कालचे सारे मुके आज बोलू लागले …

लोकदर्शन 👉
मेघराज मेश्राम हा तरुण पत्रकार. तो मूळचा गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी नजीकच्या घिवारी या खेड्यातील. मेघराज नागपुरातील ‘सकाळ‘ दैनिकात संपादकीय विभागात आहे. वडील दहा वर्षापूर्वी गेले, मागच्या वर्षी आई गेली.

मेघराज स्वतःबद्दल फारसं कुणाशी बोलत नाही. फक्त लिहीत असतो. अतिशय कष्टातून तो इथवर आला आहे.

नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्याच्या ‘ माणूस असण्याच्या नोंदी‘ या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले, तेव्हा इथल्या प्रस्थापितांना धक्का बसला. काहींना अप्रूप तर त्याला ओळखणाऱ्यांना कौतुक वाटले.
त्याचे संपादक संदीप भारंबे आणि सहकाऱ्यांनी त्याचा सत्कार केला.

मेघराज अत्यंत प्रतिभावंत पण उपेक्षित आहे. महाराष्ट्र आणि देशातील सर्व नामांकित नियतकालिकांमध्ये त्याच्या कविता प्रसिद्ध होतात. खेदाची बाब ही की, विदर्भातील प्रथितयश साहित्य संस्थांना त्याची दखल कधी घ्यावीशी वाटली नाही.

मेघराज कुठल्याही व्यासपीठावर दिसत नाही. पुरस्काराच्या गर्दीत सुद्धा तो नसतो. पण त्याचा पहिलाच काव्यसंग्रह ‘लोकवाङ्मय गृह’ या अतिशय प्रतिष्ठित आणि चोखंदळ प्रकाशनाने प्रकाशित केला, यातच मेघराजच्या कवितेचे सामर्थ्य दडलेले आहे.

तुम्ही कितीही दाबून ठेवला तरी हिरा कधीतरी चकाकतोच. त्याला परप्रकाशाची गरज पडत नाही.

प्रत्येकाला आयुष्यात एक संधी हवी असते, मेघराजला ती या निमित्ताने मिळाली आहे. शेवटी तो ‘मेघ‘ आहे. त्याला कुणी अडवू शकत नाही. आता बघा पुढचा काळ त्याचाच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here