लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि 4 नोव्हेंबर 2022
2013 चा भूसंपादन कायदा अस्तित्वात असताना शेतकऱ्यांना विविध आमिष प्रलोभन दाखवून नव्याने भूसंपादन करणे कायद्याने गुन्हा आहे. संविधानाच्या विरोधात आहे.सिडकोकडून सध्या सुरु असलेले भूसंपादन प्रक्रिया ही संविधान विरोधी आहे. त्यामूळे सिडकोच्या सध्याच्या भूसंपादन प्रक्रियेला सर्वांनी जोरदार विरोध करावा असे आवाहन उरण मधील सामाजिक कार्यकर्ते तथा ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी केले आहे.
उरणमधील बालई येथे शेतक-यांना सिडकोने पाठविलेल्या भूसंपादन नोटीसी संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजाराम पाटील बोलत होते. उरणमधील विविध शेतकरी यावेळी उपस्थित होते. पुढे बोलताना राजाराम पाटील म्हणाले की सध्या सिडकोकडून नव्याने होणाऱ्या भूसंपादना बाबत येथील आमदारांना,खासदारांना देखील काहीच माहिती नाही. नव्याने भूसंपादनामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नूकसान होणार आहे. ही शेतक-यांची फसवणूक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी सिडकोला विकू नयेत. सिडकोच्या भू संपादनाला सर्वांनी एकत्र येत विरोध करावा असे आवाहन राजाराम पाटील यांनी उपस्थितांना केले. यावेळी नवनीत पाटील , निलेश भोईर यांच्यासह बालई परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.