हिंदूसंस्कृतीच्या पायावर लोकशाहीचा डाव

हिंदूसंस्कृतीच्या पायावर लोकशाहीचा डाव
– 80 वर्षीपूर्वी घेतली होती नोंद

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचा प्रवास जानेवारी 1920 ते 1956 कमीअधिक 36 वर्षाचा. प्रारंभीचा जगण्याचा संघर्ष. नियमित वाचन. उच्च शिक्षणाचा अभ्यास. चौफेर लिखाण. समाज प्रबोधनाची चळवळ, राजकीय, सामाजिक लढे. विरोधकांच्या आरोपांना संमर्पक उत्तरे. देश-विदेशी दौरे. व्यक्तिगत कुंटूब व आरोग्याचे प्रश्न. सांसदिय कामकाज.संविधानाची निर्मिती एवढ्या सर्व जबाबदाऱ्यांचे ओझे एकटे समर्थपणे पेलवत होते. त्यातून वेळ काढून पत्रकारिता करणे. ते सुध्दा आजसारखी संवादाची साधनं नसताना. ही त्या अजुबा व्यक्तिमत्त्वाची किमया. अरे बापरे… हे उदगार प्रत्येकास काढावयास लावणारी आहे. जगातील पत्रकारांची प्रेरणा. वैचारिक स्फूर्ती देणारा . सतत वाहणारा झरा आहे. तो कधी न आटणारा निर्मळ, स्वच्छ खडखडणारा, मानवतेचा संदेश देणारा आहे. त्यांच्या पत्रकारितेचे अंलकार समता, बंधुता, लोकशाही, समान संधी व न्यायभाव आहे. त्यांना दूरदृष्टी होती. भाजप आणि आरएसएस आज हिंदुत्वी सत्तेची भाषा करते. त्या प्रवृत्तीची दखल त्यांनी 1941 मध्ये घेतली. संतर्कतेचा इशारा दिला. बुध्द जयंती साजरी करा. हे ब्राह्मणेतरांना आवाहन केले. गेल्या 80 वर्षात कोणी गांभीर्याने घेतले नाही.अलिकडे त्या डावाला सुरुवात झाली. पश्चिम बंगाल निवडणूक ही आणखी एक रंगित तालीम आहे.
……………..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता निर्भीड होती. तिला शब्दांचे तेज होते. विचारांची परिपक्वता होती. विद्वतेची झलक होती. असं कोणतंही क्षेत्र नाही.ज्यावर त्यांची लेखणी चालली नाही. त्यांच्या पत्रकारितेचा गाभा समाजकारण, राजकारण आणि धम्मकारण राहिला. त्यांनी राष्ट्रनीति, विदेशनीति, व्यापार व उद्योगनीतिवर विपूल लिखाण केले. त्यांच्या पत्रकारितील विचार काल, आज आणि उद्या त्रिकाल लागू होतात. ते विचार सर्वांगिण प्रगतीचे आहेत. त्यांची पत्रकारिता समजून घ्यावयाची असेल. तर त्या अगोदर त्यांचे व्यक्तिमत्त्व समजून घ्यावे लागेल. त्याशिवाय त्यांच्या पत्रकारितेचे बारकावे लक्षात येणार नाही. 14 एप्रिल निमित्त त्यांच्या पत्रकारितेतील 8 मुद्दे.

सदैव आक्रमक….

त्यांनी तारुण्यात समाजकारण व पत्रकारितेला सुरूवात केली. तो काळ सनातन्याचा होता. त्यांच्या विरूध्द बोलणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांच्या विरूध्द कृती केली. त्यांचा धर्मग्रंथ मनुस्मृर्तीची जाहीररित्या होळी केली. तो क्षण आठवा. आजही अंगावर कांटे उभे राहतात. कल्पना करा. आज अनेक बातम्या येतात. घोडीवरून निघालेली वरात रोखली. विहिरीवर चढला मारहाण. मंदिरात पाय ठेवू दिला जात नाही. हे सर्व शंभर वर्षा पुर्वी बाबासाहेबांनी केले. ते चवदार तळ्याचे पाणी प्याले. काळाराम मंदिर प्रवेश केला. कॉंग्रेस जेव्हा सर्व शक्तीमान होती. त्या कॉग्रेसवर. त्यांच्या पुढाऱ्यावर घणाघाती टीका केली . ज्यांच्या शब्दावर लाखों लोक जेलमध्ये जात. करो या मरो चा नारा देत .त्या महात्मा गांधींच्या विरूध्द कठोर टीका करीत. पुणे करार म्हणजे महात्मा गांधी यांना जीवदान देणारा क्षण. तो दबाव, दडपण, धमक्या. तर दुसरीकडे महात्मा गांधी यांच्या प्राणांतिक उपोषणाने जीव टांगणीला होता. तरी माझ्या अटींवर तडजोड होईल. हे केवळ बाबासाहेबांसारखा पोलादी माणूसचं सांगू शकतो. स्पष्ट शब्दात बजावू शकतो. अख्खा देश एकिकडे अन् एकटे बाबासाहेब दुसरीकडे. त्यांना मानणारा वर्ग चिंतातूर. त्यांना बाबासाहेबांच्या जिवाची पडलेली. कमालीचा तनाव. एक दुसऱ्याच्या जीवावर उठलले वातावरण. अनुचित घडले तर अस्पृश्यांवर हल्ले होणार.ही चिंता असताना समाजाच्या हिताचा बळी नको. ही चिंता त्यांना शतावत होती. त्यामुळे अखेर त्यांनी बजावले. उपोषण सोडा किंवा आमच्या अटींवर तडजोड स्वीकारा. नेतृत्व असावे. ते असे. नाहीतर एका पदावर समाधान मानणारे लेचेपेचे नेते. तडजोडीत करारी बाणा राखणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. हाच बाणा त्यांच्या पत्रकारितेत सदैव दिसला. याच कारणाने त्यांची पत्रकारिता या देशाला. देशातील प्रत्येक वर्गाला दीपस्तंभा सारखी ठरते.ज्या ब्रिटीशांच्या विरोधात शब्द उच्चारण्यास लोक घाबरत. त्या सत्तेच्या विरोधात आसूड उगारत. त्यांच्या देशात असताना तुम्ही कसे भारताला लुटता. हे सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे रसायनच वेगळे होते. त्यांनी त्यांच्या जीवाची कधी पर्वाच केली नाही. जीव धोक्यात घालून चळवळी उभारल्या.
त्याच तळमळीने त्यांनी वृतपत्रिय लिखाण केले. तलवारीपेक्षा धारदार लेखणी असते. हे केवळ आणि केवळ डॉ.बाबासाहेबांच्या पत्रकारितेला लागू होते.

मूकनायक ते प्रबुध्द भारत…

मराठी ही महाराष्ट्राची बोली भाषा. इंग्रजी भाषा विद्वानाने मराठीत वृत्तपत्र काढले. ते चालवले. हा सुध्दा इतिहास आहे.अस्पृश्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यास हक्काचे वृत्तपत्र असावे. त्यांना सारखे वाटत होते. 1917 मध्ये मुंबईतील सिडनॅहेम कॉलेजमध्ये ते प्राध्यापक झाले. ते सरकारी कॉलेज होते. त्यामुळे संपादक होण्यात अडचण. त्याच काळात साऊथबेरो आयोग भारतात येणार. ही चर्चा होती. हा आयोग जाती-जमातीच्या हक्कांबाबत साक्षी नोंदविणार होता. डॉ. बाबासाहेबांनी आयोगा समोर साक्ष देणार .त्यात आपल्या बांधवांच्या हक्कांची मागणी करणार असे जाहीर केले. त्यावरून मोठे वादळ उठले. कॉग्रेसपेक्षा वेगळे विचार आंबेडकरांचे होते. त्यावर इंग्रजी वृत्तपत्रात लेख लिहून जगाचे लक्ष वेधून घेतले . अस्पृश्यांवरील अन्यायाला वाचा फोडणे. न्याय मिळवून देण्यास वृत्तपत्राची गरज भासू लागली . त्यातून मूकनायक नियतकालिकाचा जन्म झाला. पाठोपाठ बहिस्कृत भारत, समता, जनता , प्रबुध्द भारत असा वृत्तपत्रिय प्रवास राहिला. त्यामधून त्यांनी जे विचार दिले. ते विचार अंमलात आणण्याची गरज आहे. ते विचार खऱ्या अर्थाने या देशाचे भाग्य विधाते आहेत. त्यातील निवडक 8 मुद्दे.

