कोरपना कृ. उ. बा. समितीकडे शेतकऱ्यांची पाठ!

शंकर तडस
कोरपना :
कोरपना तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत गावागावांमध्ये अवैध व्यापारी सोयाबीन व कापसाची थेट खरेदी करत असल्याचे दिसून आल्याने काही अवैध व्यापाऱ्यांवर नुकतीच कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला. वास्तविक पाहता बाजार समित्या ह्या शेतकऱ्यांच्या हितासाठीच निर्माण झालेल्या असल्या तरी यावर अंकुश मात्र व्यापाऱ्यांचा चालत आलेला दिसून येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या बाजार समितीयांकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.
शेतकऱ्यांच्या हाती पीक आले असता त्याला लुटण्यासाठी दलाल व व्यापारी वर्ग टपलेला असतो. तो आपापल्या पद्धतीने ‘सेटिंग’ करून भाव कमी करणे, वजनामध्ये फेरफार करणे, हमाली, दलालीचे पैसे घेणे अशा विविध मार्गाने शेतकऱ्यांची लूट करीत असतो. पीक हाती येण्यापूर्वी यंदा खूप दर मिळेल असा गाजावाजा केला जातो. शेतकरी जोमाने पीक घेण्यास सुरुवात करतो.  मात्र पीक  हाती आलं तर मोठ्या प्रमाणात भाव पाडले जातात. यंदा सोयाबीनबाबतीत तोच गैरप्रकार घडला. किमान एक हजार रुपये तफावतीने सुरुवातीला खरेदी झाली. गरजू शेतकऱ्यांना पीक त्वरित विकल्याशिवाय पर्याय नसतो. थोड्याशा पिकासाठी बाजार समितीमध्ये जाणे शेतकऱ्याला परवडणारे नसते. त्याच्यामागे विविध कामे असल्याने वेळ मिळत नाही. त्यामुळे थेट गावात येणाऱ्या अवैध व्यापाऱ्यांना तो आपले पीक विकून मोकळा होतो. काही व्यापारी तर आधीच काही रक्कम शेतकऱ्यांना वाटप करतात. त्यामुळे अवैध मालविक्रीला चालना मिळत आहे. गावात शेतकरी लुटला जातो हे मान्य केले तरी बाजार समितीमध्ये काही फारसे वेगळे चित्र नसते. बाजार समितीमध्ये गेल्यास तेथेही विविध प्रकारची पिळवणूकच होते. त्यामुळे सरसकट  घरीच पीक विकणे शेतकऱ्यांना सोयीचे जाते.  परिणामी बाजार समितीमध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. मागील वर्षी बाजार समितीमध्ये एका व्यापाऱ्याने वजनात फेरफार केल्याचे उघडकीस आले होते.  त्यावेळी कारवाई सुद्धा करण्यात आली होती. सध्यातरी शेतकऱ्यांचा वाली कोणीच नाही. तक्रार करावी तर व्यापारी, अधिकारी, नेते या सगळ्यांचे साठे-लोटे असते. म्हणून थोडे नुकसान सहन करूनही शेतकरी घरीच आपला माल विकतात. यावर उपाय म्हणून बाजार समित्यांनी शेतकरी हिताकडे लक्ष देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्याची गरज आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *