

महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद असल्याची टीका सातत्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच शरद पवारांनी एका मुलाखतीमध्ये काँग्रेससंदर्भात घेतलेली भूमिका भाजपाच्या पथ्यावरच पडली आहे. शरद पवारांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसला जमीनदारीवरून सल्ला दिला आहे. मात्र, त्याच मुद्द्यावरून आता राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. त्यामुळे शरद पवारांची भूमिका आणि त्यावरून भाजपाकडून केली जाणारी टीका येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळू शकते.