देशभक्त पत्रकारिता

मूकनायकच्या अंकात ते म्हणतात. जगात दोन प्रकारचा व्यापार.1- एक नियंत्रित व्यापार. 2- दुसरा अनियंत्रित व्यापार. अनियंत्रित व्यापार हा सामान्य लोकांच्या हिताचा असतो. यात देशात स्वस्तात तयार होणाऱ्या मालाचे उत्पादन करावे. अन्य देशात आपल्या पेक्षा स्वस्तात तयार होणारा माल आयात करावा. यामुळे दोन्ही देशातील लोकांना गरजेप्रमाणे लागणारा माल स्वस्तात उपलब्ध होईल. यातून दोन्ही देशातील सामान्य व मध्यमवर्गियांचे हित साधले जाईल. जगाच्या अर्थशास्त्रात अशा व्यापाराला मान्यता आहे. त्याचे पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब होते. भारताने नियंत्रित व्यापाराचा अंगिकार केला. स्वदेशी हा संघधार्जिण्याचा अजेंडा. यात स्वदेशीच्या नावावर देशी भांडवलदारांना सरकार मदत करते. आर्थिक सवलती देते. जमीन, पाणी, वीज सवलतीच्या दराने देते. यातून कारखाने उभे राहतात. उद्योग वाढतात. मालाची किंमत वाढते. स्पर्धा नसते. उद्योजक त्याला हवी. ती किंमत आकारते. नाईलाजाने ग्राहक विकत घेतो. सामान्य माणूस लुबाडला जातो. कारखानदाराचा नफा वाढतो. नेहरू ते मोदी हेच चालू आहे. आत्मनिर्भर भारत या गोडस नावावर उद्योजकांना मदत केली जाते. कर्ज माफ केले जाते. कर्ज बुडविले जाते. भांडवलधारी अर्थव्यवस्था नफा कमावणारी असते.
त्यात दलित, आदिवासी भरडला जातो. विषमतावादी भारत निर्माण होतो. देशाला पंगू केले जाते. देशातील 80 टक्के संपत्ती केवळ 10 उद्योजकांच्या ताब्यात आहे.
उरलेल्या 20 टक्के संपत्तीवर 90 टक्के लोकांचा ताबा आहे. या टक्यातील एक वर्ग निर्धनांचा आहे. मूकनायकात बाबासाहेबांनी मांडलेले व्यापारी धोरण अंगिकारले गेले नाही. या देशातील पत्रकारितेने त्याकडे कानाडोळा केला. त्याचे दुष्परिणाम देश भोगत आहे. त्या देशभक्त पत्रकारितेची गरज आहे. त्यातून किसान, मजूर, सामान्यांना न्याय मिळेल. आर्थिक विषमता संपेल. समता प्रस्थापित करण्यास मदत मिळेल. या देशातील पत्रकारांनी आंबेडकरी विचाराची पत्रकारिता केली असती. तर भारतात आर्थिक विषमता दिसली नसती. आर्थिक समतेसाठी आंबेडकरी पत्रकारितेची गरज आहे. तेव्हाच सामान्य माणूस सुखी व समृध्द होईल. बाबासाहेबांना अपेक्षित भारत उभा राहील.

