

By : Mohan Bharti
गडचांदुर: राज्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक 3 ते 12 जानेवारी 2022 दरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून ‘जिजाऊ सावित्री लेकी अभियान’ जन्मोत्सवा निमित्त विवीध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्या बाबत शासनाच्या सूचना आहेत त्या अंतर्गत सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदुर द्वारा संचलित सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक चार जानेवारीला “भारताच्या जडणघडणीत स्त्रियांचे योगदान” या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डी आर काळे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्कृती विभाग प्रमुख प्रा.पि टी खैरे हे उपस्थित होते. या वक्तृत्व कला स्पर्धेत कला, विज्ञान, व व्यवसाय विभागातील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला व भारताच्या जडण घडणीत स्त्रियांचे योगदान या विषयावर आपली मते प्रखरपणे मांडली.या स्पर्धकांतून विज्ञान विभागातील रितिक अस्वले या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला तर कला विभागाच्या विग्नेश राजूरकर ने द्वितीय तर नंदिनी चाचरकर या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला.या स्पर्धेकरिता प्रा. वी जी मुप्पिडवार आणि प्रा पूजा बांगळे यांनी परीक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली.याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डी आर काळे यांनी सावित्रीबाई फुले महाविद्यालयात वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात त्या विविध कार्यक्रमात व स्पर्धांत विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घ्यावा असे आवाहन केले.या स्पर्धेत सहभागी आणि पुरस्कार मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे समस्त पदाधिकारी तसेच सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालय कला विभाग प्रमुख प्रा. जहीर एस सैय्यद यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा अनील पि मेहरकुरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व प्राध्यापक कला विज्ञान व्यवसाय तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.