लोककलेच्या माध्यमातून महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा जपणारे भटाळ्याचे भवानी गोंधळ मंडळ

राजेंद्र मर्दाने

वरोरा – लुप्त होत चाललेल्या प्रथा, संस्कृती, परंपरेला नव्याने उभारी देत भटाळा येथील जय भवानी गोंधळ मंडळ गोंधळ व नकलांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करुन महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा जपण्याचे कार्य करीत आहे.
समाजात अंधश्रद्धा, दारूबंदी, कूटूंबनियोजन, निरक्षरता, व्यसनाधिनता आदी वाईट चालीरीती फोफावत आहे. ते वाचविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे या उद्देशाने सामाजिक समस्यांवर आपल्या गोंधळ आणि नकलांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचे काम वरोरा तालुक्यातील भटाळा येथील जय भवानी गोंधळ मंडळ करीत आहे. ग्रामीण जनतेच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गावातील काही समविचारीमंडळींनी एकत्र येऊन जय भवानी गोंधळ मंडळाची स्थापना २० वर्षांपूर्वी करण्यात आली. पुढे मंडळाच्या माध्यमातून समाज प्रबोधन म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन, कुटुंब नियोजन, व्यसनाधीनता, निरक्षरता, दारूबंदी, आरोग्य शिक्षण आदी विषयांवर संदेश देण्यात आला. त्यांना उत्तम असा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळू लागला. काळानुसार या गोंधळी मंडळींनी आपल्या कार्यक्रमाचे स्वरूप बदलविले. त्यांनी समाजातील ज्वलंत सामाजिक समस्यांना लक्ष केले. गोंधळात त्यांनी नृत्य, नकला, पोवाडे, समाजप्रबोधनात्मक गितांचा समावेश केला. त्यामुळे त्यांचे बहारदार कार्यक्रम होऊ लागले.
या भवानी मंडळात राजकुमार शेंडे, अनंता दाते, बापुराव पाटील, ईश्वर वानकर, अरूण नन्नावरे, फाल्गुन बैले, विठ्ठल नन्नावरे, रविंद्र पसारे हे कलाकार आहेत. सारेच जण आपआपले वेगवेगळे पात्र निभवतात. बापुराव पाटील हे अनेक सामाजिक समस्यांवर नकला करून प्रेक्षकांना हसवितात. ईश्वर वानकर उत्तम ढोलक मास्टर आहे. अरूण नन्नावरे हे उत्तम संबड वाजवितात. रविंद्र पसारे आणि विठ्ठल नन्नावरे हे नेहमीच महिलांचा वेष परीधान करून उत्तम नृत्य करतात. राजकुमार शेंडे आणि अनंता दाते हे पोवाडे तसेच समाजप्रबोधनात्मक गिते गातात. त्यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होते. तसेच ते कथेचे विश्लेषणही छान करतात.
भवानी मंडळाचे कलाकार आपल्या कलाकृतीतून काही प्रमाणात का होईना समाजात थैमान माजविलेल्या समस्यांना मुठमाती देण्याचे काम करीत आहे व लोककलेच्या माध्यमातून महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा जपण्याचे काम करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here