समाजाच्या प्रबोधन चळवळीचे वारसदार व्हा – ॲड.चटप

लोकदर्शन 👉 मोहन भारती


-⭕ सत्यपाल महाराज यांना जीवनगौरव, तर विजय देठे यांना सेवार्थ सन्मान प्रदान

गडचांदूर :

समाज हा सामाजिक कार्यकर्त्यांच्या कर्तुत्वावर उजळत असतो. थांबला तो संपला या तत्त्वाने सतत कार्यरत राहणारी माणसं आपल्या कार्यातून इतिहास घडवतात. समाज निरंतर प्रकाशमय असण्यासाठी समाजाच्या प्रबोधन चळवळीचे वारसदार नवयुवकांनी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार व शेतकरी नेते ॲड.वामनराव चटप यांनी केले. समाजसेवक डॉ.गिरीधरभाऊ काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ ग्रुप बिबी आयोजित दिव्यग्राम २०२१ महोत्सवात जीवनगौरव व सेवार्थ सन्मान पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.

यावेळी स्वागताध्यक्ष संतोष उपरे, प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य अनिल मुसळे, समाजसेवक डॉ.गिरीधर काळे, सविता काळे, माजी सरपंच संतोषकुमार पावडे, संजय पवार, राहुल आसुटकर, शंकर आस्वले, बापूजी पिंपळकर आदी मान्यवर उपस्थित होते. समाजसेवक डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी राज्यातील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदाचा पुरस्कार सप्तखंजेरीवादक, राष्ट्रीय कृतिशील समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना तसेच आश्वासक युवा सामाजिक कार्यकर्त्यांना प्रदान करण्यात येणारा नामांकित सेवार्थ सन्मान विरुर स्टे.येथील वनहक्क चळवळीचे युवा अग्रणी विजय देठे यांना सन्मानाने प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, ग्रामगिता असे पुरस्काराचे स्वरुप होते.

मागील दहा वर्षांपासून बिबी येथे दिवाळी ही फटाकेमुक्त, ग्रामस्वच्छतेने व प्रबोधनानात्मक साजरी करण्यात येते. यंदाच्या दिव्यग्राम महोत्सवात सत्यपाल महाराज यांची जाहीर प्रकट मुलाखत पार पडली. यवतमाळचे सामाजिक कार्यकर्ते, लेखक व संपादक संतोष अरसोड व अधिवक्ता ॲड‌.दीपक चटप यांनी मुलाखतीतून महाराजांना बोलते केले. त्यानंतर सत्यपाल महाराज यांचे जाहीर किर्तन व प्रबोधन पार पडले. कार्यक्रमाचे संचालन अविनाश पोईनकर, प्रास्ताविक रत्नाकर चटप तर आभार हबीब शेख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवार्थ ग्रुपचे गणपत तुम्हाणे, संदिप पिंगे, विठ्ठल अहिरकर, संतोष बावणे, गणपत मडकाम, मारोती मट्टे यासह सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

डॉ.गिरीधर काळेंची निस्वार्थ लोकसेवा वंदनीय – सत्यपाल महाराज

माणसाच्या हाता-पायाची मोडलेली, लचकलेली हाडे ३७ वर्षापासून निशुल्क जुळवून बरे करणे सोपी गोष्ट नाही. एकही रुपये न घेता चार लाखाहून अधिक लोकांना त्यांनी बरे केले. असे निस्वार्थ समाजसेवक दुर्मिळ आहे. ग्रामसभेने त्यांना ‘डॉक्टर’ उपाधी देऊन विद्यापीठापेक्षा मोठा सन्मान केला आहे. त्यांच्या सेवेने बिबी गावाची माती धन्य झाली. या निस्वार्थ कर्मयोग्याची लोकसेवा वंदनीय आहे, असे मत यावेळी सत्यपाल महाराज यांनी व्यक्त केले.

=====

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *