विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात : पालकांनो सावध व्हा!


महाराष्ट्र शिक्षक भरतीबाबत वाचनीय लेख

by : G. M. Lande
बऱ्याच काळापासून शिक्षक भरती झाली नाही. शासनाने शिक्षक संख्या निश्चिती करण्याचे धोरण बदलविले. पहिले वर्ग १ ते ७ पर्यंत एका तुकडीला १.२५ प्रमाणात शिक्षक असायचे व ८ ते १० ला तुकडीला १.५० प्रमाणे शिक्षक असायचे. तसेच विद्यालयाला एक पद मुख्याध्यापकांचे असायचे. शासनाने पुढे चार वर्ग असेल तेथे पाचवा वर्ग आणि सात वर्ग असेल तेथे आठवा वर्ग अशी व्यवस्था केली. गणित व विज्ञान पदवीधर शिक्षक न मिळाल्यामुळे व विद्यार्थी संख्ये अभावी नगण्य ठिकाणी आठवा वर्ग चालू आहे. पुढे जावून शासनाने शिक्षक संख्या निश्चिती चे धोरण बदलविले. विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक व मुख्याध्यापक पदाची निश्चिती केली जाते. वर्ग सहा ते आठ ला ३६ विद्यार्थ्यावर ३ शिक्षक व वर्ग ९ ते १० ला ४० विद्यार्थ्यांमागे तीन शिक्षक मिळते. यामध्ये एक विद्यार्थी कमी असेल तर एक शिक्षक कमी होतो. तसेच मुख्याध्यापकांचे पद शाळेत ६ ते १० वर्ग असेल तर १०० विद्यार्थी आणि वर्ग ८ ते १० असेल तर ९० विद्यार्थी असेल तर मिळते. या धोरणाचा परिणाम वर्ग जास्त व शिक्षक संख्या कमी असा झाला. बऱ्याच ठिकाणी मुख्याध्यापक पद नसल्यामुळे त्यांचा अतिरिक्त भार एका शिक्षकावर येतो. जिल्हा परिषदेच्या शाळेत इतर कर्मचारी नसल्यामुळे सर्व कामे शिक्षकांना करावी लागतात. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. सेवानिवृत्ती व विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक संख्या कमी झाल्यामुळे अनेक शाळांमध्ये गणित विषयाचे शिक्षक उपलब्ध नाही. सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये गणित व विज्ञान विषयासाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आवश्यक आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाईल. यासाठी पालकांनी सावध होणे गरजेचे आहे. आपल्या पाल्याचे शिक्षण बरोबर होत आहे किंवा नाही. सर्व विषयाचा अभ्यासक्रम योग्य वेळी होत आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे. आपल्या पाल्याला योग्य संधी उपलब्ध करून देण्याची, सुविधा निर्माण करून देण्याची जबाबदारी ही पालकांची आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे वास्तव हे भीतीदायक आहे. एक ते सात वर्ग मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी आठव्या वर्गात इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा सन्मान झालाच पाहिजे. त्याचबरोबर असे विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याला सलाम ठोकलाच पाहिजे. पण वास्तविकता विचारात घेतली गेली पाहिजे नाहीतर त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधकारमय झाल्याशिवाय राहणार नाही. वर्ग सात पर्यंत मराठी माध्यमात शिकल्या नंतर वर्ग आठ पासून सर्व विषय इंग्रजी मधून शिक्षण घेणारे किती विद्यार्थी भविष्यात पुढील शिक्षणात यशस्वी होईल हे भविष्यात समजेल. तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असेल.
मी आणि आमच्या विद्यालयाचे गणित विषयाचे शिक्षक फावल्या वेळेत बसलो असताना तेथे वर्ग सात चे दोन विद्यार्थी आले. त्यांची थोडी माहिती घेण्यासाठी आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले. यापुढे तुम्ही आठव्या वर्गात कोणत्या शाळेत प्रवेश घेणार आहे. त्यापैकी एक विद्यार्थी मराठी माध्यमात गावच्या शाळेत तर दुसरा विद्यार्थी बाहेरील इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेणार असे म्हणाला. आम्ही त्याला तु सातवी पर्यंत मराठी माध्यमात शिक्षण घेतले आत्ता तुला इंग्रजी मध्ये सर्व विषय जमेल का? असा प्रश्न केला. त्यावर तो जमता जमता जमेल असे म्हणाला. मग आम्ही त्याला दोन तीन इंग्रजी शब्दांची स्पेलिंग विचारली तर त्याची उत्तरे एकूण आम्ही अवाक झालो. त्याने what, that, this व who ची स्पेलिंग अनुक्रमे wat, dat, dis व hu अशी सांगितली. सरांनी त्याला 7 गुणिले -1 किती असा प्रश्न केला तर आम्हाला सेमी इंग्रजी नाही असे म्हणाला. कुठल्याही शाळेतील शिक्षक असे शिकविणारच नाही. मग त्याला तुझे कोठे ट्यूशन आहे का असे विचारले तर गावात एका मॅडम कडे आहे असे सांगितले. अशा विद्यार्थ्यांनी अभ्यास करून प्रगती केली तर त्यांचे भविष्य उज्ज्वल राहील. पण त्याला इंग्रजी वाचता येते किंवा नाही हे कोण पाहणार. पालक त्याचा खर्च पूर्ण करणार पण आपल्या पाल्याची प्रगती होत आहे किंवा नाही हे पाहणार नाही. तसेच शाळेतील शिक्षक ही त्यावर बोलणार नाही. त्यांना दर महिन्याला फी हवी असते ज्यातून त्यांना पगार मिळतो. शाळेला गाडीचा किराया मिळतो. काही विद्यार्थी सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शहरात जातात त्याबाबत काही प्रश्न नाही. ते विद्यार्थी सेमी इंग्रजी माध्यमांतून प्रगती करू शकते. काही विद्यार्थी यातूनही प्रगती करेल तर त्यांच्यासाठी व पालकांसाठी चांगली गोष्ट आहे.
सर्व पालकांनी सावध होण्याची गरज आहे. आपला पाल्य ज्या शाळेत शिकत आहे तेथे प्रशिक्षित सर्व विषयाला शिक्षक आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी दोन वर्ग एकत्र बसत असेल त्या ठिकाणी वेळापत्रकानुसार एका शिक्षकाकडून कोणत्याही एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या क्षमता पूर्ण होईल किंवा दोनही वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या काही क्षमता पूर्ण होईल. शासनाने विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक निश्चिती चे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे बऱ्याच शाळेत एका शिक्षकाला दोन ते चार वर्ग एकत्र घेवून शिकवावे लागते. अशा परिस्थितीत खरोखरच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल राहील का? याचा पालकांनी विचार करून पुढील पावले उचलणे गरजेचे आहे. आपला पाल्य शाळेत जात आहे यावर समाधानी न होता. आपल्या पाल्याला योग्य शिक्षण मिळत आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे.
जी. एम. लांडे (शिक्षक)
राजेंद्र विद्यालय भोयगाव

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *