पांझुरणी येथील ऐतिहासिक सती मंदिर

,लोकदर्शन👉मोहन भारती

चंद्रपूर जिल्हयातील वरोरा शहरापासून 9 कि.मी. अंतरावर पांझुर्णी हे गाव आहे. या गावात ऐतिहासिक सती मंदिर आहे. या सती मंदिराची नोंद इंग्रज राज्यकर्त्यांनी चंद्रपूर जिल्हयाच्या गॅजेटमध्ये लिहून ठेवली
राजस्थानमधून तीन हजाराच्या वर राणे राजपूत वर्‍हाडातआले.त्याची नोंद १८८२च्या जनगणनेत आहे.त्यांनी आपल्या वंशामध्ये ही प्रथा कायम ठेवली होती. ठाकूर कुळातील राजपूत भास्कर वर्मा जोधपूरच्या गादीवर होता. त्याचा वंशज अमरावती जिल्हयात आला. तो राजस्थानातील तिरोळ प्रदेशातील होता. कालांतराने ठाकूर कुळातील राजपूत पांझुर्णी येथे स्थाइक झाले. पुढे ठाकूर या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्यांना ठाकरे या नावाने संबोधण्यात येऊ लागले.
ठाकरे घराण्याची शेती पांझुर्णी, वंधली, येवती, वाघनख, नांदरा, लोणगाडगा, नीलजई, केळी, एकोणा, मार्डा, निमसडा, कुंभा, पांचगाव, पांढरतळा येथे होती.
ठाकरे कुटुंबातील पूर्वजांकडे गडगंज संपत्ती होती. पूर्वजांपैकी गणाजी ठाकरे यांच्याकडे शेती जमीन, गुरेढोरे अशी संपत्ती होती. परंतू त्यांना वारसदार नव्हता, त्याची पत्नी नवलाई हिच्या संमतीने दत्तकपुत्र घेण्याचे ठरले. त्यानुसार अमरावती जिल्हयातील जाधव कुटुंबातील नवलाईच्या भावाचा मुलगा गिरमा याला दत्तक घेण्याचे ठरले.
दत्तक मुलगा केवळ पाच वर्षाचा होता. गणाजीची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना काळाने हिरावून घेतले. नवलाईसमोर अचानक संकट उभे झाले. त्या वेळेसच्या कौटुंबिक प्रथेमुळे सती जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. दत्तक लहान मुलगा आण भव्य इस्टेट सोडून सती जाण्याचे धारिष्ट करणे भाग पडले. तो काळ 1760 ते 1770 च्या दरम्यानचा होता.
व्दिधा मन:स्थितीत असताना मृत पतीच्या सरणावर नवलाईला नवीन कपडे घालून हळद, कुंकू मरवट लावून हाती करंडा देऊन बसविण्यात आले. पंचकोशीतील लोक अत्यंदर्शनासाठी गोळा झाले होते.
गणाजीच्या चितेवर नवलाई ध्यानस्त बसली. नवलाईच्या डोक्यावर लाकडी डेळीचा मंडप होता. चितेला अग्नी देण्यात आला. ज्वाला भडकल्या, सती जाणाऱ्या स्त्रीने उठू नये म्हणून सुताराने मंडपाच्या दोऱ्या कापल्या. लाकडी मंडप नवलाईच्या अंगावर पडला. उघडया डोळयांनी ती जनसमुदायाकडे बघत होती. ज्या सुताराने दोरी कापली त्याला शाप दिला की, तुझा वंश या गावात टिकणार नाही. ही भविष्यवाणी पुढे खरी ठरली.
नवलाईचा गावातील कारभारावर वचक होता. नवलाई ज्या जागेवर सती गेली तिथे तिच्या स्मृतीप्रित्यर्थ एक भव्य मंदिर बांधण्यात आले. मंदिर राजस्थानी शिल्पकलेनुसार बांधण्यात आले. मंदिराचे बांधकाम दगडी असून मंदिराला पाच कळस आहेत. मंदिरात गणाजी व नवलाईच्या दगडी मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. हे मंदिर शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून ते सती मंदिर या नावाने प्रसिध्द आहे.
सती मंदिरामुळे ठाकरे कुटुंबाला आपल्या पूर्वजांचा इतिहास प्राप्त झाला. सती मंदिर हे संपूर्ण ठाकरे कुळाचे आराध्य दैवत आहे. ठाकरे कुटुंबात नवीन लग्न होऊ घातले की पहिली पूजा व अहेर पत्रिका या मंदिरात अर्पण केली जाते. तसेच कोणताही शुभ प्रसंग करावयाचा झाल्यास या मंदिरात आराधना केली जाते. परंतु त्या वेळच्या समाजव्यवस्थेत अशा घटना होत होत्या.
ठाकरे कुळातील सदस्य उद्योग व्यवसायाकरिता किंवा नोकरीच्या निमित्ताने पांझुर्णी गाव सोडून दूर गेले आहेत. निरनिराळया क्षेत्रांत व शहरात ते स्थायिक झालेले आहेत. परंतु त्यांच्या घरी नवीन शुभ प्रसंग होत असल्यास पहिल्या दर्शनाकरिता पांझुर्णी येथील सती मंदिरात येतात.
पांझुर्णीच्या ठाकरे कुटुंबातील मूळ पुरुष गणाजी पाटील गृहीत धरल्यास आिा सती मंदिराच्या स्थापनेपासूनचा ठाकरे घराण्याचा इतिहास किंवा सविस्तर विस्तार लक्षात घेतल्यास आज या घराण्याची 10 वी पिढी या गावात नांदत आहेृ
गणाजी पाटील ठाकरे यांची इस्टेट
गणाजी ठाकरे श्रीमंत जमीनदार म्हणून ओळखले जात होते. त्यांच्याकडे पांझुणी, वंधली, तळेगाव या गावांची पूर्ण मालगुजारी होती. गणाजीला मूलबाळ नसल्यामुळे ही संपूर्ण इस्टेट त्यांच्या दत्तक मुलाला गिरमाजीला मिळाली. श्रीमती नवलाबाईच्या भावाचा (जाधव) मुलगा गिरमा याला दत्तक घेतले होते. गणाजीच्या मृत्यूनंतर नवलाई सती गेल्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *