साहित्याचे ‘महादेव’ पीठगिरणीवर..!!

By : Shankar Tadas

पुणे-बंगलोर महामार्गावर असलेल्या निपाणी गावातील सटवाई गल्लीतल्या पिठाच्या गिरणीत तुम्ही गेलात तर पिठाच्या पांढ-याफटक लेपाने माखलेला एक माणूस तुमच्यासमोर येईल. या माणसाने भन्नाट कथा लिहिल्या आहेत, १५ कथासंग्रह आणि १८ कादंब-या त्याच्या नावावर आहेत, हे तुम्हाला सांगितले तर तुम्ही सांगणा-याला मूर्खात काढाल. पण हे खरे आहे आणि त्याहून अधिक खरे हे आहे की हे सगळेच्या सगळे साहित्य बावनकशी आहे. मराठी वाङ्मयाला फार पुढे नेणारे आहे. मुंबई-पुण्याकडच्या पांढरपेशा, उच्चभ्रू माणसांच्या गावीही नसलेल्या या माणसाचा पत्ता काही रत्नपारख्यांना मात्र पक्का ठाऊक होता. त्यांनी या माणसाला थेट निपाणीहून शोधून आणला आणि नुकत्याच माहीमच्या ‘यशवंत नाट्य मंदिरा’त पार पडलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या साहित्य गौरव पुरस्कारांमध्ये त्याला ५० हजार रुपयांचा विशेष पुरस्कारही दिला. या माणसाचे नाव महादेव मोरे. महादेव मोरे पुरस्कार घ्यायला समोर आले तेव्हा झालेला टाळ्यांचा गजर थांबता थांबतच नव्हता. सत्तरीचे, पाठीत किंचित वाकलेले, पिकल्या केसांचे मोरे हे त्या दिवसाचे हीरो होते. गरिबीमुळे कॉलेज शिक्षण अर्धवट सोडून पोटापाण्याच्या व्यवसायाला लागलेल्या मोरेंनी पहिली काही वषेर् शेतमजुरी केली. नंतरची ७-८ वषेर् गॅरेज व्यवसाय भागीदारीत करून पाहिला. त्यात नुकसान सोसले. नंतर स्वत:चे स्वतंत्र गॅरेज सुरू केले, त्यातही खोट आली. शेवटी पिठाची गिरणी सुरू केली. ती ते आजतागायत सांभाळत आहेत. गिरणीत १२-१२ तास उभे राहून काम करीत आहेत. त्यांचे लेखन या गिरणीतल्या बाकड्यांवरच चाले. त्यांच्या लेखणीने मात्र भल्याभल्यांना चाट पाडणारे समृद्ध अनुभवविश्व उभे केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्यांतून गॅरेज संस्कृतीतले ड्रायव्हर, क्लिनर, त्यांना नाडणारे पोलिस, आरटीओवाले, तंबाखूच्या वखारीतल्या स्त्रिया, वेश्या, दलाल, नायकिणी, त्यांचे पंटर, गुंड, देवदासी, टॅक्सी ड्रायव्हर, मिस्त्री, हॉटेलमालक, टेबले पुसणारी पोरे, मांग, गारुडी असे कितीतरी पात्रे त्यांच्या कथेची विषय आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *