सावंतवाडी रेल्वेस्थानकावर पुन्हा अन्याय..*

 

लोकदर्शन.👉 गुरुनाथ तिरपनकर

कोरोना काळात त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस व गरीबरथ एक्स्प्रेसचा सावंतवाडी थांबा ZBTT (झीरो टाईम टेबल) चे कारण देऊन रद्द केला गेला व आता मूकंबिका बींदुर (कर्नाटक) ला गरीबरथ चा थांबा देण्यात आला. हा कोणता न्याय.. जनशताब्दी एक्सप्रेस दिली व त्याचा बदल्यात राजधानी एक्स्प्रेस व गरीब रथ एक्स्प्रेस दोन्ही प्रीमिअम गाड्या काढून घेतल्या. सावंतवाडी स्टेशन बद्दल च्या भरपूर मागण्या प्रलंबित असताना त्यामध्ये प्रामुख्याने सावंतवाडी टर्मिनस असो.. मत्स्यगंधा, मंगलोर ,मंगला, नेत्रावती एक्सप्रेस या दैनिक गाड्यांचा थांबा असो. नवीन सावंतवाडी – दादर एक्स्प्रेस असो. वसई – सावंतवाडी किंवा कल्याण – सावंतवाडी एक्सप्रेस असो, व पेडणे – कारवार MEMU चा सावंतवाडी पर्यंत चा विस्तार असो. आणि नवीन सुरू झालेली, शेगाव या धार्मिक स्थळाला थेट जोडणारी नागपूर – मडगाव ट्रेन चा थांबा असो.. या मागण्या कधी पूर्ण होतील सांगता येत नाही. सततचा अन्याय हा होतच आहे. कधी सिंगल ट्रॅक चे कारण, कधी विद्युतीकरणचे कारण देत कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन आमच्या हक्काच्या मागण्यांना केराची टोपली दाखवत आहेत. किंबहुना दाखवली आहे. कोकण रेल्वेत कोकण कुठे आहे ही आता शोधण्याची वेळ आली आहे माननीय सुरेश प्रभू साहेब जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा त्यांनी कोकण ला न्याय देण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु त्यांचा नंतर कोणी वाली नाही. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे लढवैये ज्यांचा प्रयत्नामुळे जनशताब्दी एक्स्प्रेसला सावंतवाडी थांबा मिळाला असे कै.डी के सावंत साहेब आता काळाच्या पडद्याआड गेलेत. त्यांचा आत्म्यास शांती लाभो. त्यांची उणीव सदैव भासेल.परंतु आता हा अन्याय सहन होण्याचा पलीकडे आहे.
आता सर्वांची गरज आहे एकत्र होण्याची व मुजोर कोकण रेल्वे प्रशासनाला जाब विचारून आपल्या मागण्या पूर्ण करण्याची.
सावंतवाडी टर्मिनस झाले की नाही अजून सावंतवाडीकराना देखील माहीत नसेल, रेल्वेचे टर्मिनस सावंतवाडीत होण्यासाठी कै. माजी आमदार जयानंद मठकर साहेब यांनी सावंतवाडी स्टेशन येथे आत्मक्लेश आंदोलन प्रशासनाविरोधात छेडले होते तसेच या टर्मिनस मुळे भरपूर राजकीय उलथपालथी देखील झाल्या होत्या परंतु टर्मिनस मंजूर होऊन देखील रेल्वे प्रशासनाने तळकोकणवासियांना प्रत्यक्षात गाजर दिले. रेल्वे टर्मिनस साठी १८ करोड पेक्षा जास्त निधी मंजूर असून ही फक्त १० करोड रुपयांच काम केलं गेलं आणि बाकीचा निधी मागे पाठवला गेला.. किती दुर्भाग्य कोकणवासियांच.. यापेक्षा जास्त दुर्भाग्य असे की याची कल्पना देखील आम्हा कोकणवासीयांना नाही. येथील लोकप्रिनिधींनीही यावर डोळेझाक केली.
आम्ही कोकणवासी संक्रांती, होळी, आंगणेवाडी जत्रा, उन्हाळी सुट्टी, गणेश चतुर्थी, दिवाळीला जास्त संख्येने रेल्वे चे डबे पूर्ण भरल्यावर देखील प्रवास करणारे चाकरमानी, प्रवासी याबद्दल एक चकार देखील काढत नाही, केवढी ही शोकांतिका..
कोकण रेल्वे प्रशासनाला माझी विनंती आहे की त्याने आम्हा तळकोकणवसियांचा सबुरीचा अंत पाहू नये. क्रोधाचा उद्रेक होऊ नये याची खबरदारी घ्यावी. माझी तमाम प्रवासी संगठना तसेच सोशल मीडिया व न्यूज मीडियाला विनंती आहे की त्यांनी या बद्दल काही तरी करावे कठोर भूमिका घ्यावी व या अन्यायाला वाचा फोडावी.

-सागर तळवडेकर
रेल्वे अभ्यासक
सावंतवाडी

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *