लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे
उरण येथील ब्रह्माकुमारीज राजयोग ध्यान केंद्रात दिनांक २९ जून २०२५ रोजी एक प्रेरणादायी व विशेष सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन १०वी व १२वीच्या बोर्ड परीक्षेत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी करण्यात आले होते.
उरणमधील विविध शाळांमधून ३० पेक्षा अधिक विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना आत्मशक्ती, एकाग्रता आणि सकारात्मक जीवनमूल्यांची प्रेरणा देणे हे होते.
कार्यक्रमाचे सुरेख व उत्साही निवेदन बीके प्रियांका बहन यांनी केले. उरण केंद्राच्या इंचार्ज बीके तारा दीदी यांनी राजयोग ध्यानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्या म्हणाल्या की, “राजयोग ध्यानाच्या नियमित सरावामुळे मनाची शांती, आत्मविश्वास आणि मनोबल वाढते. हे विद्यार्थ्यांच्या यशस्वी भवितव्यासाठी अत्यावश्यक आहे.”
सीए बीके कुमुदिनी बहन यांनी डिजिटल डिटॉक्स या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल आणि सोशल मीडियाचा मर्यादित वापर करण्याचा सल्ला दिला आणि त्याचे फायदेही स्पष्ट केले.
बीके प्रमोदभाई यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, “राजयोग ध्यानाचे सरावाने विद्यार्थ्यांना जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याचे मानसिक बळ मिळते.”
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ज्येष्ठ पत्रकार दिनेश पवार यांचे मार्गदर्शन. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच कुटुंबातील संवाद, पालकांचा आदर आणि भावनिक जडणघडण याचे महत्त्व समजावले.
सर्व विद्यार्थ्यांनी ३ मिनिटांचे राजयोग ध्यान अनुभवले, ज्यातून त्यांनी अंतर्मनातील शांती व समाधान यांचा स्पर्श अनुभवला. या अनुभवानंतर विद्यार्थ्यांमध्ये आत्मिक स्थैर्य आणि नवीन ऊर्जा जागृत झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून आले.
कार्यक्रमाच्या शेवटी ब्रह्माकुमारीजच्या वतीने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना ७ दिवसांच्या राजयोग ध्यान अभ्यासक्रमाचे खुले आमंत्रण देण्यात आले. हा अभ्यासक्रम संपूर्णतः विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
विद्यार्थ्यांना हेही कळविण्यात आले की, ते अभ्यास, ताणतणाव किंवा करिअर विषयक मार्गदर्शनासाठी कधीही उरण येथील ब्रह्माकुमारीज केंद्रात समुपदेशनासाठी येऊ शकतात.
हा कार्यक्रम केवळ गौरवाचा नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक व आत्मिक परिवर्तन घडवणारा ठरला. संयम, मूल्ये, आत्मविश्वास आणि राजयोग ध्यान यांचे प्रभावी संगम म्हणून या सोहळ्याकडे पाहिले गेले.
✍️ विठ्ठल ममताबादे, लोकदर्शन न्यूज, उरण
📸 कार्यक्रमाचे काही झलक लवकरच…





