेत तर निवेदनाची बाजू विघ्नेश जोशी सांभाळणार आहेत. रसिकांनी अमृतोत्सवाच्या या सहाव्या पुष्पास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन कार्यवाह‌ श्री बल्लाळ केतकर यांनी केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *