शेतात लावलेल्या जिवंत विद्युतदाराला स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्यू बिबी येथील घटना

लोकदर्शन 👉प्रतिनिधि

कोरपना – तालुक्यातील बिबी येथील माजी सरपंच संतोषकुमार पावडे यांच्या शेतात रानटी जनावरांना मारण्यासाठी लावण्यात आलेल्या जिवंत विद्युतदाराला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. बापूजी मारोती कन्नाके (४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत्यू झाला हे कळताच गुन्हा लपविण्यासाठी आरोपीकडून मृत शेतकऱ्याला दुसऱ्या शेतात नेऊन टाकण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज दि. १५ ला पहाटेच्या सुमारास घडली.
बापूजी मारोती कन्नाके (४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून स्वतःच्या शेतामध्ये पिकाला पाणी देण्याकरिता पहाटेच्या दरम्यान ते गेले होते. शेतात जाताना की परतताना शॉक लागला हे अजून कळू शकले नाही. बिबी परिसरात सध्या वाघ व रानटी डुकरांची दहशत असून वन्य प्राण्यांकडून संरक्षणासाठी शेतकरी असे प्रकार वापरतात. मात्र यामध्ये विनाकारण बापुजी कन्नाके या शेतकऱ्याला जीव गमवावा लागला.
या प्रकरणात शेतमालाचा मुलगा स्वप्निल संतोष पावडे (३०) व सध्या शेतात काम करणाऱ्या देवेंद्र सुरेश माणूसमारे (३२) रा. बिबी या शेतमजुराला ताब्यात घेण्यात आले असून शेती मालक संतोष पावडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतकांच्या नातेवाईकांनी केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात पुढील तपास सुरू आहे.

श्वानपथकाद्वारे शोध

घटनास्थळावरून प्रेत शेतकऱ्याच्या शेतात नेऊन टाकल्याने आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घटनास्थळावर श्वान पथक दाखल करण्यात आले असून श्वानपथकाद्वारे आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे.

मृतकाच्या कुटुंबाकडून १५ लाखांची मागणी

मृतकाच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदनासाठी पोलिसांना प्रेत स्वाधीन करण्यास स्पष्ट नकार दिला. शेतीमालकाच्या जाणीवपूर्वक चुकीमुळे कर्त्या कुटुंबप्रमुख शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्याने मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांकडून १५ लक्ष रुपयांची मदतीची मागणी करण्यात आली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *