‘आम्ही जातीयवादी नाही हो..!!’

ज्ञानेश वाकुडकर

सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे. त्यावर बरीच टीका केली जाते. पण मला मात्र आवडतो. त्याच्या सर्व गुणदोषासह आवडतो. त्याचे अनेक फायदे आहेत. तोटेही आहेत. पण फायदे जास्त आहेत. आणि तसेही प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच ! याच सोशल मीडियामुळे अनेकांचा परिचय होतो, मित्र मिळतात.. आणि आपला देखील असली चेहरा लोकांसमोर येण्याला मदत होते.

आज पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आला. जो तो आपापल्या परीनं घोडं पुढं दामटण्याचा प्रयत्न करतो. मराठा आरक्षणाच्या आधीपासून ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. ओबीसींची जातीनिहाय जनगणनेची रास्त मागणी देखील धुडकावून लावली जाते ! त्यांना संख्येच्या प्रमाणात आरक्षण का दिलं जात नाही ? हे ओबीसी विरोधी षडयंत्र करणारे लोक कोण आहेत ? ते असं का करतात ? ओबीसी बद्दल एवढा द्वेष का म्हणून ? की ते त्यांचं अज्ञान आहे ? की ओबीसी आपला बरा आहे, वाटेल तेव्हा धोपटायला ? प्रश्न बरेच आहेत !

अशावेळी ओबीसी आरक्षण किंवा जातनिहाय जनगणनेचा विषय काढला, की लगेच लोक तुम्ही जातीयवादी आहात, असा सूर लावतात. ‘मला हे जातपात वगैरे आवडत नाही. माणूस म्हणून विचार केला पाहिजे. माणूस म्हणून जगलं पाहिजे’ वगैरे डायलॉग मारून आपण फार मानवतावादी वगैरे असल्याचा आव आणतात. पण ते खरंच मानवतावादी वगैरे असतात का ? आपल्या भूमिकेशी प्रामाणिक असतात का ? त्यांचे खरे चेहरे कोणते.. हे तपासण्यासाठी आपण काही निकष बघू या..!

मी स्वतःपासूनच सुरुवात करतो. म्हणजे समजा मी कुणबी आहे. इतर समाजाच्या नेत्यावर समजा मी टीका करतो. प्रामाणिक असल्याचा आव वगैरे आणतो.. पण त्याचवेळी कुणबी समाजाच्या नेत्यांच्या बाबतीत मात्र समान विषयावर, समान परिस्थिती असूनही तशीच टीका न करता, जर मी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न असेन, तर त्याचा सरळ अर्थ असा आहे, की मी जातीयवादी आहे.

समजा, मी मराठा आहे. आणि जेव्हा जेव्हा ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा येतो, जनगणनेचा मुद्दा येतो किंवा ‘महाराष्ट्रात ओबीसींचा मुख्यमंत्री इतक्या वर्षात झाला नाही, तो झाला पाहिजे’ अशी भूमिका कुणी मांडत असेल आणि त्यावेळी मी नेमका त्याला विरोध करतो. ‘हे जातीपातीचे राजकारण फूट पाडणारं आहे, मला हे बिलकुल आवडत नाही, असा डायलॉग मारत असतो..’ तेव्हा मग मी मराठा आरक्षणाच्या लढाईचा देखील ठामपणे असाच विरोध करतो का, हे बघायला हवं. त्याही वेळी मला जातीपातीचे राजकारण नको असते का ? माझा मराठा आरक्षणाला देखील विरोध आहे, असं म्हणण्याची मी हिम्मत दाखवतो का ? अर्ध्यापेक्षा जास्त मुख्यमंत्री मराठेच का झालेत, हा प्रश्न मला अस्वस्थ करतो का ? त्याची चीड येते का ? त्यावर देखील मला किळस येते का ? तशी मी जाहीर भूमिका घेतो का ? जर नसेल, तर मी जातीयवादी आहे. ढोंगी आहे.

