शहरातील भूमिगत विद्युत वाहिन्यांचे जाळे भक्कम करणार ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे प्रतिपादन

By : Shankar Tadas

१३२ के. व्ही. पारडी ते जाटतरोडी द्विपथ भूमिगत विद्युत वाहिनीचे भूमिपूजन

नागपूर, ता. २० सप्टेंबर : नागपूर शहरात भूमिगत विद्युत वाहिनींचे जाळे भक्कम करण्यावर यापुढे भर राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. १३२ के. व्ही. पारडी ते जाटतरोडी द्विपथ भूमिगत विद्युत वाहिनीचे भूमिपूजन आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते जाटतरोडी येथे पार पडले. यावेळी महापारेषण नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता महेंद्रकुमार वाळके, महावितरणचे नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता (प्रकल्प) अविनाश निंबाळकर, अधीक्षक अभियंता (स्थापत्य) अविनाश कसबेकर, अधीक्षक अभियंता (संचालन व सुव्यवस्था) सतीश अणे, अधीक्षक अभियंता (चाचणी) संजय आत्राम, राहुल केबलचे संचालक नंदकुमार कुकरेजा तसेच महापारेषण कंपनीचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. नितीन राऊत म्हणाले, बेसा, पारडी या परिसराचा झपाट्याने विकास होत असल्याने ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. १३२ के. व्ही. चे जाटतरोडी उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर पारडी, बेसा व उप्पलवाडी येथील उपकेंद्राचा विद्युत भार कमी होणार आहे. या भागातील ग्राहकांना योग्य भाराने विद्युत पुरवठा होणार आहे. जाटतरोडी उपकेंद्रातून ३३ के. व्ही.च्या १२ फिडरचे कामही प्रस्तावित आहे. भविष्यातील वीज मागणीची गरज लक्षात घेऊन जाटतरोडी उपकेंद्र उभारले जात असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले. पूर्व, मध्य व दक्षिण-पश्चिम भागातील ग्राहकांना फायदा
प्रस्तावित १३२ के. व्ही. जाटतरोडी उपकेंद्र शहराच्या मध्यवर्ती भागात येत असल्यामुळे महावितरणच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असल्याचे सांगून ते म्हणाले, १३२ के. व्ही. जाटतरोडी अतिउच्चदाब उपकेंद्रातून शहरातील पूर्व, मध्य व दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ग्राहकांना अखंडीत व योग्य दाबाने वीज पुरवठा होणार आहे. यामुळे जवळपास ८६ हजार ग्राहकांना फायदा होणार असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here