‘जयभीम’ चित्रपट पाहिला.

कुठेही जयभीमचे नारे आणि गर्जना नसलेला. डॉ. आंबेडकरांच्या फोटो आणि पुतळ्याचे प्रदर्शन टाळलेला. का असेल असे ? कारण जयभीम या अभिवादक व सूचक शब्दातून जो व्यंग्यार्थ उमलतो, त्याचा प्रकाश या संपूर्ण कलाकृतीभर पसरला आहे.
जयभीम ही एका सामाजिक मुक्तिपर्वाच्या लढ्याची अविश्वसनीय घटना आहे. ही सत्यकथा आहे अथक परिश्रम व अभ्यासाची जिद्द असलेल्या आणि मार्क्स आणि आंबेडकरांच्या सैद्धांतिक विचारांनी मनमेंदू परिपक्व झालेल्या अफाट इच्छाशक्तीच्या एका तरुण वकिलाची. १९९५ मध्ये चेन्नई उच्च न्यायालयात कायद्याची ही ऐतिहासिक लढाई दीर्घकाळ लढली गेली ; पण आजही जातींच्या मजबूत भिंती आणि बहिष्कृत , मूलभूत हक्कांपासून वंचित , तडिपार , मुका व निरक्षर असलेला लक्षावधींचा समूह या चित्रपटामुळे आपल्या नजरेपुढे उभा राहतो.
जयभीम म्हणजे आत्मविश्वासाची अक्षय उजेडवात. ती हाती घेऊन एकटेच निघायचे असते झुंजण्यासाठी. झोपड्यांमध्ये अजूनही अंधार आहे खूऽप. इरुला आदिवासी वस्तीतील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ॲडव्होकेट चंद्रू निघाला तसे. निर्भयपणे. शेतीला उपद्रव करणारे उंदीर पकडून खाणारा हा समाज. विषारी साप पकडून त्यांना जंगलात सोडून देण्याचा उद्योगही तो करतो. या समाजातील प्रौढ बायामाणसांना अक्षरओळख करून देणारी एक शिक्षिका आहे इथे. ती शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा अशी शिकवण देत या आदिवासींच्या जगण्यात मिसळून गेली आहे अगदी सहज.
जयभीम म्हणजे प्रेम ! सर्वांना मायेने पोटाशी कवटाळणारे. जयभीम म्हणजे केवळ कायद्याच्या शस्त्रावर विश्वास ठेवून जिंकलेल्या रक्तविहीन युद्धाचा चित्तथरारक प्रवास. जयभीम म्हणजे आत्मसन्मानाने जगण्याचा संविधानाने दिलेला युगसंदेश !
जयभीम शब्दाच्या पोटात दडली आहे सनातन अंधारयुगापासूनची कोट्यवधीं माणसांच्या अनाम अश्रुंची एक कथा. सेनगानीच्या डोळ्यांतून ती अविरत वाहत आहे. ते अश्रू आपल्या हृदयाचा थरकाप उडवतात. ते जे भोगतात ते आपण प्रेक्षक म्हणूनही सहन करू शकत नाही. सेनगानी आणि राजाकण्णू या दोन अश्राप जिवांच्या उद्ध्वस्त संसाराची ही कथा. राजाकण्णूचे साधेच तर स्वप्न आहे.चार भिंतींच्या पक्क्या विटांचे घर त्याला तिला बांधून द्यायचे आहे ! त्या घराची पहिली वीट दोघांच्या हस्तचिन्हाने सजलेली असावी. तिच्या डोळ्यांत त्याने ते स्वप्न ठेवून दिले निगुतीने ; आणि निघाला त्या स्वप्नाची परिपूर्ती करण्यासाठी विटांच्या कारखान्यात काम करयला.
साधीच तर आकांक्षा आहे त्याची. एका नव्या माणसाच्या आगमनाची. तिच्या कुशीत ती आकांक्षा पेरून ठेवली आहे त्याने मोठ्या विश्वासाने ; आणि निघाला तो जीवनाची लढाई लढायला. उद्याचा तो अंकूर दिसागणिक तिच्या पोटात वाढत आहे. प्रत्येक गर्भाला अस्तर असते करुणेचे ! स्वातंत्र्य , समता, बंधुता आणि न्यायाचे ! म्हणूनच त्या गर्भाला प्राणपणाने जपायचे असते. सेनगानीसारखे. एका हातात मुलीचा हात घट्ट पकडून गर्भातला जीव पोटावर सारखा हात ठेऊन ती सांभाळत राहते. पोटावर हिंस्र , सैतानी सत्तेने केलेले लत्ताप्रहार झेलत !
चोरी शोधून काढण्याचे एक प्रकरण. वरिष्ठांच्या दबावात पोलीस राजाकन्नूला खोट्या गुन्ह्यात अडकवतात. कस्टडीत राजाकन्नूवर अमानवी अत्याचार होतात. गुन्हा कबूल करण्यासाठी केलेल्या अनन्वित छळाच्या यातना असह्य होऊन शेवटी तो तडफडत मरतो. या घटनेला आव्हान देत चंद्रू वकील न्यायालयात उभा राहतो ; आणि त्या निर्घृण खूनाला लपवण्यासाठी सुरू होते निर्लज्ज व्यवस्थेची धडपड. त्यात राजाकन्नूच्या स्वप्नासहित सेनगानीचे सारे आयुष्यच होरपळून निघते.
असहाय झाली आहे ती ; पण कणा ताठ आहे तिचा. मृत नवर्‍याची केस मागे घेण्यासाठी डीआयजी मोठ्ठ्या रकमेचा प्रस्ताव तिच्यापुढे ठेवतो ; पण ती तो स्पष्टपणे नाकारते व सांगते की गर्भातील त्या नव्या माणसालाही स्वाभिमान शिकवायचा आहे मला. खरेतर आज भ्रष्टता खोलवर झिरपली आहे. अगदी तळागाळापर्यंत. खांद्यावर झेंडे घेऊन मूल्यांचा आग्रह धरणाऱ्यांची तर कठोर परीक्षा आहे या काळात. स्वाभिमानी सेनगानी मात्र बाबासाहेबांची खरी वारसदार आहे. जयभीमचा हा संदेश लाखमोलाचा आहे. गरीब, गरोदर सेनगानीच्या गर्भाइतकाच ! त्या गर्भातील लाख मोलाच्या नव्या माणसाइतकाच !
शेवटी निरपराध राजाकन्नु आणि सेनगानीला न्याय मिळाला. आता तिची मुलगी ॲडव्होकेट चंद्रूंच्या सजग सहवासात धीटपणे वर्तमानाला वाचू लागली आहे. यापुढे सेनगानीच्या अज्ञानी अंगठ्याची जागा तिची इवलीसी स्वाक्षरी घेणार आहे. भविष्यातील या सुंदर स्वप्नाचे आश्वासन म्हणजे जयभीम ! कायद्याचा योग्य उपयोग केला तर सत्याच्या जातीला यानंतर दुःख मिळणार नाही याची हमी म्हणजे जयभीम !
वास्तवाला इतके हुबेहूब तरीही कलात्मकतेने साकारणारे निर्माता, दिग्दर्शक , पटकथाकार, अभिनेते. जयभीमच्या या सर्व कलावंत टीमला सलाम !

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *