आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चंद्रपूरचा गौरव वाढविणाऱ्या योगपटूंचा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार

By : Devanand Sakharkar 

चंद्रपूर :  बँकॉक (थायलंड) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत १३ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकांवर नाव कोरणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील योगपटूंचा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार झाला. योगसाधनेसारखे ईश्वरीय कार्य तरुण पिढी करीत असल्याबद्दल त्यांनी अभिमान देखील व्यक्त केला.

योगासनांच्या प्रचार-प्रसारासाठी कार्य करणाऱ्या महिला पतंजली योग समिती चंद्रपूरच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आलोक साधनकर, डॉ. मंगेश गुलवाडे, स्मिता रेबनकर, तानाजी बायस्कर, स्वप्नील पोहनकर, अनिकेत ठक यांची प्रमुख उपस्थिती होती.

बँकॉक येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वरोरा येथील एसए योगा इन्स्टिट्यूटच्या ८ योगपटूंनी ट्रॅडिशनल, रिदमीक सिंगल योगा, रिदमीक पेअर योगा आणि आर्टिस्टिक पेअर योगा या ३ योग प्रकारांमध्ये ऐकूण १३ सुवर्ण आणि ३ रौप्य पदके पटकावली. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या १३ देशांमधील १२७ योगपटूंमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करणे अभिमानास्पद असल्याची भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘हजारो वर्षांपूर्वीपासून शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगसाधना केली जाते,देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी याच योगसाधनेला जागतिक स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त करून दिले. २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून १७५ देश योगसाधनेशी जोडले गेले. आज लंडनमध्ये १ तास योगा शिकविण्यासाठी ५० ते १०० पाऊंड म्हणजे ५ ते १० हजार रुपये योगशिक्षकांना दिले जातात. यावरून आपल्याला योगासनांचे महत्त्व लक्षात येईल. मनाचे समाधान धनामध्ये नाही तर योगामध्ये आहे, हे सिद्ध झाले आहे आणि जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील योगपटूंनी योगसाधनेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली कामगिरी गौरवास्पद ठरते.’ चांगले काम केल्यानंतर होणारा गुणगौरव प्रेरणादायी असतो. महिला पतंजली योग समितीने योग कार्याचा विस्तार करावा. मी सदैव तुमच्यासोबत आहे, असा विश्वासही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिला.

*आंतरराष्ट्रीय योगपटूंचे कौतुक*
बँकॉक येथील आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत पदकांची कमाई करणारे खेळाडू व एसए योगा इन्स्टिट्यूटचे संस्थापक अनिकेत ठक व स्वप्नील पोहनकर यांचे कौतुक व अभिनंदन केले. हे खेळाडू गेल्या ४ वर्षांपासून नित्यनेमाने सराव करीत आहेत. यामध्ये सई नेवास्कर-१ सुवर्ण व १ रौप्य, स्वर्णिका नौकरकर – २ सुवर्ण, शर्वरी मिटकर – २ सुवर्ण, गायत्री पाल- १ सुवर्ण व १ रौप्य, शौनक आमटे- २ सुवर्ण, साहिल खापणे- २ सुवर्ण, श्रीकांत घानवडे- १ सुवर्ण व १ रौप्य, राम झाडे – २ सुवर्ण या योगपटूंचा समावेश आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *