संजय राऊतांचं ‘ते’ विधान अन् उद्धव ठाकरेंचा दिल्लीत अमित शहांसोबत ‘लंच’

*. लोकदर्शन 👉 मोहन भारती


——————————————
नवी दिल्ली – देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राजधानी दिल्लीत महत्त्वाची बैठक आज बोलावली होती . पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनुपस्थितीत ही बैठक पार पडली असून विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्य सचिव सिताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडेंसह या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी अमित शहांसोबत दुपारचे जेवणही केलं. त्यामुळे, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यात, संजय राऊत यांनी पुण्यात केलेलं विधानही चर्चेत आलं आहे.

देशातील वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली होती. सकाळी 10 वाजता बैठकीला सुरुवात झाली, त्यानंतर दुपारी अमित शहांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवराजसिंह चौहान, नितीश कुमार यांसह जेवणही केलं. दुसरीकडे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुण्यात केलेले विधान आणि दिल्लीत उद्धव ठाकरेंनी अमित शहांसोबत केलेला लंच, यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

*काय म्हणाले संजय राऊत*

पुण्यातील शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना राऊत म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री आपले आहेत. अजितदादाही मुख्यमंत्र्यांचे ऐकतात. पुणे जिल्ह्यात आपलं कुणी ऐकत नाही असं कसं? अजित पवारांना सांगू आमचं ऐका नाहीतर मुख्यमंत्री आज दिल्लीत गेलेच आहेत असं त्यांनी विधान करताच सभागृहात हशा पिकला. मात्र, यानंतर राऊत यांनी विधानावर विनोदी शैलीनं सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. चुकीचं ऐकू नका. माझं पूर्ण ऐका मग लिहा. उगाच ब्रेक्रिंग सुरू होईल. दिल्लीचे अंदाज बांधायला लागतील. आपल्याला दिल्लीवर राज्य करायचं. दिल्लीत ऑफिस कुठं आहेत. पंतप्रधान कुठे बसतात याचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत असं त्यांनी म्हटलं.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *