गावपाटीलकी_चाय.‌‌…!!

BY : Avinash Poinkar
चंद्रपूरातील जिवती तालुका तसा दुर्लक्षितच. विकासापासून कोसोदूर असलेल्या या तालुक्यात आदीम कोलाम समाजाची वस्ती, गुडे आहेत. मानिकगड पहाडाच्या कुशीत, हिरव्या डोंगररांगात आदिम कोलाम बांधव विनातक्रार जल, जंगल, जमीनीशी नाते जोडत जगत आहेत. खडकी व रायपूर गावाला कोलाम विकास फाऊंडेशनचे विकासजी कुंभारे व मित्र एड.दीपक चटप यांच्यासोबत भेट दिली. अत्यंत जिव्हाळ्याची प्रामाणिक माणसं आहे. या समाजाचा घरकुलाचा प्रश्र्न प्रलंबीत आहे. जे झाले त्यांचे छत, फ्लोरिंग, शौचालये गायब आहेत. बाकी सोयी सुविधांविषयी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देखील काहीच बोलायला नको. खडकी गावाला भेटीदरम्यान जवळपास ८ कि.मी पायदळ गावाच्या शिवेवरुन जंगलभ्रमंती झाली. समृद्ध जैवविविधता व संसाधने आहे. गावाच्या शाश्वत विकासाच्या प्रक्रियेसाठी सामुहिक वनहक्क आवश्यक असल्याचे जाणवले. गावालगत डोंगरकपारीत असलेला धबधबा प्रचंड आकर्षीत करणारा आहे. इथे मस्तपैकी अंघोळ झाली. विकासजी कुंभारे यांनी प्रेमाने आणलेल्या जेवनाच्या डब्ब्याने वनभोजनाचा आनंद घेता आला. यावेळी खडकी, रायपूरचे काही तरुण मुले देखील सोबत होते. गावात भेटलेले गावपाटील थोड्याच वेळात धबधब्यावर आले. काबाडकष्टाच्या आट्या दिसणारा अत्यंत कणखर चेहरा. धोतर आणि बांडीवर त्याचं माणूसपण लक्ष वेधत होतं. खडकीचे सर्व लोक गाव सोडून गेले तेव्हा एकटे जैतू पाटील कोडापे गावात राहीले होते. नंतर कालांतराने काही लोक परत आले. दहा-पंधरा घरांची ही वस्ती. या गावचे प्रमुख म्हणजे जैतू पाटील. गावात सकारात्मक बदल व्हावा, ही आस त्यांच्या बोलण्यात तिव्रतेने होती. जंगलभ्रमंती, धबधबा, वनभोजन नंतर जैतू पाटील बोलले, ‘चला चहा घेवू’ आमच्यापुढे प्रश्र्न; या जंगलात कुठे चहा ? ‘हे डोंगर चढले की शेतावर आपण चहा घेवू.’ आम्ही त्यांच्या पाऊलवाटेने निघालो. शेतात जागल आणि झोपडी दिमाखात होती. पाटलाने चहाची तयारी सुरू केली. तीन लाकडं पेटवली. त्यावर रोजच्या चहाची काळी गंजलेली जर्मनची भांडी ठेवली. साखर-पत्ती अगदी मोजमापाची. आम्ही ७ लोक ; कप केवळ एक आणि एक काचेचा ग्लास…. किती आत्मीयता. निखळपणा… चहाची चव तर “वाह क्या बात है !” चैतू पाटलाच्या चहाने दिवसभराचा थकवाच घालवला. नंतर आम्ही पुढे निघालो. या भागात वैद्यकीय काम करणारे आमचे मित्र डॉ.कुलभुषण मोरे यांची भेटही अविस्मरणीय ठरली. या परिसरात विकास कुंभारे या सामाजिक कार्यकर्त्याचं काम जवळून पाहता आल्याचं समाधान वाटलं. सकाळी ८ वाजता सुरु झालेला प्रवास घरी पोहोचायला रात्री १२ कसे वाजले, कळले नाही. वैचारिक प्रगल्भतेचा एड.दीपक सोबत असला की बरंच काही हाती गवसतं, या नेहमीच्या अनुभवाने परत समृद्ध होता आले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *