



♦️प्राचार्या स्मिता चिताडे यांचा पुढाकार
♦️डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ते महानिर्वाण दिनापर्यंत राबविणार योजना
लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना – गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने एक कर्मचारी एक विद्यार्थी असे एकूण ९० विद्यार्थी दत्तक घेऊन वाचन संस्कृती जपण्याचा संकल्प प्राचार्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या स्मिता चिताडे उपस्थित होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे, उपमुख्याध्यापक अनिल काकडे, उपप्राचार्य प्रफुल माहूरे, पर्यवेक्षक हनुमान मस्की, भिमस्वरुप हस्ते, तुराणकर सर उपस्थित होते. यावेळी प्रिया दुर्गे व प्रा. राकेश ठवरे यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्या स्मिता चिताडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरात पोहचवण्याची व अंगीकृत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
शाळेत कार्यरत ९० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येकांनी वाचनासाठी एक विद्यार्थी दत्तक घेण्याची योजना आखली. बाबासाहेबांच्या १४ एप्रिल २०२३ जयंतीपासून ते ६ डिसेंबर २०२३ महानिर्वाणदिनापर्यंत ही योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन वामन टेकाम यांनी केले तर आभार प्रदर्शन शुभांगी तेलंग यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.