समतेची पत्रकारिता

आरक्षणाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक समानता हवी होती. ही भूमिका त्यांनी मुकनायक व अन्य त्यांच्या वृत्तपत्रातून मांडली. ते विषमतेचे दोन प्रकार सांगत. 1- एक कायिक-
यात काळे-गोरे, उंच-ठेंगणे, नाकेले-फेदारलेले
2- दुसरे आद्यशास्त्रांनी आणलेली विषमता.
यात आर्य-अनार्य, गोंड-खोड, यावनी-द्रविड, अरब-इराणी अशी विषमता. एकधर्मी तत्वाच्या भावने ऐवजी जातीयत्वाच्या भावना अधिक घट्ट आहेत. युरोपियन गृहस्थ आपली ओळख इग्लिस, फ्रेंच, जर्मन, इटालियन अशी देतो. आपल्या देशात हिंदु या उत्तराने कोणाचे समाधान होत नाही.त्याला जात सांगावी लागते.
काहीतर स्वत:हुन गोत्र सांगत असतात. हिंदु समाज एक मनोरा आहे. प्रत्येक मजला एक जात आहे. खालच्या मजल्यावरचा कितीही चांगला असला. तरी त्याला वरच्या मजल्यावर जाता येत नाही. वरच्या मजल्यावरचा कितीही नालायक असला. तरी त्याला खाली लोटता येत नाही. या विषमते विरूध्द त्यांनी सातत्याने लिखाण केले.
या वेदना जगाच्या वेशीवर टांगल्या. या दोन्ही प्रकारच्या विषमते विरूध्द लढले. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस जागतिक समानता दिवस म्हणून साजरा केला जात आहे. आंबेडकरांचे विचार जगाला कळले. त्यांच्या विचारांची पत्रकारिता झाली असती. तर विषमतेला मुठमाती मिळाली असती. हा देश शक्तीशाली देश ठरला असता.

लोकांचा बुलंद आवाज ….

मूकनायक हा सामान्यांचा बुलंद आवाज होता. हजारो वर्षाच्या जातीय दडपणातून अस्पृश्य समाजाला बाहेर
काढण्याचे काम त्यांच्या पत्रकारितेने केले.वाचणारा एक आणि ऐकणारे शंभर असत. समाज शिकलेला नाही.
हे माहित असताना नियतकालिक काढण्याचं धाडस त्यांनी केले. त्या मागची भूमिका मांडताना तत्कालिन वृत्तपत्र व समाज व्यवस्थेवर प्रहार करताना ते म्हणतात, समाज एक नौका आहे. बोटीतील एकाद्याने दुसऱ्याच्या खोलित छिंद्र पाडले. तर त्या खोलित पाणी भरेल. हळूहळ बोट बुडेल. त्यात छिद्र पाडणाराही बुडेल. हाच नियम देशाला लागू होतो. उच्चवर्णीयांनी अस्पृश्यांना कमजोर ठेवले. धन व शिक्षणा पासून वंचिंत ठेवले. युध्दकलेपासून दूर ठेवले. ते स्वत: आक्रमणांचा मुकाबला करू शकले नाही. त्यामुळे मोगल आले. इंग्रज आले. समृध्द देशाला लुटले. एका मोठ्या वर्गाला सत्ता व शिक्षणापासून दूर ठेवले.परिणामी साडे तिनशे वर्ष गुलामीत काढावे लागले.

स्वराज्याची सर सुराज्याला नाही

जगात दोन प्रकारच्या सत्ता आहेत.1-एक स्वयंशासित सत्ता .2- दुसरी परशासित सत्ता. पहिल्या सत्तेत देशाचा कारभार देशात राहणाऱ्या लोकांकडे असते. सत्तेचे दोन हेतू असतात.एक शासन व दुसरी संस्कृती.
शासनाचे काम शिस्त व शांतता राखणे होय. ती दोन प्रकारे भंग पावते. एक आक्रमणाने किंवा अंतर्गत कलहाने. राष्ट्र म्हटला की वर्ग, गट, तट, आलेत. प्रत्येक वर्गांचे सामाजिक, आर्थिक, धार्मिक हितसंबंध असतात. आपल्या हितासाठी दुसऱ्या वर्गावर अन्याय केला की कलह माजतो. शांतता भंग पावते. जनतेला अमूक करू नका. शांतता मोडल्यास दंड होईल असे कारण देत धमकावणे रानटीपणा होय. जम्मू – काश्मिरात आज जे चालू आहे. तो रानटीपणाचा कळस होय. सर्वोच्च न्यायालयाने वारंवार 144 कलम लावणे. इंटरनेट सेवा बंद करणे. बऴजबरीने शांतता राखणे ,यावर सरकारला खडसाविले. अशा रानटीपणाचा त्यांनी मूकनायकातून समाचार घेतला होता. ही त्यांच्या पत्रकारितेची दूरदृष्टी आहे.