समजा मी ब्राह्मण आहे. हे जातीपातीचं राजकारण, त्याची किळस येणं..वगैरे वगैरे डायलॉग मलाही प्रिय आहेत. इतरांना ते मी वेळोवेळी सूनवतो सुद्धा. पण जेव्हा राममंदिर ट्रस्ट मध्ये १५ पैकी १४ लोक माझ्या ब्राम्हण समाजाचे घेतले जातात, त्याचा मला संताप येतो का ? किंवा बहुसंख्य न्यायधिश किंवा विद्यापीठांचे कुलगुरू किंवा बहुतेक कलेक्टर, क्लास वन अधिकारी ब्राम्हणच कसे होतात, बाकीच्यांची काय लायकी नाही का, असा प्रश्न मला कधीतरी भेडसावतो का ? या गोष्टींचा मला मनापासून संताप येतो का ? त्यामुळे मी कधीतरी अस्वस्थ झालो का ? किंवा मी माझ्या स्टेटस प्रमाणे त्याचा निषेध करतो का ? ही बदमाशी करणाऱ्या किंवा तिचे समर्थन करणाऱ्या लोकांच्या वॉलवर जाऊन त्यांना प्रश्न विचारतो का ? किंवा वेळच आली तर चार गोष्टी सुनवतो का ? किंवा एकनाथ खडसे सारख्या ज्येष्ठ नेत्याला डावलून फडणवीस सारख्या ज्युनिअर व्यक्तीला मुख्यमंत्री कसं केलं जाते, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सेना वाढविण्यात सर्वात जास्त मेहनत असणाऱ्या छगन भुजबळ यांना सारून मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेते कोणत्या आधारावर केलं जाते, असा प्रश्न मला पडतो का ? की गुदगुल्या होतात ? किंवा उच्च वर्णीय समाजाला १० टक्के आरक्षण कसं काय दिलं गेलं, असा प्रश्न मला पडतो का? ह्या कृतीचा कधीतरी निषेध किंवा विरोध करतो का ? पण तिथं मला जातीयवाद दिसत नसेल आणि इतरांच्या वेळी मात्र मला जातीयवाद नको, अशी उबळ येत असेल..तर मी ढोंगी आहे, मी जातियवादी आहे. मी बदमाश आहे.

काही लोक भोळे असतात. त्यांना सामाजिक भान किंवा आरक्षण, जातीय व्यवस्था यासारख्या प्रश्नांचा अभ्यास नसतो. ह्यात अलीकडच्या तरुण पिढीचा भरणा जास्त आहे. त्यामुळे अज्ञानातून ते कधीकधी आरक्षण नको, जातपात नको अशी विधानं करत असतात. पण ह्या साऱ्यांच्या मागील कारस्थान, ह्याला जबाबदार कोण, हे जर त्यांना कुणी समजावून सांगितलं तर लगेच ते आपली भूमिका बदलून घेतात. त्यांना सत्य स्वीकारताना लाज, संकोच किंवा कमीपणा वाटत नाही. अशा लोकांना मात्र आपण समजून घेतलं पाहिजे, समजावून सांगितलं पाहिजे.

असे काही भुले भटके लोक जर साहित्याच्या क्षेत्रात असतील, सामाजिक चळवळीत असतील, राजकारणात असतील तर त्यांनी आपली बदललेली भूमिका जाहीरपणे आणि किमान सोशल मीडियातून तरी मांडलिच पाहिजे, अन्यथा हे लोक बिना शेपटीचे छुपे रुस्तम आहेत, दुटप्पी आहेत, हे निश्चित समजा !

असो, ही टेस्ट गंभीरपणे करून बघा..खरंच मजा येईल ! आपल्या अवती भवती किती ढोंगी लोक वावरतात याची कल्पना सहज येवू शकेल. किंवा आपण स्वतः ढोंगी आहोत का, याचीही जाणीव होईल ! आपण तसे असलो, तर दुरुस्त व्हा ! एकच नियम सर्वांसाठी लावा ! इतर तसे ढोंगी असतील तर.. कसलीही भिड मुर्वत न ठेवता त्यांना तिथल्या तिथं जाब विचारा. सरळ सरळ सूनवून द्या. परिस्थिती अतिशय भयंकर आहे. देश उध्वस्त व्हायला आला आहे, अशावेळी कुणाचीही भिडमुर्वत बाळगू नका. शेपटी घालून बसू नका ! मात्र कुणाच्याही बद्दल मनात आकस ठेवू नका ! आणि हो.. या सफाईची सुरुवात स्वतःपासून करा..!

वार झाले तरी झेलले पाहिजे
दुःख डोळ्यामध्ये पेलले पाहिजे
हे जगाला नव्हे, मी तुला सांगतो
एकदा तू खरे बोलले पाहिजे !

ह्यात माझी काही चूक असेल तर जरूर सांगा. दुरुस्त करीन, हवं तर माफीही मागिन ! पण जर माझं खरं असेल.. आणि ते कुणाला कितीही बोचत असेल, तरी त्याला माझा इलाज नाही ! तेव्हा.. खुश रहो, बिनधास्त रहो !

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *