Home
Home Breaking News कुणाल राऊत यांनी केली कंगना रनौत यांच्या अटकेची मागणी

कुणाल राऊत यांनी केली कंगना रनौत यांच्या अटकेची मागणी

पोलिसात दाखल केली तक्रार

मुंबई–अभिनेत्री कंगना रनौत यांनी स्वातंत्र्य लढ्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरुद्ध प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी पोलिसात तक्रार केली असून रनौत यांच्या अटकेची मागणी केली आहे. कंगना यांच्याविरुद्ध देशद्रोहाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी कंगना रनौत यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर रनौत यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी केली.

“रनौत सतत वादग्रस्त वक्तव्ये करीत असतात. देशाला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक असून खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले,असे अतिशय आक्षेपार्ह व देशविरोधी वक्तव्य ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीवर त्यांनी केले. यापूर्वीही त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी महात्मा गांधी यांचा मारेकरी आणि हिंदूत्ववादी अतिरेकी नाथुराम गोडसेचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि राष्ट्रपिता गांधी व देशाचा अपमान केला आहे,” असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

भारत सध्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करीत असताना कंगना रनौत यांचे हे वक्तव्य हजारो शहीद, लाखो स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक यांचा अपमान करणारे आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात स्वातंत्र्याचा लढा लढण्यात आला. मी स्वतः स्वातंत्र्य संग्राम सैनिकाचा नातू आहे. प्रदेश युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष या नात्याने मी आज कंगना रनौत यांच्या वक्तव्याविरूद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे, असे ते म्हणाले.

देशद्रोह, राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान, राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान, दोन समुहांमध्ये भांडणे लावून हिंसेचा प्रसार करण्यासाठी चिथावणी देणे, शांतता व सौहार्दाचा भंग करणे, देशात अशांतता निर्माण करून कायदा-सुव्यवस्था बिघडवणे, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर पुरूषांचा व स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणे, यासारख्या बेकायदेशीर कृत्यांसाठी उचित कलमांखाली गुन्हे नोंदवून कंगना रनौत यांना तात्काळ अटक केली जावी,” अशी मागणी प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने राऊत यांनी पोलिसांकडे आज केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here