चंद्रपुरात मनपातर्फे “लसीकरण आपल्या दारी” उपक्रमाचा शुभारंभ

By : Shivaji Selokar

चंद्रपूर, ता. २७ : संभाव्य कोरोना लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना लसीकरण हा एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे. जे नागरिक केंद्रावर जाऊन लस घेऊ शकत नाहीत, अशा दिव्यांग, वयोवृद्ध व अंथरुणास खिळलेले व्यक्ती यांच्यासाठी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते सोमवारी (ता. २७) “लसीकरण आपल्या दारी” उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात महापौरांनी लसीकरण वाहनास हिरवी झेंडी दिली. यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेते संदीप आवारी, माजी महापौर अंजली घोटेकर, झोन २ च्या सभापती खुशबू चौधरी, नगरसवेक संजय कंचर्लावार, नगरसेवक ऍड. राहुल घोटेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांची उपस्थिती होती.

२७ सप्टेंबरपासून सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत तीन फिरते वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत अंथरुणास खिळलेले व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी लसीकरण करून घेण्याकरिता प्रवृत्त करावे आणि जास्तीत जास्त लोकांना लसीकरण मोहिमेत सामील करून घ्यावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार, मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.

इथे करा नोंदणी
आपल्या घरी अंथरुणास खिळलेले व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिकांसाठी 💉 कोव्हीड लस द्यावयाची असल्यास https://bit.ly/3EIzp33 या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा. तसेच 9823004247 यावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here