विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन प्रोग्राम वरदान – अजय पडोले

लोकदर्शन👉 राजेंद्र मर्दाने

वरोरा : मनोवैज्ञानिक व्यायामातून मेंदूचा विकास करने शक्य असून ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानेंद्रियांची क्षमतावृद्धी तथा एकाग्रतावाढीस मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन प्रोग्राम (मस्तिष्क सक्रियकरण कार्यक्रम) वरदान असल्याचे प्रतिपादन मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन प्रोग्रामचे संचालक अजय पडोले ( गोंदिया ) यांनी येथे केले. ओशनिक बहुउद्देशीय संस्था वरोरा, आनंदवन मित्र मंडळ वरोरा व आनंदम् फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदवनातील एलआयसी बिल्डिंगच्या सभागृहात तीन दिवसीय मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदवनचे कार्यकर्ते राजेश ताजने होते.
मंचावर संधी निकेतन अपंगांच्या कर्मशाळेचे अधीक्षक रवींद्र नलगिंटवार, प्रशांत देशमुख, शिक्षक रमेश बोपचे, आनंदम् फाउंडेशनचे महाराष्ट्र समन्वयक डॉ. वाय. एस. जाधव, आंनदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर, ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने, भास्कर गोल्हर, उत्तम भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.
पडोले पुढे म्हणाले की, ब्रेन ऍक्टिव्हेशन ही अशी जादू आहे की, ज्यामुळे मुलांच्या मेंदूची क्षमता, विकासाची गती आणि व्याप्ती वाढविली जाऊ शकते. हे पूर्णतः विज्ञानावर आधारित तंत्रज्ञान असून अपवाद वगळता ६ ते १४ वयोगटातील मुला – मुलींसाठीच उपयोगी ठरतं. या कार्यक्रमाचे तीन लेवल्स आहेत. पहिल्या लेवल नंतर तीन दिवसांत मुलं डोळ्यांवर दोन लेअरची पट्टी बांधून कोणताही रंग, कार्डवर लिहिलेले नंबर आणि त्याच्या रंगाची ओळख करु शकतात. ही गोष्ट जरी अविश्वसनीय वाटत असली तरी ही खरी आहे. दृष्टी विकसित केल्यास हे संभव होतं. मुलांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा कोर्स खूपच फायदेशीर ठरत आहे. ह्या कोर्सनी मुलं मानसिक रुपाने रिलॅक्स होउन आपल्या टास्कला चांगल्या पद्धतीने पूर्ण करु शकतात, असे त्यांनी नमूद केले.
नलगिंटवार म्हणाले की, मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन कार्यक्रमात मुलांनी जेव्हा डोळ्यावर पट्टी बांधून फटाफट रंग आणि कार्डावर लिहिलेल्या आकड्यांची ओळख केली तेव्हा आम्ही सर्व चकीत झालो. रंगाची ओळख करताना ४ मुलांनी एकदाही चूक केली नाही. सर्व मुलांनी त्यांना दिलेले टास्क पूर्ण केले. फक्त काही तासांच्या ब्रेन स्ट्रार्मिंग एक्सरसाईजने मुलांच्या क्षमता वाढते ही निश्चितच पालकांसाठी आनंदाची बाब आहे, असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात ताजने म्हणाले की, मिड ब्रेन ऍक्टिव्हेशनमुळे मुलांच्या क्षमतेचा बहुमुखी विकास होतो हे प्रथमदर्शनी पटले नाही परंतु प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर आपल्या मुलांना याचा लाभ देण्यापासून वंचित ठेवल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आनंदवनातील दिव्यांगांना मिड ब्रेन ऍक्टिवेशनचा लाभ मिळाला तर त्यांच्या जीवनात निश्चितच आमूलाग्र परिवर्तन पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. प्रवीण मुधोळकर व राजेंद्र मर्दाने यांची समयोचित भाषणे झाली.
पालक संध्या माटे मनोगत करताना म्हणाल्या की, तीन दिवसीय ट्रेनिंग नंतर मुलाची स्मरणशक्ती चांगली झाली याचा सकारात्मक परिणाम त्याच्या शिक्षणावर होत आहे. प्रश्नांची उत्तरे त्याला लवकर लवकर पाठ होत आहे. मुलात आत्मविश्वास वाढत आहे. याचा सकारात्मक परिणाम दैनंदिन जीवनात निश्चितपणे दिसून येत असल्याचे सुस्पष्ट मत त्यांनी नोंदविले.
प्रास्ताविकात डॉ. जाधव म्हणाले की, ब्रेन ऍक्टिव्हेशन प्रोग्राम हा मुलांची एनालिटीकल, रिजनिंग आणि क्रियेटीव्हीटी वाढवितो हे तीन दिवसांच्या कार्यशाळेतून पटल्याचे नमूद करीत मुलांचे प्रात्यक्षिक ” याची देही याची डोळा ” अनुभवल्यानंतर वरोरा तालुक्यातील जास्तीत जास्त पालकांनी मिड ब्रेन ऍक्टिव्हेशनच्या माध्यमातून आपल्या पाल्यांला उंच भरारी घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात इंजि. अजय बन्सोडे, प्रा. सचिन जाधव, वरारकर, ओंकेश्वर टिपले, मनोज राठोड, संजय राठोड, विद्या जाधव, श्रद्धा मुधोळकर इ.ची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सूत्रसंचालन डॉ. वाय. एस. जाधव यांनी केले तर आभार राजेंद्र मर्दाने यांनी मानले.
कार्यक्रमात बहुसंख्येने नागरिक, पालक, पाल्य व मुला – मुलींची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *