मनपाच्या माहिती व सुविधा केंद्राची इमारत चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाला हस्तांतरणाचा निर्णय

By : shivaji selokar

चंद्रपूर, ता. ३० : शहरातील सिव्हील लाईन्स मार्गावरील वरोरा नाका येथील माहिती व सुविधा केंद्राची इमारत चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाला संचालन व देखभालीकरीता हस्तांतरीत करण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या आमसभेत घेण्यात आला.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत गुरुवारी (ता. ३०) राणी हिराई सभागृहात आमसभा पार पडली. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयुक्त राजेश मोहिते यांची उपस्थिती होती.
शहर विकास निधी अंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील वरोरा नाका येथे माहिती व सुविधा केंद्राचे बांधकाम करण्यात आले. माजी पालकमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निधीतून बांधकाम झाले. २६ जानेवारी २०१९ रोजी भूमिपूजन झाल्यानंतर सुसज्ज इमारत बांधण्यात आली. १० जाने २०२१ रोजी लोकार्पण पार पडले. सध्या या इमारतीची मालकी मनपाकडे आहे. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मजहर अली यांनी ०६/०७/२०२१ रोजी निवेदन देऊन इमारत हस्तांतरणाची विनंती केली. तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार ही इमारत अटी व शर्तीनुसार चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ, चंद्रपूर यांना संचालन व देखभालीकरीता हस्तांतरीत करण्याचा ठराव मनपाच्या आमसभेत घेण्यात आला. इमारतीचे विद्युत देयक, पाणी देयकाची व इतरही शासकीय कराचे भुगतान करण्याची जबाबदारी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ, चंद्रपूर यांची राहील. इमारतीची मालकी महानगरपालिकेचीच राहील. कोणताही वाद उद्भवल्यास महानगरपालिका जो निर्णय घेईल तो अंतीम राहील. इमारतीमध्ये कोणताही फेरबदल करावयाचा झाल्यास त्यास महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार असून, इमारत पुढील १० वर्षाकरीता संचालन व देखभालीसाठी हस्तांतरीत केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here