कम्यूनिष्टांना झोडपले….

पुढारी कम्यूनिष्ट आहेत. अनुयायी कम्यूनिष्ट नाहीत.अशा आशयाचे मत बहिस्कृत भारतात मांडले. त्यात लाल बावट्याचे कामगार गिरणीतील पाण्याच्या नळावर जातीभेद करतात. हे सांगितले.अन् पुढारी म्हणतात लाल( रशियन) क्रांती येवू द्या. मग हळूहळू जातीयेता संपेल. त्यावर ते म्हणतात ‘ आधी कळस मग पाया ‘ हे शक्य नाही. लेनिन जर भारतात जन्मले असते. तर ते म्हणाले असते. अगोदर जातीभेद, अस्पृश्यता गाडून टाका .हे भेद गाडून टाकले असते. त्यानंतर कामगार क्रांती म्हणाले असते. या शब्दात कम्यूनिष्टांचे चिमटे काढतात. त्यांच्यावर सडकून टीका करतात. इतकी त्यांच्या पत्रकारितेतील वैचारिकता स्पष्ट आहे. तेव्हा त्यांनी तत्कालिन वृत्तपत्र, त्यामधील लेखन व संपादकांचाही अनेकदा समाचार घेतला.अशाच एका प्रकरणात ते म्हणतात.शहरातील भांडवलदारीवर टीका करता. मात्र ग्रामीण भागात तुमचे हितसंबंध गुंतलेले असतात. त्या जमीनदारशाही, खोतशाही, सावकारशाही विरोधात लिहित नाही. खेड्यातल्या नातलगांचे,जातभाईंचे राज्य अबाधित राहिले पाहिजे. शेतकऱ्यांनी पांढरपेश्यांचा जुलूम निमूटपणे सहन केला पाहिजे.या संपादकीय प्रवृतीवर बहिस्कृत भारतातून आसूड ओढतात.

भाकरी मागितली- दगड दिला

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. त्याचा पाचवा महिना सुरु आहे. एवढा लांब आंदोलन चालल्याने त्याची चर्चा आहे. जनताच्या 30 एप्रिल-1932 च्या अंकात नाशिकात अस्पृश्यांचे आंदोलन तीन वर्ष चालल्यांची नोंद आहे. त्या आंदोलनाच्या वृत्तांत पेशवाई गेली. आंग्लाई आली. पोषाक बदलले. अंत:करण बदलले नाही.या शब्दात कलेक्टरवर टीका करतात. त्यामध्येच ते उल्लेख करतात. अंत्यत विपरित स्थितीत अस्पृश्यांनी, अस्पृश्याकरिता, अस्पृश्यांच्या मदतीवर नाशिकात सत्याग्रह चालविला. ही चळवळ तीन वर्ष चालली. इतकी संघटितपणे, उत्साहाने दीर्घ चळवळ चालविली. ही इतिहासात हिंदुस्थानातच नाही. तर जगातील अभिमानाची घटना आहे. यात अतिशयोक्ती मुळीच नाही. अस्पृश्य बांधवांनी स्पृश्य हिंदूकडे समतेची व प्रेमाची भाकरी मागितली.परंतु ब्राह्मण स्पृश्य हिंदूंनी पदरात दगड धोंडे टाकले. यातच वृध्द मातोश्रींना अटकेचा खेद आहे. तेवढाच मातोश्रीच्या अटकेत धन्यता वाटल्याचा उल्लेख आहे. खाली भीमराव आंबेडकर अशी स्वाक्षरी आहे.असे ह्रदयाला भिडणारे असंख्य वृत्तांत आहेत.

राजकारणातला नवा सांप्रदाय..

