राज्याच्या ‘या’ भागांना हवामान विभागाने दिला पावसाचा इशारा

लोकदर्शन : मोहन भारती
दिनांक : 21-Jan-22

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत हवामान कोरडं होतं. तर खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे. पण यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात राज्याच्या काही भागांत हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. २२ आणि २३ जानेवारी रोजी कोकणासह मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विकेंड प्लॅन करताना खबरदारी घेण्याची गरज आहे. हवामान खात्याने शनिवारी २२ जानेवारी रोजी मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी या अकरा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे याठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून विकेंडला हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत. तर २३ जानेवारी रोजी हवामान खात्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या दोन जिल्ह्यात रविवारी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर पुढील काही दिवस खान्देश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दाट धुक्यासह गारठा कायम राहणार आहे. त्यानंतर २१ आणि २२ जानेवारी रोजी संबंधित विभागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे दुसरीकडे, २१ ते २३ जानेवारी दरम्यान पश्चिम हिमालय परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. तर २२ जानेवारी रोजी हिमाचल प्रदेशात पावसासह बर्फवृष्टी होणार आहे, तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पुढील तीन दिवस दाट धुके पडणार आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटे प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होऊ शकतो.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *