सेवेपेक्षा श्रेष्‍ठ दुसरे कोणतेही साधन नाही – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर


*७१ आदिवासी समाज सेवकांचा व ७१ निराधार बांधवांचा सत्‍कार समारंभ संपन्‍न*

*भाजपा नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांचे अभिनव आयोजन*

माझ्या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात आदिवासी समाजाच्‍या विद्यार्थ्‍यांना नामांकित शाळांमध्‍ये शिक्षण देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. २ लक्षापेक्षा जास्‍त आदिवासी विद्यार्थ्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला. निराधार, वृध्‍द, परित्यक्ता, दिव्‍यांग, आदिंना संजय गांधी निराधार योजना व सामाजिक अर्थसहायाच्‍या अन्य योजनांच्‍या अनुदानात रू. ६०० वरुन १००० इतकी वाढ करण्‍याचा निर्णय आम्‍ही घेतला. तर दोन अपत्‍य असणा-यांना १२०० रु. देण्‍याचा निर्णय घेतला. ज्‍या आदिवासी समाजसेवकांचा सत्‍कार आज करण्‍यात आला. त्‍यांच्‍या सेवेचे कितीही कौतुक केले तरी कमी आहे. त्‍याचप्रमाणे निराधार बांधवांचा सत्‍कार आयोजित करुन आयोजकांनी नवा आदर्श प्रस्‍थापित केला आहे. भारतीय जनता पार्टीने नेहमीच सत्‍तेपेक्षा सेवेला महत्‍व दिला आहे. सेवेपेक्षा श्रेष्‍ठ दुसरे कोणतेही साधन नाही, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक ०३ ऑक्‍टोंबर रोजी भाजपा नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्‍या माध्‍यमातुन महेश भवन तुकूम येथे आयोजित आदिवासी सेवकांचा व निराधार बांधवांच्‍या सत्‍कार कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते.

यावेळी भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते प्रमोद कडू, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, कार्यक्रमाचे संयोजक सुभाष कासनगोट्टूवार, माजी महापौर सौ. अंजली घोटेकर, मनपा गटनेत्‍या सौ. जयश्री जुमडे, महिला व बालकल्‍याण सभापती चंद्रकला सोयाम, ब्रिजभुषण पाझारे, रवी गुरनुले, आदिवासी समाजाचे नेते वाघुजी गेडाम, भाजपा महानगर कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, भाजयुमो प्रदेश महामंत्री विवेक बोढे, भाजपा जिल्‍हा महामंत्री नामदेव डाहुले, सौ. मंजुश्री कासनगोट्टूवार, सौ. प्रज्ञा बोरगमवार, धनराज कोवे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, आम्‍ही नेहमी जनतेच्‍या कल्‍याणाचा विचार केला आहे. सत्‍तेच्‍या खुर्चीपेक्षा जनतेच्‍या मनातील खुर्ची आमच्‍यासाठी महत्‍वाची आहे. विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही. या सुत्रानुसार आम्‍ही राजकीय क्षेत्रात कार्यरत आहोत असेही आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले. नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्‍या आयोजनाचे त्‍यांनी विशेष कौतुक केले. या कार्यक्रमात ७१ आदिवासी समाज सेवकांचा तसेच ७१ निराधार बांधवांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाला भाजपाचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here