देशीन का..! बघा वऱ्हाडीतील पहिली वेब सिरीज…

महत्त्वाकांक्षी, मेहनती आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्यपर्यंत योग्य तंत्रज्ञान पोहोचलं की, ही माणसं सोन्यासारखी चमकायला लागतात. आपल्या अवतीभवती अनेक गुणवंत असतात, अशा गुणवानांना संधीची आणि प्रोत्साहनाची गरज असते. त्यातून जे उतरते ते असली सोनं असते.
अशीच सोन्यासारखी एक कलाकृती आपल्यापुढे आणायची आहे. मित्रांनो,ही सारी प्रस्तावना आहे. यवतमाळच्या मातीत बनलेल्या ‘देशीन का ‘ या वेब सिरीजची. ज्यांचे वऱ्हाडी भाषेवर प्रेम आहे, ज्यांना वऱ्हाडचा गावगाडा, गावातला बेरकीपणा आणि गमतीजमती, जगण्याचा आनंद देतात. ज्यांना आपल्या मातीचा, रितीचा, भाषेचा अभिमान आहे, अशा सर्वानी ही वेबसिरीज एकदा नक्कीच बघावी.
दिग्दर्शन म्हणजे नेमके काय ? चित्रपटाची पटकथा म्हणजे नेमके काय ? नाटक – सिनेमा यातील अभिनयातला फरक काय ? पार्श्वसंगीत काय ? अशा शेकडो प्रश्नांची उत्तरे माहिती नसलेल्या नवख्या कलाकारांची जमलेली भट्टी म्हणजे देशीन का वेबसिरीज. प्रयोगातून सगळ्या गोष्टी शिकाव्यात, त्यातून चमत्कार घडावा म्हणजे ‘देशीन का वेब- सिरीज ‘. घरचे डब्बे घेऊन शुटींग, सुटया बघून चित्रीकरण,वाहन मदत म्हणून मिळवणे, बंगले विना किरायाने मागणे, तीन महिन्यात चित्रीकरण पूर्ण करणे,अशी ही अडथळ्याची शर्यत पडदयावर ‘कम शक्कर कडक मिठी ‘ कलाकृती झाली आहे.
खरं तर ही यथकथा आहे, यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील छोट्याशा धनज माणिकवाडा या गावातील नव्या दमाच्या सलीम – जावेदची!या गावातील दोन मित्रांच्या अथक परिश्रमाची. धनज-माणिकवाडा हे गाव म्हणजे श्री. संत फकिरजी महाराजांचे गाव, विदर्भाचे ख्यातनाम कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे गाव.या गावाने कला, क्रीडा, समाजकारण,शिक्षण, प्रशासन, संशोधन, वैद्यकीय क्षेत्रात नामवंत -गुणवंत दिले आहेत. एक एका क्षेत्रातील बिन्नीचे कलावंत देण्याची गावची परंपरा. फक्त एक रुपेरी पडदा बाकी होता.आता या गावच्या दोन तरण्याबांड मुलांनी रूपेरी पडदयाच्या जगाला वेड लावणे सुरू केले आहे. प्रवीण तिखे आणि रूपेश कावलकर असे या दोन कलाकारांचे नाव आहे. प्रवीण तिखे हे झी टीव्हीवरील लोकप्रिय ‘चला हवा येऊ द्या ‘ मालिकेत छोट्या भूमिका आणि लेखनाचे काम करतात. तर रुपेश कावलकर हे ख्यातनाम गझलकार, उत्कृष्ट निवेदक आणि गझलमित्र या लोकप्रिय युट्युब चॅनलचे निर्माते आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनलला एक लाखाच्यावर सबस्क्रायबर आहे. रूपेश कावलकर या शब्दांशी खेळणाऱ्या, हळव्या कवीने अतिशय संवेदनशीलपणे या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. वऱ्हाडी बाज, वऱ्हाडी थाट, नात्यातला गोडवा, भाषेतील गोडी, मैत्री,यारी, नाती आणि जीवनातील अपूर्णतेला संवादाची खमंग फोडणी देत या वेब सिरीजला उत्कंठावर्धक बनविले आहे. रुपेशच्या दिग्दर्शनातील ही पहिलीच कलाकृती आहे. मात्र हा गझलकार लंबी रेस का घोडा आहे. हे या कलाकृतीतून दिसून येते.दोघेही शिक्षक म्हणून काम करतात. त्यापैकी रूपेश कावलकर हे घाटंजी येथे शिक्षक आहेत. तर प्रवीण तिखे एका नॉन ग्रँडेड शाळेवर गावाजवळ शिक्षक म्हणून काम करतात.