या मथळ्याखाली 4 जानेवारी 1941 च्या जनताच्या अंकात कॉंग्रेसमधल्या संधीसाधू नेत्यांचा समाचार घेतला. हे वृत्तांत वर्तमानात कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये उड्या मारणाऱ्या उच्चवर्णीय पुढाऱ्यांना तंतोतंत लागू होते. बेळगाव हिंदु महासभेचे एक नेते अध्यक्ष झाले. त्यांच्या आयुष्याचा पाऊण काळ कॉंग्रेसमध्ये गेला. आता मावळतीला ते हिंदुसभेत गेले. हे निष्ठाविहीन राजकारण अतिशय निंद्य होय. यात अशा प्रवृतींवर सडकून टीका केली. आजची पत्रकारिता ते करीतच नाही. केले तर अगदी मिळमिळीत असते. वृत्तपत्रांचा धाक नसल्याने पक्षीय माकड उड्या चालतात. या उड्या लोकशाहीला घातक आहेत. लोकशाहीची चाड संपादकांना उरली नाही. पत्रकारितेचा धाकच नाही. त्यामुळे कर्नाटक, मध्यप्रदेश , गोवा, मणिपूर राज्यात लोकशाहीचा खुल्लमखुल्ला लिलाव होतो. हे एका अर्थाने संपादकांचे चीरहरण आणि पत्रकारितेचा पराभव आहे. बहुतेकांनी पत्रकारिता सत्तेजवळ गहाण टाकली. सामान्याच्या हक्कासाठी लोकांशी बांधिलकी असलेल्या आंबेडकरी पत्रकारितेची गरज आहे.

बुध्दम् सरणम् गच्छामि….

ज्या हिंदुत्वाचा धोका आज दिसतो. त्याबाबत 1941 च्या जनताच्या अंकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात. हिंदुमधील काही सुशिक्षितांना हिंदुसंस्कृतीच्या पायावर हिंदुकरिता लोकशाही प्रस्थापित करण्याची इच्छा आहे. त्या दिशेने त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांच्या बुध्दीची कीव येते.ते एक तर मुर्ख असावेत किंवा लबाड असावेत. ब्राम्हणी धर्म आणि लोकशाही या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत. राजकारणातील रक्तशुध्दी करण्यासाठी सर्व हिंदुंनी बुध्द जयंती साजरी करणे हितावह आहे. गौत्तम बुध्दांनी ब्राह्मणेतरांच्या (ओबीसी,मराठा आदी) हिताचा विचार केला. त्यांना अंध्दश्रध्देच्या तावडीतून सोडविण्यास. खोट्या धर्माच्या कचाट्यातून बाहेर काढावयाचे होते. मानवी धर्माच्या मार्गावर आणणे. माणूसकी प्रस्थापित करणे. ब्राह्मणेतरांचा स्वाभिमानदीप प्रज्वलित करण्यास झटले. बहुजनांच्या हिताकरिता राजवैभवाचा त्याग केला. आपल्या कीर्तीने भारताचा गौरव वाढविला. त्या तथागताची बुध्द जयंती ब्राह्मणेतरांनी साजरी करावी असे ते सूचवतात. तेव्हा त्यांनी बौध्द धम्म स्विकारला नव्हता. त्यानंतर सुमारे 15 वर्षांनी म्हणजे 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपुरात बौध्द धम्माची दीक्षा घेतली. त्या लेखात ते म्हणतात. हिंदुस्थान राजकीयदृष्ट्या रोगी माणसा सारखा आहे. हिंदूंची रक्तशुध्दी राम, कृष्ण , गांधी जयंती साजरी करून होणार नाही. हे ब्राह्मणी धर्माचे उपासक आहेत. लोकशाहीच्या प्राणप्रतिष्ठेत त्यांचा काही उपयोग नाही. उपयोग बुध्दाचाच होईल. बुध्दाचीच मात्रा घेणे, हिंदूमात्राच्या राजकीय, सामाजिक रक्तशुध्दीचा उपाय आहे. डॉ. आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेतून 80 वर्षा अगोदर जी भीती व्यक्त केली होती. तिची दखल जाती, जमाती ओबीसी समाजाच्या नेत्यांनी घेतली नाही. त्या सर्वांचे हक्क विद्यमान सरकारने टांगणीला टांगले. तरी डोळ्यावरील झापडं उघडत नाही.
– भूपेंद्र गणवीर
………………BG………………

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *