लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
⭕मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा कामगारांचा कंपनी प्रशासनाला इशारा
उरण दि. 13 जून उरण तालुक्या तील पागोटे येथील एपीएम टर्मिनल्स (ओल्ड मर्क्स कंपनी) ने कामगारांवर अन्याय केला असून या कंपनीत बदली काम घेतले जात नाही तसेच मृत व्यक्तींच्या वारसांनाही कामावर घेतले जात नसल्याने येथील कामगारांवर अन्याय सुरूच आहे. अनेकवेळा कामगांरानी लोकशाही, कायदेशीर मार्गाने मागण्या, पत्रव्यवहार करून देखील कंपनी प्रशासन कामगारांच्या मागण्याकडे जाणून बूजून दुर्लक्ष केल्याने शेवटी कामगारांनी दिनांक 7/6/2012 पासून ओड मर्क्स कंपनीच्या गेटसमोरच धरणे आंदोलन सुरू केल आहे. आज दिनांक 13 जून 2022 रोजी आंदोलनाचा 7 वा दिवस आहे.भर उन्हातानात दिवसभर बसूनही न्याय मिळत असल्याने कामगारांनी कंपनी व्यवस्थापना विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दिनांक 7/6/2022 रोजी कंपनीच्या गेट समोर आंदोलन सुरू झाल्याने ओल्ड मर्क्स कंपनी पागोटे चे एच आर हेड योगेश ठाकूर यांनी पोलिस प्रशासना सोबत झालेल्या चर्चेत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र योगेश ठाकूर यांनी कोणतेही प्रतिसाद दिले नाही. कामगारांच्या अजूनही कोणत्याही मागण्या पूर्ण झाल्या नाहित. उलट दिवसेंदिवस ही समस्या तीव्र बनत चालली आहे.धरणे आंदोलन सुरु असल्याने कामगारांवर आता बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. स्थानिक भूमीपुत्रांनी अर्थातच कामगारांनी आपल्या जमिनी या कंपनीसाठी दिल्या.या जमिनी देणाऱ्या कामगारांवरच कपंनीने अन्याय केला आहे.आता या कामगारांना उपजिविकेचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने या कामगारांवर या खूप मोठा अन्याय होत आहे. या सर्व घटनेस कंपनीचे एच आर हेड योगेश ठाकूर जबाबदार असल्याचे कामगारांनी सांगितले.
द्रोणागिरी नोड मध्ये 32 सी. एफ.एस (गोदामे) आहेत. ओल्ड मर्स्क कंपनी पागोटे व न्यू मर्क्स नवघर या दोन्ही कंपनीचे योगेश ठाकूर हे एच आर हेड आहेत. दोन्ही कंपनीचे एकच एच आर हेड हे योगेश ठाकूर आहेत.उरण तालुक्यातील न्यू मर्क्स नवघर येथे बदली कामगार घेतले जाते मात्र या कंपनी जवळच असलेल्या ओल्ड मर्क्स कंपनी पागोटे या कंपनीत बदली कामगार घेतले जात नाहीत. योगेश ठाकूर एका कंपनीत बदली कामगार घेतात तर दुसऱ्या कंपनीत बदली कामगार घेत नाहीत हा कुठला न्याय आहे असा सवाल कामगांराना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट भार्गव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी कामगांरावर अन्याय करणाऱ्या कंपनी प्रशासनाचा जाहिर निषेध केला. जर कामगारांना न्याय मिळाला नाही तर कंपनी प्रशासनाला आगरी हिसका दाखविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिला. ओल्ड मर्क्स कंपनी प्रशासन कामगारांवर जाणून बुजून अन्याय करत असल्याने कामगार संतापले आहेत. बदली कामगार कामावर घेणे, मृत व्यक्तींच्या वारसाना नोकरीत सामावून घ्यावे या दोन मागण्या बाबत कामगारांना न्याय मिळावा एवढीच माफक अपेक्षा कामगारांची आहे.येत्या दोन दिवसात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आत्मदहन करण्याचा इशारा कामगारांनी ओल्ड मर्क्स कपंनी प्रशासनाला दिला आहे.