मित्रांनो, या दोघांनी केवळ साठ हजार( ६० हजार ) रुपयांमध्ये एक वेब सिरीज पूर्ण केली आहे. सगळे कलाकार स्थानिक, जवळपास सर्वच यवतमाळ जिल्ह्यातल्या छोट्या-मोठ्या गावातील. काही यवतमाळचे, काही घाटंजीचे, तर काही नेर तालुक्यातील धनज माणिकवाडयाचे. छोट्या-मोठ्या नोकऱ्या करणारे आणि छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायात असणारे सर्व कलाकार. अनेक महिला हौशी कलाकार म्हणून काम करणाऱ्या. यापूर्वी कोणीही रुपेरी पडद्यावर काम केलेले नाही. छायांकन, चित्रीकरण, गीत, संगीत सर्व स्थानिक कलाकारांचेच. परवा या वेब सिरीजच्या प्रिमियरसाठी जाण्याचा योग आला. एका जगावेगळ्या प्रीमियर शो साठी मी पहिल्यांदाच आलो होतो. या सर्व निर्मितीमध्ये कुठल्या न कुठल्या रुपाने सहभागी झालेले तीस ते चाळीस जणांची टीम. फक्त मी आणि माझे जुने लोकमतचे सहकारी संतोष अडसोड असे आम्ही दोनच कलाकृती बाहेरचे पाहुणे. मुंबईमध्ये अनेक प्रिमियर शो ला जाण्याचा योग आला. तिथली श्रीमंती, झगमगाट, खाणपान,माध्यमांचा वावर, प्रत्येकाचा तोरा सगळाचा कसा दणदणाट. मात्र घरच्या लोकांचा, घरच्या भाकरी वरच्या सिनेमाचा हा प्रिमियर पाहिल्यांदाच पाहत होतो. प्रत्येक कलाकाराचा त्यासाठीचा ध्यास, घेतलेली मेहनत आणि त्यातून उगवलेलं सोनं श्रमाच्या सुगंधानं भारलेलं होतं.
‘ देशीन का ‘ या बेवसिरीजची दोन गाणी अप्रतिम आहे. ‘तुह्या कानातले डुल देते प्रेमाची चाहुल, आणि देशीन का तुहया नंबर देशीन का..? सध्या युट्युब वर धूम घालत आहे. ही गाणी ऐकली तर निश्चितच सिरीज काय तडका असेल याची कल्पना येते.
या सिनेमाची कथा प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक पुनीत मातकर यांनी लिहिली आहे. संवाद प्रविण तिखे, गीत रूपेश कावलकर, संगीत संतोष मानकर यांचे आहे. या मधील दोन्ही गाणे हिट झाली असून संदीप बिचेवार व गौरव चाटी यांनी आपल्या दमदार आवाजात या गाण्यांना वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. संगीत संयोजन वैभव दुरतकर ,प्रतीक ढोके, श्रेयस ढोके यांनी सांभाळले आहे. छाया अमीत डंभारे, अक्षय डंभारे यांचे तर संकलन नासिर शेख यांचे आहे. नासिरच्या प्रचंड मेहनतीतून छायाचित्रण झाले असून उपलब्ध तंत्रज्ञानाचा महत्तम उपयोग केला आहे. ध्वनी व्यवस्था निलेश जाधवची आहे.सोनार दाम्पत्याच या कलाकृतीच्या निर्मितीत दातृत्वाची भूमिका आहे. या वेबसीरीज मध्ये अपूर्वा सोनार, अविनाश मानेकर, लखन सोनुले,शिवानी धुमाळ -नोमुलवार, ऋषिकेश व्यास, सतीश पवार, चारुलता पावशेकर, जनार्दन राठोड,प्रेम चक्रे, रोशन जोल्हे, साहिल दरणे, जुगल गुंडकवार, गजानन जुडेकर, प्रतिभा पवार या कलाकारांनी अप्रतिम भूमिका अदा केल्या आहेत. या वेब सिरीज मधील प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र लखन, छबु,रसिका,तेजस, बाल्या, या पात्रांनी अतिशय धूम केली आहे. मित्रांनो !हा लेख प्रपंच यासाठी की, या कलाकृतीचे जोरदार स्वागत झाले पाहिजे. तंत्रज्ञान आता गावांपर्यंत पोहोचत आहे. गावातली मुलं काही नवे प्रयोग करत आहे. ते दर्जेदार आणि दमदार सुद्धा आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळायला हवं. केवळ तंत्रज्ञान माहिती आहे म्हणून श्रेष्ठत्व ही मक्तेदारी आता बंद व्हायला हवी. आमची भाषा, आमची संस्कृती, आमच्या कथा, आमच्या व्यथा, आमच्याच माणसांच्या मार्फत मांडल्या गेल्या पाहिजे. वेब सिरीज सारख्या नव्या माध्यमातून ही मुले नव्या माध्यमांवर आरूढ होत आहे. माल कलदार आहे. मुलंही दमदार आहेत. तेव्हा यांच्या पाठीशी उभे राहू या.. ! सध्या दोन तीन भाग युट्युबवर रिलीज झाले आहेत. छान प्रतिसाद आहे.देशीन का वेबसिरीजला डोक्यावर घ्यायलाच हवे.आपल्याशिवाय कोण घेणार. एकदा नक्कीच बघा ! गझलमित्र प्रोडक्शन युट्युबवर देशीन का !

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *